विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅमहर्स्ट ( इ. स. १७७३-१८५७ )−हिंदुस्थानचा गव्हर्नर-जनरल लॉर्ड अॅमहर्स्ट हा लेफ्टनंट-जनरल विल्यम अॅमहर्स्ट व इलिझाबेथ पॅटर्सन यांचा ज्येष्ठ पुत्र १७७३ मध्यें बाथ येथें जन्मला. अॅमहर्स्ट परगणा इंग्लंडच्या उत्तरेकडील रम्य प्रदेशांत असून अॅमहर्स्ट घराणें बरेंच पुरातन व प्रसिद्ध आहे. १२१५ पासून या नांवाच्या घराण्यांतील पुरूषांचा उल्लेख आलेला आढळतो. इंग्लंडांत क्रॉमवेलच्या अमदानीच्या वेळीं रेव्हरंड जेफ्रे अॅमहर्स्ट नांवाचा एक पूर्वज हॉर्समोंडेन गांवीं रेक्टरच्या हुद्यावर होता. या रेव्हरंड अॅमहर्स्टचा मुलगा, नातू व पणतू हे ओळीनें तीन पिढ्यांतील पुरूष ग्रेज इन नामक कोर्टांत बॅरिस्टर व न्यायाधीश या हुद्यांवर चढले होते. यांपैकीं तिसरा पुरूष रिव्हरहेड येथें राहत असे. त्याला जेफ्रे व विल्यम असे दोन मुलगे होते. पैकीं जेफ्रेला डॉर्सेटच्या डयूकच्या शिफारसीनें सैन्यांत प्रथम निशाणदाराची नोकरी मिळाली. लवकरच त्याला यूरोपखंडांतल्या युद्धांत भाग घ्यावा लागला व त्यामुळें मोठमोठ्या कॅप्टन वगैरे हुद्यांवरील सैन्यांतल्या अधिकार्यांशीं त्याचा परिचय होऊन त्याला युद्धकलेचें चांगलें ज्ञान व अनुभव मिळाला. पुढें अमेरिकेनें इंग्लंडबरोबर स्वातंत्र्याकरितां युद्ध सुरूं केलें. त्यांत जेफ्रेला मोठ्या हुद्दयाची जागा मिळून त्यानें लुईबर्ग टिकाँडेरोगो, माँट्रील वगैरे ठिकाणीं जय मिळविले; त्यांबद्दल जनरल जेफ्रे अॅमहर्स्टला ब्रिटिश नॉर्थ अमेरिकेचा गव्हर्नरजनरल नेमलें. तिकडून परत आल्यावर त्याला लॉर्ड बनविण्यांत आलें व तो पुढें मरेपर्यंत ( १७९७ ) रिव्हरहेड येथें राहिला. याचाच धाकटा भाऊ विल्यम अॅमहर्स्ट जेफ्रेबरोबर कानडांत लढाईवर गेला होता. या दोघांहि बंधूंना वनस्पतिशास्त्राची आवड असल्यामुळें त्यांनीं अमेरिकेंतील बरीच नव्या जांतींचीं फुलफळझाडें इंग्लंडांत आणून रिव्हरहेड येथें लावलीं होतीं. धाकट्या विल्यमचें लग्न १७६६ मध्यें इलिझाबेथ पॅटरसन बरोबर झालें. या दांपत्याचाच सदरहू लॉर्ड अॅमहर्स्ट हा ज्येष्ठ पुत्र होय. पुढें आई व बाप दोघेहि लवकरच वारल्यामुळें हा मुलगा भावंडांसह आपला चुलता जेफ्रे अॅमहर्स्ट याच्या घरीं राहूं लागला. त्याचें प्राथमिक शिक्षण वेस्टमिन्स्टर शाळेंत होऊन पुढें ऑक्सफोर्ड येथील ख्राइस्ट चर्च कालेजमध्यें शिकून त्यानें १७९७ मध्यें एम्. ए. ची पदवी मिळविली. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणें त्यानें १७९३ मध्यें यूरोपखंडभर प्रवास करून फ्रेंच, इटालियन वगैरे भाषांचा अभ्यास केला. या प्रवासांतच रोम येथें प्लिमथचा अर्ल व कौंटेस याच्याशीं १७९४ मध्यें त्याची ओळख झाली. पुढें अर्ल वारल्यानंतर त्याच्या विधवा कौंटेसबरोबर १८०० मध्यें त्यानें लग्न केलें व या विवाहापासून अॅमहर्स्टला चांगलें सुख लागलें. शिवाय १७९७ मध्यें जेफ्रे पहिला लॉर्ड अॅमहर्स्ट निपुत्रिक वारल्यामुळें त्याच्या या पुतण्यालाच लॉर्ड ही पदवी मिळाली, त्याचा दरबारांत प्रवेश झाला आणि १८०२ ते १८०४ पर्यंत ३ र्या जॉर्ज राजाचा तो बेडचेबरचा ( शयनगृहांतील कंचुकी ) लॉर्ड झाला. १८०९ मध्यें सिसिलीमध्यें परराष्ट्रवकील म्हणून तो नेमला गेला व १८१५ मध्यें त्याला प्रिव्ही कौन्सिलर नेमण्यांत आलें. या सर्व हुद्दयांचीं कामें लॉर्ड अॅमहर्स्टनें प्रामाणिकपणानें केल्यामुळें लवकरच त्याची नेमणूक एका मोठ्या जबाबदारीच्या राजकीय कामगिरीवर झाली. ग्रेट ब्रिटन व चीन देश यांचे व्यापारविषयक संबंध नीट समाधानकारक रीतीनें जुळवून आणण्याकरितां लॉर्ड अॅमहर्स्टला चीनच्या दरबाराकडे पाठविण्यांत आलें. परंतु पेइहो येथें पोहोंचल्यावर त्याला असें कळविण्यांत आलें कीं, चीनच्या बादशहाचे मांडलिक जसा मुजरा करतात तसा इंग्रज वकीलानें केला तरच त्याला बादशहाच्या दरबारांत प्रवेश मिळेल. बरोबरचा दुसरा कमिशनर सर जॉर्ज टी. स्टौन्टन याच्या सल्ल्यावरून लॉर्ड अॅमहर्स्टनें, चीनचे वकील इंग्लंडच्या बादशहास तसा मुजरा करण्याचें कबूल करीत असल्यास आपणहि त्या गोष्टीस तयार आहों अशी अट घातली. ती अट मान्य न करतां चीनच्या दरबारनें अॅमहर्स्टला भेट न घेतां परत पाठविलें. याप्रमाणें उद्दिष्ट कार्य साध्य न होतां अॅमहर्स्ट वाटेंत सेंट हेलिना येथें नेपोलियनची भेट घेऊन १८१७ ऑगस्ट १६ रोजीं इंग्लंडला परत आला.
पुढें लवकरच १८२३ मध्यें हिंदुस्थानचा गव्हर्नर-जनरल लॉर्ड हेस्तिंग्ज यानें राजीनामा दिला व त्या जागेवर मिस्टर कॅनिंग याची नेमणूकहि झाली. परंतु इतक्यांत लॉर्ड लंडनडेरी वारल्यामुळें परराष्ट्रमंत्र्याच्या जागीं कॅनिंग नेमला गेला. तेव्हां हिंदुस्थानच्या गव्हर्नर-जनरलच्या जागेकरितां मद्रासचा माजी गव्हर्नर विल्यम बेंटिंक व लॉर्ड अॅमहर्स्ट हीं नांवें पुढें आलीं व अखेर अॅमहर्स्टची नेमणूक कायम होऊन तो पत्नी व मुलगा जेफ्रे आणि मुलगी सारा यांच्यासह जुपिटर नांवाच्या बोटीनें १८ जुलै १८२३ रोजीं मद्रास येथें येऊन उतरला. तेव्हां कंपनीसरकारतर्फे, तसेंच कर्नाटकच्या नबाबाकडून त्यांचे मोठें स्वागत करण्यांत आलें. नंतर १ ऑगस्ट रोजीं कलकत्त्यास जाऊन तो आपल्या गव्हर्नर-जनरलच्या जागेवर रूजू झाला. हिंदुस्थानांत असतांना लेडी अॅमहर्स्टनें खाजगी स्वरूपाच्या अनेक गोष्टी-हिंदुच्या विवाहादि धार्मिक विधींतील मिरवणुकी, मिशनरी लोकांची हिंदूंकडून होणारी टवाळी, कलकत्त्यास कालर्यानें गुदरलेला अनर्थ, पेन्शनर दुसरा बाजीराव पेशवा याची दिनचर्या, कैदेंत असलेल्या ब्रह्मी राजकन्येचें गुणवर्णन, एखाद्या हिंदु संन्याशाची गव्हर्नर-जनरलशीं मुलाखत या गोष्टी आपल्या रोजनिशीमध्यें लिहून ठेविलेल्या आहेत.
लॉर्ड अॅमहर्स्टनें कारभार हातीं घेतला तेव्हां मुद्रणस्वातंत्र्याचा एक बिकट प्रश्न उपस्थित झालेला होता. माजी गव्हर्नर-जनरल हेस्तिंग्ज यानें बरेंच उदारपणाचें धोरण स्वीकारलें होतें. परंतु मध्यंतरीं तात्पुरतें गव्हर्नर-जनरलचें काम करणारा मिस्टर जॉन अॅडॅम् यानें ‘कलकत्ता जर्नल’ नांवाच्या प्रसिद्ध पत्राच्या बकिंगहॅम नांवाच्या संपादकाला सरकारी अधिकार्यांवर कडक टीका केल्याबद्दल हद्दपार केलें होतें. लॉर्ड अॅमहर्स्ट व पुढला गव्हर्नर-जनरल बेंटिंक यांनीं सरकारच्या टीकाकारांवर नियंत्रण पाहिजे, हें तत्त्वत: मान्य करूनहि प्रत्यक्ष व्यवहारांत वर्तमानपत्रकारांनां पुष्कळ सवलत दिली. सामान्यत: लॉर्ड अॅमहर्स्ट शांतताप्रिय अधिकारी होता; तथापि येथें येतांच त्याला ब्रह्मदेशाच्या राजाबरोबर युद्ध सुरू करावें लागलें. तंटा सरहद्दीबद्दल असल्यामुळें कमिशन नेमून शांततेच्या मार्गानें तडजोड करण्याचा मार्ग अॅमहर्स्टनें सुचविला; पण ब्रह्मी सरकारनें तो मान्य न केल्यामुळें युद्धाला सुरवात होऊन (१८२४-२६) त्यांत सर्वस्वीं यश मिळाल्यामुळें अखेर कंपनीसरकारला फायदेशीर असा तह लॉर्ड अॅमहर्स्टनें घडवून आणला. या युद्धाबद्दल १३ कोट रूपये खर्च झाल्यामुळें प्रथम अॅमहर्स्टला इंग्लंडांत दोष देण्यांत आला; परंतु या युद्धापासून आरंभ होऊन अखेर चहाकरितां सुप्रसिद्ध असलेला आसाम व तांदुळाकरितां प्रसिद्ध असलेला आराकान असे सुपीक मिळाल्यामुळें आतां अॅमहर्स्टच्या धोरणाची इंग्रज लोकांकडून प्रशंसाच होत असते. दुसरी महत्त्वाची राजकीय गोष्ट म्हणजे भरतपुरच्या वेढ्यांत मिळालेला विजय. ब्रह्मी राजाबरोबर युद्ध चालू असतांना हें प्रकरण उपस्थित करण्यांत आल्यामुळें अॅमहर्स्ट प्रथम याच्या विरूद्ध होता. शिवाय हा किल्ला घेण्याचा पूर्वीं एक प्रयत्न फसला असल्यामुळें हिंदी लोकांनां तो अजिंक्य वाटत होता. असा स्थितींत कंपनीसरकारचा दरारा कायम राहावा म्हणून अखेर अॅमहर्स्टनें संमति देऊन किल्ला सर करविला. तथापि या विजयाचें श्रेय तत्कालीन इंग्रज सेनापतींनां आहे, अॅमहर्स्टला नाहीं; कारण त्याच्या अंगीं उपजत लष्करी गुण नव्हते किंवा त्याला लष्करी शिक्षणहि चांगलेसें मिळालेलें नव्हतें. लॉर्ड अॅमहर्स्टच्या शांतताप्रिय व न्यायी धोरणाला डाग लावणारी एक गोष्ट घडली, ती बराकपुर येथील बंगाली शिपायांचें बंड ही होय. ब्रह्मी युद्धावर जाण्यापूर्वीं या शिपायांनीं पगारवाढ व युद्धसामुग्रीकरितां वाहनें यांची योग्य रीतीनें अर्जादिद्वारा मागणी केली. ती फेटाळल्यामुळें शिपाई युद्धावर जाण्याचें नाकारूं लागले. यालाच बंडाचें नांव देऊन युरोपियन सैनिकांकडून त्यांची नाहक्क व क्रूरपणानें कत्तल करण्यांत आली. लष्करी शिस्तीच्या गोष्टींत लागणारें हुषारीचें धोरण अंगीं असतें तर लॉर्ड अॅमहर्स्टला हा प्रसंग टाळतां आला असता.
लॉर्ड अॅमहर्स्टनें सहकुटुंब अलाहाबाद, आग्रा, मथुरा वृंदावन, दिल्ली, सिमला वगैरे ठिकाणीं प्रवास केला. सिमल्याचा मुक्काम तर त्या सर्वांनां फारच सुखकर वाटला. तेथें जाऊन राहणारा हाच पहिला गव्हर्नर जनरल होय; व तेव्हांपासूनच सिमला हें हिंदुस्थान सरकारचें उन्हाळ्यांतील मुक्कामाचें ठिकाण होऊन बसलें. वरील प्रवास उरकून आल्यावर लवकरच राजीनामा देऊन लॉर्ड अॅमहर्स्ट कुटुंबासह ८ मार्च १८२८ रोजीं हेरल्ड नांवच्या बोटीनें इंग्लंकडे परत जाण्यास निघाला. या प्रवासांत बरींच संकटें आलीं. समुद्रांत वादळें झालीं, व एकदां एका अमेरिकन जहाजाबरोबर लहानशी चकमक झाली तथापि २२ जुलै १८२८ रोजीं सर्व मंडळी स्पिथहेड बंदरांत सुरक्षित येऊन उतरली.
परत आल्यावर पुन्हां १८२९ ते १८३७ पर्यंत तो ४ था जॉर्ज व ४ था विल्यम यांच्या बेडचेंबरचा लॉर्ड या हुद्यावर होता. १८३५ मध्यें त्याची कानडाच्या गव्हर्नर जनरलच्या जागीं नेमणूक झाली होती, पण तेथें त्या सुमारास अधिकारीमंडळांत बदल झाल्यामुळें तो प्रत्यक्ष कामावर रूजू झालाच नाहीं. १८३७ मध्यें त्याची पहिली बायको वारली. म्हणून १८३९ मध्यें त्यानें प्लिमथच्या ६ व्या अर्लच्या विधवेशीं लग्न लावलें. फुलझाडें, फळझाडें तयार करण्याकडे तो बरेंच लक्ष देत असे. याचा स्वभाव शांत, मनमिळाऊ व उदार असल्यामुळें त्याची मित्रमंडळी पुष्कळ होती. याप्रमाणें सुखसमाधानांत इतर पूर्वजांप्रमाणें बरींच वर्षें घालवून तो १३ मार्च १८५७ रोजीं वयाच्या चौर्यायशींव्या वर्षीं मरण पावला. अॅमहर्स्ट विशेष बुद्धिमान् नसल्यामुळें तो गव्हर्नर-जनरल सारख्या मोठ्या हद्याला लायक नव्हता व म्हणून त्या जागीं त्याची नेमणूक न करणेंच योग्य झालें असतें. तथापि ब्रह्मी युद्ध व भरतपूरचा वेढा यांत विजय मिळाल्यामुळें पार्लमेंटनें आपल्या नेहमींच्या उदार धोरणास अनुसरून अॅमहर्स्टनें केलेल्या चुकीच्या गोष्टीकडे कानाडोळा करून वरील विजयाबद्दल त्याचे मोठे आभार मानले. ब्रह्मी युद्धामध्यें प्रथम वाफेच्या बोटीचा उपयोग करण्यांत येऊन डायाना नामक जहाजानें रंगून येथें चांगली कामगिरी बजावली. ब्रह्मी युद्धांतील विजयाबद्दल अर्ल ऑफ आराकान अशी अॅमहर्स्टला पदवी देण्यांत आली होती.