विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमिनदीवि बेटें.−लखदीव बेटाच्या उत्तरेकडील द्विपसमूहास हें नांव आहे. हीं बेंटें मद्रास इलाख्याच्या दक्षिण कानडा जिल्ह्यास जोडलेलीं आहेत. हीं पांच बेटें असून त्यांचें क्षेत्रफळ ३ चौरस मैल आहे. पोंवळ्याच्या खडकावर हीं बेटें वसलीं असून समुद्रसपाटीपासून तीं फार तर १०|१५ फूट उंचीवर आहेत.
सुमारें दोन शतकेंपर्यंत हीं बेटें कन्नानोरच्या जमीनदाराच्या अमलाखालीं होतीं; परंतु इ. स. १७८६ सालीं तेथील रहिवाशांनीं बंड उभारून. ह्मैसूरचें प्रभुत्व कबूल केलें. इ. स. १७९९ सालीं ज्यावेळीं कंपनीसरकारनें दक्षिण कानडा जिंकला त्या वेळीं त्या जिल्ह्यांत या बेटांचा अंतर्भाव होत होता. त्या वेळीं कन्नोरच्या बिबीस नुकसानभरपाई म्हणून ५२५० रूपये देण्यांत येऊन बेटें कंपनीच्या मुलुखास जोडण्यांत आलीं. येथें नेमलेल्या अधिकार्यास ‘मोनेगर’ असें म्हणतात व त्यास तिसर्या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटचे अधिकार असतात. येथें पंचायत असून खटल्यांचे निकाल यांच्या मदतीनें मोनेगर पाहतो. लोकसंख्या सुमारें चार हजार आहे.
येथें सध्यां वस्ती मुसुलमानांची आहे पण हे पूर्वी हिंदु होते. ते अशुद्ध मलयालम भाषा बोलत असल्यामुळें ते मलबारांतून येथें आले असावे हें स्पष्ट आहे. येथील रहिवाशी येथें नारळाची लागवड व काथ्याचे दोर तयार करतात. इ. स. १९०३-४ सालीं केवळ उत्पन्न २३८७ रूपये होतें; परंतु यांत कन्नानोरच्या बिबीस देण्यांत येणारा ५२५० रूपये पेशकाश दिशेबांत घेतलेला नव्हता.