विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅमहर्स्ट पेटा − युनायटेड स्टेट्स, मॅसॅच्युसेट्समधील अॅमहर्स्ट पेट्यांचें गांव. नॉर्दम्टनपासून ईशान्येस हें सात मैल लांब आहे. हें गांव शिक्षणाकरितां नांवाजलेलें असून सुंदरहि आहे. येथें प्रख्यात अॅमहर्स्ट कॉलेज आहे; तें १८२१ मध्यें स्थापन झालें. याच्या बर्याच शाखा व इमारती आहेत. याखेरीज एक शेतकी कॉलेजहि या ठिकाणीं वसलें आहे.
हा पेटा १७३१ सालीं वसला गेला. जनरल जेफ्रे अॅमहर्स्ट ( १७१७−१७९७ ) च्या स्मरणार्थ याला सध्यांचें नांव दिलें. प्रसिद्ध कोशकार नोहा वेबस्टर या ठिकाणीं १८१२−२२ पर्यंत कोश संपादण्याचें काम करीत राहिला होता. एमिली डिकिन्सन व हेलेन फिस्के ( पुढें नांवाजलेली हेलेन हंट-जॅक्सन ) हिचा जन्म या गांवीं झाला.