विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमळनेर. ता लु का.−(मुंबई इलाखा.) पूर्व खानदेश जिल्ह्यांतील एक तालुका. यांत पारोळा पेट्याचाहि समावेस होतो. २००४२’ ते २१०१३’ उत्तर अ. व ७४०५२’ ते ७५०१४’ पूर्व रे. यांच्या दरम्यान. क्षेत्रफळ ५२८ चौरस मैल. यांत अमळनेर व पारोळा हीं दोन मोठीं गांवें व २२८ खेडीं आहेत. लोकसंख्या सुमारें सवालक्ष. सन १९०३-०४ सालीं जमीन महसूल ३.४ लाख व इतर कर २३००० रू.
येथील जमीन सपाट आहे. हवा निरोगी असून पावसाची सरासरी २३ इंच आहे.
गां व.− धुळ्याच्या उत्तरेस २१ मैलांवर आग्रारोडच्या पूर्वेस एक मैलावर बोरी नदीच्या कांठी उ. अक्षांश २१० ३’ व पूर्व रेखांश ७५० १’ यांवर सुमारें पंधरा हजार लोकवस्तीचा हा गांव असून अमळनेर तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. शहरांत दोन तीन मुख्य रस्ते असून दुतर्फा दुमजली घरें आहेत. त्यांपैकीं कांहींवर लांकडी नक्षीकाम उत्तम आहे. येथें धान्याचा वगैरे बराच व्यापार चालतो. मे महिन्यांत सखारामबोवा साधूंच्या पुण्यतिथीनिमित्त वाळवंटांत मोठी जत्रा भरते. येथें मामलेदार कचेरी व एक शाळा आहे.
येथें एक किल्ला असून तो दोनशें चौरस फूट आहे. याच्या तिन्ही बाजूंस गांव असून चवथ्या बाजूस नदी आहे. याच्या भोंवतीं दगडी तट असून गांवाभोंवतीहि एक भिंत होती. हा १८१८ मध्यें माधवराव राजे बहाद्दर यानें ब्रिटिशांच्या स्वाधीन केला.
तप्तीव्हॅली रेल्वे झाल्यापासून या गांवाचें महत्त्व बरेंच वाढलें आहे. येथें जी. आय. पी. व तप्तीव्हॅली रेल्वे यांचें जंक्शन आहे. येथें एक कापडाची गिरणी स्थापन झाली आहे खानदेश एज्युकेशन सोसायटी नांवाची शिक्षणसंस्था स्थापन झाली असून तिचें एक हायस्कूल व बोर्डिंग आहे. ही संस्था राष्ट्रीय झाली होती तिनें वाङ्मय, कला, वैद्यक व शास्त्र शिकण्याकरितां महाविद्यालयहि काढलें होतें. पण ही पुन्हां सरकारी मदत घेऊं लागली आहे व कॉलेज काढण्याच्या तयारींत आहे. येथें एक फिलॉसॉफिकल सोसायटी स्थापन झाली असून कांहीं अभ्यासकांस वृत्ति देऊन आश्रय देते. संस्थेचें एक त्रैमासिक चालू आहे. एकंदरींत खानदेशांत शिक्षणाकरितां अमळनेर प्रसिद्ध आहे.