विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमरोहा तहशील - ( संयुक्त प्रांत ) मुराराबाद जिल्ह्यांतील एक तहशील. २८० ४६’ ते २९० ९’ उ. अक्षांश व ७८० २० ते ७८० ४३’ पूर्व रेखांश यांचे दरम्यान असून क्षेत्रफळ ३८३ चौरस मैल आहे. लोकसंख्या सुमारें दोन लक्ष वीसहजार. या तहशिलींत दोन गांवें व ५०८ खेडीं आहेत इ. स. १९०३-४ सालीं जमीन महसूल १३४००० रूपये व इतर कर ४६००० रूपये इतकें उत्पन्न होतें. दर चौरस मैलीं लोकवस्तीचें प्रमाण ५३९ आहे. तहशिलीचा पूर्वेकडील प्रदेश रेताड आहे.
गां व.−२८० ५४’ उत्तर अक्षांश व ७७० २८’ पूर्व रेखांश यांवर हा गांव औंध रेहिलखंड रेल्वेचें स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें साडेबेचाळीस हजार. हा गांव हस्तिनापुरच्या राजानें वसविला असें कांहींचें म्हणणें असून कांहीं पृथ्वीराजाच्या बहिणीनें हा गांव वसविला असें म्हणतात. कटेर येथील बंड मोडण्याकरतां धियासुद्दीन बलबन हा इ. स. १२६६ सालीं येथें आला होता. इ. स. १३०४ सालीं मोंगलांनीं हिंदुस्थानावर स्वारी केली होती तींत त्यांचा पराजय या गांवाजवळच झाला. चवदाव्या शतकाच्या प्रारंभी प्रसिद्ध फकीर शरफुद्दिन किंवा शहा विलायत हा येथें येऊन राहिला होता; व हल्लीं येथें राहणारे पुष्कळ सय्यद लोक यास आपला मुळपुरूष समजतात. यावेळेपासून या शहराचें महत्त्व कमी होऊन सांभळ गांवानें याची जागा पटकावली. मुरादाबादपासून गाझीबादला जाणार्या ईस्ट इंडिया रेल्वेच्या फांट्यावर हें गांव आहे. कापड व नक्षीदार भांडीं येथें तयार होतात. पाऊस सरासरी ३८° ८२” पडतो.
हा गांव सखल जागीं वसलेला असून सभोंवार पुष्कळ आंबराई आहे. गांवाचा भव्य दरवाजा व प्राचीन तट गांवास शोभा आणितात. हिंदूचे प्राचीन अवशेष खेरीज करून मुसुलमानांच्या १०० पेक्षां अधिक मशिदी आहेत. यापैकीं जमा मशीद ही फार प्राचीन आहे. पूर्वीं ही मशीद म्हणजे एक हिंदु देऊळ होतें परंतु त्याची तेराव्या शतकांत मशीद बनविण्यांत आली.
इ. स. १८७० सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. इ. स. १९०३-४ सालीं उत्पन्न ३२००० व खर्च ३५००० होता. येथें स्थानिक व्यापार बराच असून कापड व मातीचीं रंगीत भांडीं तयार करण्याचे कारखाने येथें आहेत.
जून १९२१ मध्यें सोत नदीवरील पूल पुरानें पडल्यामुळें मोठा अपघात झाला. हल्लीं नवीन पूल बांधला आहे. [ इं. गॅ. ५. अर्नोल्ड-इं. गाइड ]