विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमावसु - पितरांपैकीं एक हा मोठा इंद्रियनिग्रही होता. याविषयीं अशी कथा आहे कीं, कोणी एका पितराची मानसकन्या अच्छोदा, हिला याच्याविषयीं एके कालीं कामवासना उत्पन्न झाली असतां हा तिला वश झाला नाहीं. हें वर्तमान इतर पितरांस कळून त्यांनीं याची स्तुति केली व प्रसन्नांत:करणानें, ज्या तिथीस हा ब्रह्मचर्यापासून ढळला नाहीं, ती तिथी सर्व पितरांस प्रिय होईल असा आशीर्वाद देऊन, याच्याच नांवावरून त्या तिथीचें नांव अमावास्या ठेवलें. अच्छोदेस तूं मृत्युलोकीं पतन पावशील असा शाप दिल्यानें पुढें ती पतन पावून, मत्स्यगंधा ( सत्यवती, ) अशा नांवानें भूमीवर जन्मास आली. ती सांप्रत स्वर्गांत अष्टका नांवाच्या देवतेच्या स्थानीं आहे असें मानतात. ( मत्स्य पु. अ. १४ ) [ प्रा. को. ].
( २ ) पुरूरवा राजाला उर्वशीपासून सहा पुत्र झाले होते, त्यांपैकीं एक अमावसु हा होता. [ महाभारत आदिपर्व अ. ७५ ].