विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमहर्स्ट, जि ल्हा.−लोअर बर्मा. तेनासरीम भागांतील एक जिल्हा. १४० ५६’ ते १७० २’ उत्तर अ. व ९७० २७’ ते ९८० ५१’ पूर्व रे. यांच्या दरम्यान. क्षेत्रफळ ७०६२ चौ. मैल. उत्तरेस थेटन जिल्हा. पूर्वेस दावना डोंगर व सयाम संस्थानचा प्रदेश; दक्षिणेस महल्वे डोंगर आणि पश्चिमेस मार्ताबानचें आखात. या जिल्हांत सालवीन, ग्यांग. अतरन या मुख्य नद्या होत. या नद्यांच्या मुखाच्या दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे या जिल्ह्यांतील प्रदेश आहे. जिल्हांतील मुख्य डोंगर दावना हा होय. त्याची सर्वांत जास्त उंची ५५०० फूट आहे व सांगितलेल्या नद्या जलमार्गानें व्यापार करण्यायोग्य नाहींत. एकंदरींत बहुतेक प्रदेश डोंगराळ आहे. येथें उन्हाळीं पुष्कळ आहेत. टांग्निओ डोंगरांत शिशाची खाण सांपडली आहे.
जं ग ल − येथें सागवान फार आहे. त्याचप्रमाणें दाणी ताड व बांबू हेहि विपुल आहेत.
येथें वन्य प्राणी वाघ, चित्ता, गवा, डुकरें, गेंडा इ. असून नद्याकांठचा व किनार्यावरील प्रदेश उष्ण आहे. परंतु आंतील डोंगराळ प्रदेश बराच थंड आहे. या भागांत पाऊस फार पडतो. उदाहरणार्थ-मोलमेन १८८ इंच; अमहर्स्ट २१३ इंच. या भागांत वादळें क्वचित होतात. परंतु अतिवृष्टीमुळें पूर येतात व त्यामुळें पिकांचें नुकसान वारंवार होतें.
इ ति हा स − प्राचींन काळीं अमहर्स्ट हा तलैंग अथवा मॉन राज्याचा भाग होता. या भागाबद्दल मॉन व सयामीं लोक यांचीं कित्येक शतकें भांडणें चाललीं होतीं. तेराव्या शतकांत ज्यावेळीं ब्रह्मी राज्याचा विस्तार झाला त्यावेळीं सालवीन नदीपर्यंत आल्यावर त्याची वाढ खुंटली व त्या नदीच्या पश्चिमतीरावर मार्ताबान हें शहर वसविलें गेलें. नदीच्या पूर्वतीरावर सयामी राज्याचा अधिकार होता. तेराव्या शतकाच्या अखेरीस मार्ताबानचें राज्य सयामचा दोस्त वरीयु यानें स्थापलें. पण नंतर लवकरच तें राज्य पेगूच्या राज्यांत समाविष्ट झालें. सतराव्या शतकांत व अठराव्या शतकाच्या प्रारंभीं सयामी लोकांनीं या जिल्ह्यांत पाय रोवला होता. परंतु अलांगपया यानें त्यांस हांकून दिलें. हा ब्रह्मी असून सयामवरील मोहीम करून आल्यावर मार्ताबानपासून दुसर्या टप्प्याच्या आंतच इ. स. १७६० सालीं मरण पावला. इ. स. १८२६ साली यंदावो तहान्वयें हा मुलूख ब्रिटिश सरकारच्या ताब्यांत आला. पहिल्या ब्रह्मीयुद्धांत येथें कांहीं गडबड नव्हती. पूर्वी अमहर्स्ट हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण होतें. पण इ. स. १८२६ सालानंतर लवकरच ब्रिटिशांनीं मोलमेन हें मुख्य ठिकाण केलें. कारण अमहर्स्ट जवळील मार्ताबान त्यावेळीं ब्रह्मी राज्यांत होतें.
मोलमेनच्या पश्चिमेस एका मैलावर असलेल्या बिलुग्युन बेटावर फार प्राचीन अशीं मानलेलीं ६० बौद्ध देवळें आहेत. त्यांतील कांहीं बुद्धाच्या केंसांवर बांधलीं आहेत असें म्हणतात. लोकसंख्या (१९२१) ४१७२१०.
या जिल्ह्यांतील पांचषष्ठांश लोक बौद्ध धर्माचे आहेत. इ. स. १९०१ सालीं शेतकीवर उपजीविका करणारे शेंकडा ६३ लोक होते.
या जिल्ह्यांतील सखल जमीनींत भात उत्तम पिकतें कांहीं ठिकाणीं ऊंस देखील पिकतो. अतरन नदीकांठच्या बागांत संत्र्यांचीं लागवड होते. त्याचप्रमाणें सुपारी, नारळ केळीं हीं देखील पुष्कळ पिकतात. इ. स. १९०३-४ सालीं ५७१ चौरस मैल जमीन लागवडीखाली होती.
या प्रांतांतील गाई व म्हशी यांच्या अवलादी जरा चांगल्या प्रतीच्या आहेत. जिल्ह्यामध्यें मासळी मारण्याचीं ठिकाणें नाहींत.
व्या पा र−मोलमेन येथें सोन्याचांदीचें काम व हस्तिदंती काम चांगलें होतें.
या भागाचा जलमार्गाचा व्यापार मोलमेन बंदरांतून होतो. तांदूळ व इमारती लांकूड या बंदरांतून रवाना होतें. या भागाचा सयामशीं व्यापार बराच चालतो. या जिल्ह्यांत अद्यापि रेल्वे नाहीं.
या जिल्ह्याचे विभाग व टाऊनशिप पुढें दिल्याप्रमाणें आहेत:−
विभाग | टाऊनशिपट |
मोलमेन | मोलमेन |
कॉकरेक | कॉकरेक / कैकमरा |
आमहर्स्ट | चौंगझोन / मुडन / केंक्कमी / येलामेंग |
याचें एकंदर उत्पन्न इ. स. १९०३−०४ सालीं १४ ते १५ लाख रूपये होतें. मोलमेन येथें फक्त म्युनिसिपालिटी आहे.