विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमितगति − हा जैनधर्मी दिगंबर पंथापैकीं एक प्रसिद्ध साधु असून नामांकित कवि व धर्मग्रंथकारहि होता. ज्यावेळीं मालव मण्डलाधीश्वर प्रतापशाली राजा मुंजराव राज्य करीत होता. त्यावेळीं हा जैनयति होऊन गेला. मुंजराज हा मोठा चतुर, ज्ञानसंपन्न, स्वत: कवि व गुणग्राही असल्यामुळें त्यानें आपल्या सभेंत अनेक विद्वान व गुणी लोकांस आश्रय देऊन त्यांचा मोठा सन्मान केला होता. अमितगति, धनपाल कवि (तिलकमंजरी ग्रंथाचा कर्ता), पद्मगुप्त, धनंजय ( दशरूपकाचा कर्ता ), हलायुध इत्यादि अनेक विद्वन्मुकुटमणी त्याच्या सभेंत चकाकत होते. त्या सर्वांत श्रेष्ठत्वाचा मान अमितगति, धनंजय व धनपाल यानाच असावा असें त्यांच्या उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट ग्रंथावरून वाटतें. अमितगति हा आपल्या नांवाप्रमाणें विशाल व खोल बुद्धीचा कवि असावा असें दिसतें. धर्मपरीक्षा व श्रावकाचार या दोन ग्रंथांमुळें याची धार्मिक वाङ्मयांत उत्तम प्रसिद्धि आहे. त्याचे सर्व ग्रंथ जरी उपलब्ध नसते, तरी व धर्मपरीक्षा हाच ग्रंथ उपलब्ध असता याची प्रसिद्धी जैनवाङ्मयांतून कधींच नष्ट झाली नसती!
जैनधर्मीय माथुरसंघांतल्या श्रेष्ठ, संयमी व विद्वान आचार्यांमध्यें अमितगति हा होऊन गेला. अर्थात याच्या ठिकाणीं असलेल्या बुद्धिमत्तेमुळें याचीहि आचार्यांत गणना झाली. माथुरसंघातल्या शांत वीरसेन सूरिश्रेष्ठानंतर त्यांचे शिष्य नेमिषेण हे होऊन गेले. त्याचे पश्चात् त्यांचे शिष्य महात्मे माधवसेनसूरि सकलवंद्य असे होऊन गेले व त्याचे पश्चात् अमितगति हाच त्या माथुरसंघांत आचार्य बनला. त्याचा गुरू माधवसेनमुनि, वीरसेन-देवसेन-अमितगति ( मणनाथ )-नेमिषेण-माधवसेन-अमितगति ( चरित्रनायक ) अशी परंपरा पीठर्सनच्या ४ थ्या रिपोर्टांत आढळते ( ब्रॉ. ब्रॅ रा. ए. सो. १८९४ ) दिगंबर जैनांचे चार संघ:- (१) काष्ठासंघ; (२) मूलसंघ; (३) माथुरसंघ व (४) गोप्यसंघ हे होत. माथुरसंघाच्या नांवावरून हा संघ गुजराथेंतील असावा असें दिसतें.
अमितगति यतीनें आपला ‘सुभाषितरत्नसंदोह’ हा ग्रंथ विक्रमसंवत् १०५० पौष शुद्ध पंचमीला पूर्ण केल्याचा उल्लेख आम्ही पुढें दिला आहे. म्हणजे इ. स. ९९४ मध्यें हा ग्रंथ रचिला गेला. धर्मपरिक्षाग्रंथाच्या शेवटीं तो ग्रंथ संवत् १०७० मध्यें म्हणजे इ. स. १०१४ मध्यें रचिल्याचा उल्लेख केला आहे. व मुंज हा इ. स. ९८० ते सन १०२२ पावेतां राज्यारूढ असल्याचें अनुमान आहे. यावरून हा कवि मुंजाच्यावेळीं म्हणजे दहाव्या शतकाच्या उत्तरार्धांत व अकराव्याच्या पूर्वार्धांत होऊन गेला हें ठरतें.
याचा जन्म कोठला व केव्हांचा, याच्या जन्मदात्या मातापित्याचें नांव काय, काय म्हणून यांनें दीक्षा घेतली, याचा आयु:क्रम दीक्षेपूर्वीं कसा व्यतीत झाला, निधन कोठें झालें, वगैरे गोष्टी समजण्यास आज कांहींच साधन उपलब्ध नाहीं. जी कांहीं माहिती काढावयाची ती सर्व पुढील तीन ग्रंथावरून, व या ग्रंथांत माहिती तर कर्त्याचे नांव एवढीच !
या यतीनें एकंदर किती ग्रंथ रचिले याचा अद्याप नीट शोध लागत नाहीं. पण आज उपलब्ध असलेले श्रावकाचार (उपासकाचार ), सुभाषितरत्नसंदोह व धर्मपरीक्षा हे तीन अमोल काव्यात्मक धर्मग्रंथ मात्र पाहण्यांत आहेत. तेव्हां त्यांसंबंधानें आपण येथें थोडा ऊहापोह करूं.
श्रा व का चा र.−हा ग्रंथ यानें विक्रम सं. १०५० मध्यें रचिल्याचा उल्लेख श्रीयुत हिराचंद नेमचंद ( सोलापूर ) यांनीं महाराष्ट्र भाषेंत भाषांतर केलेल्या श्रीमान् सामंतभद्र आचार्यांच्या रत्नकरंड श्रावकाचार पुस्तकाच्या प्रस्तावनेंत केला आहे. परंतु ग्रंथाच्या शेवटीं ( पांगळ यांच्या जवळच्या प्रतींत ) तशा तर्हेचा उल्लेख मुळींच आढळत नाहीं. शिवाय त्याच वर्षांत सुभाषितरत्नसंदोह पूर्ण केल्याचा उल्लेख स्वत: कवीनेंच त्या ग्रंथाच्या अंतीं केला आहे. तेव्हां हा घोंटाळा काय आहे हें समजण्यास नीट मार्ग नाहीं. किंवा या कवीची बुद्धि अति तीक्ष्ण असल्यामुळें कदाचित् या कवीनें त्याच वर्षांत दोन्हीहि ग्रंथ पूर्ण केले असतील ! हा ग्रंथ केवळ धर्मविषयक आहे. यांत जैनानें ( श्रावकानें ) पाळावयाचा आचार अथपासून इतिपर्यंत वर्णिलेला आहे. यांत उपदेशाचा क्रम पूर्वीच्या सामंतभद्र, वसुनंदी, चामुंडरायप्रभृति आचार्यांच्या पद्धतीला अनुसरूनच वर्णिला आहे. याचा विस्तार बराच आहे. याचे एकंदर पंधरा परिच्छेद असून त्यांतील श्लोकसंख्या सुमारें साडे तेराशें आहे. या ग्रंथाची रचना सुबोध, रूपकबद्ध व इतकी सोपी आहे कीं, संस्कृत भाषेचें साधारण ज्ञान असणार्याला तो सहज समजेल.
पहिल्या दोन परिच्छेदांत नरजन्म व धर्ममाहात्म्य सांगून तिसर्यांत धर्माचें मूल जें सम्यक्त्व त्याचें सप्ततत्त्वांसहित विवेचन केलें आहे.
तिसर्या परिच्छेदांत एकांतमतवादी जे जीवाचें आस्तिक्य कबूल करीत नाहींत, जे परलोक आहे असें मानीत नाहींत, जे सर्वज्ञ वीतरागावाचून लोभी, मांसभक्षक, मद्यपानासक्त ( शाक्त वगैरे ) यांच्या ठिकाणीं देवत्वाची योजना करतात, जे क्षुद्रदेवाला पूजितात, अशांचें अगदीं संक्षेपत: खंडन केलें आहे. चौथ्यांत मद्य, मांस, मध, रात्रिभोजन हीं निंद्य आहेत म्हणून त्याचा त्याग करण्यास सांगितलें आहे. पांचव्यांत पंचाणुव्रते-अहिंसा, सत्य, अचौर्य, परस्त्रीत्याग व परिग्रहप्रमाण; तीन गुणव्रतें-दिगव्रत, अनर्थदंड व भोगोपभोग परिणाम; चार शिक्षाव्रतें-देशावकाशिक, सामायिक, प्रोषधोपवास व वैयावृत्य; यांचें वर्णन केलें आहे. सहाव्यांत व्रतमाहात्म्य. सातव्यांत अकरा प्रतिमा; आठव्यात षडावश्यकाचें वर्णन व नवव्यांत दान, पूजा, शील, उपवास, यांचें स्वरूप; आणि सत्पात्र कोणतें व अपात्र कोणतें, तसेंच दान कोणास द्यावें यांचें विवेचन; दहाव्यांत अभयदान व करूणदान यांचें वर्णन; व बाकीच्यात जिनेश्वराचें व सिद्धांचें वर्णन, बारा अनुप्रेक्षा, समाधि, मरण इत्यादिकाचें वर्णन आहे. याप्रमाणें हा ग्रंथ केवळ धर्मविषयकच आहे.
सु भा षि त र त्न सं दो ह :−हा ग्रंथ कवीनें विक्रम सं. १०५० ( इ. स. ९९४ ) मध्यें शरद्ऋतूंत पौषशुद्ध पंचमीला संपूर्ण केल्याचा कवीनें याच ग्रंथाच्या शेवटीं उल्लेख केला आहे. सुभाषितरत्नसंदोह हा रत्न नावाप्रमाणेंच सुभाषितश्लोकरूपी रत्नांनीं रत्नाकराप्रमाणें ओतप्रोत भरलेला असून त्यात आत्म्याला ( जीवाला ) दुर्गतीला नेणारे जे मनोविकार-कोप, माया, अहंकार, लोभ, शोक, व पंचेंद्रियें; तसेंच जीवाची अवनति करणारे-दुर्जन, मद्य, मांस, मधु, काम, वेश्यासंग, द्यूत, याचें-हे किती नीच आहेत यासंबंधानेंदृष्टात व रूपकबद्ध अशा काव्य वाणीनें वर्णन करून त्याची संगति या जीवानें सोडावी म्हणून त्याविकाराचें खंडण केलें आहे; सासारिक विषय किती क्षुल्लक आहेत हें दर्शवून जीवाचे हितकारी जे मित्र सज्जन, दान, देव गुरू, धर्म, चारित्र्य यांचें वर्णन केलें आहे व शेवटीं श्रावकधर्माचें निरूपण केलें आहे.
ध र्म प रि क्षा −ह्या ग्रंथाची समाप्ति संवत् १०७० मध्यें केल्याचा उल्लेख कवीनें केला आहे.
संवत्सराणां विगते सहस्त्रं ससत्पतौ विक्रम पार्थिवस्य |
इदं निषिद्धान्यमतं समाप्तंजिनेद्र धर्ममिति युक्तिशास्त्रम् ||
हा ग्रंथ एकूण सुमारें दोन हजार श्लोकांचा ( १९४१ ) आहे . व एवढा मोठा थोरला काव्यात्मक ग्रंथ या कवीनें अवघ्या दोन महिन्यांत संपविला असें त्यानें केलेल्या उल्लेखावरून दिसतें.
[ सं द र्भ ग्रं थ.−तात्या नेमिनाथ पांगळ, विविधज्ञानविस्तार पुस्तक ३९, ३. पीटर्सन्स रिपोर्ट पुस्तक ४. भांडारकर रिपोर्ट १८८२−८३. वेबर-धर्म परिक्षेवर विवेचन ( १. पा. १८२ व १११० ).