विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमीरखान. - हा मुरादाबाद जिल्ह्यांतील सुंबळ गांवचा राहणारा. याचा बाप मुल्ला असून तो थोडा जमीन जुमला बाळगून होता. अमीरखान आणि त्याचा धाकटा भाऊ करीमउद्दीन यांनीं जेव्हां उत्तर हिंदुस्थान सोडलें तेव्हां अमीर वीस वर्षाचा होता. त्याच्या गांवात त्याचें थोडेसे वजन होतें हें त्याच्यापाशीं दहा विश्वासू अनुयायी होते यावरून सिद्ध होतें. यांच्यासह तो अहिरवाडमधील राणादच्या जमीनदाराच्या पदरीं राहिला. पुढें माळव्यामधील पेशव्यांच्या एका मराठा सरदारानें त्याला आपल्याजवळ ठेविलें. येथून तो दुसर्या एका सरदाराच्या पदरीं राहिला. वरील सर्व नोकर्यांत अमीरखान आणि त्याचे अनुयायी शिबंदी म्हणून ठेविलेले असत; व त्यांच्यापैकीं प्रत्येकास दरमहा सरासरी तीन चार रूपये व त्यांच्या मुख्याला दहा पंधरा रूपये पगार मिळे. लवकरच अमीरखानाला चांगले दिवस आले. भोपाळच्या दरबारीं तेथील छुट्टाखान नांवाच्या दिवाणाचा अंत झाल्यावर दुफळी माजून प्रत्येक पक्ष आपल्या तैनातींत माणसें भरती करूं लागला. तेव्हां अमीरखान हा आपल्या हाताखालचे सहा घोडेस्वार व ६० पायदळ शिपाई यांच्यासह भोपाळ येथील हियात महंमदखान याच्याकडे नोकरीस राहिला. त्या ठिकाणीं वर्षभर राहिल्यावर तो दुर्जनलाल आणि जयसिंग या राघवगडच्या संस्थानिकांच्या तैनातीस राहिला. या संस्थानिकांनां दौलतराव शिंद्यानें त्यांच्या राज्यांतून हांकून दिलें तेव्हां ते स्वत:च्याच लोकांनीं लागवड केलेली जमीन लुटून कालक्रमणा करूं लागले.
या रजपूत संस्थानिकांचा आणि मराठ्यांचा जेव्हां तंटा होऊं लागला त्या वेळेस अमीरखानानें आपली मर्दुमकी गाजवून दाखविली. त्यामुळें त्याला पांचशें लोकांचें आधिपत्य मिळून शिवाय पालखीचा मान मिळाला व पंधरा हजार पेंढारी सैन्यामध्यें त्याला महत्त्वाचा दर्जा प्राप्त झाला. पण रजपुतांशीं भांडण झाल्यामुळें त्याची पुढील बढती थांबली. या भांडणांत त्याला दगडांचा इतका मार खावा लागला कीं सिरोंज येथें तो तीन महिने अंथरूणावर पडून होता. या प्रसंगामुळें दुर्जनलालची नोकरी सोडून तो बलराम इंगळे नांवाच्या मराठा सरदाराच्या जवळ राहिला. इंगळे यावेळीं भोपाळच्या धामधुमींत गुंतला होता.
बलराम इंगळ्यानें अमीरखानाचा दर्जा पंधराशें माणसांच्या मनसबदाराइतका वाढवून फत्तेगडचा किल्ला त्याच्या हवालीं केला. पण तो लवकरच त्याला सोडावा लागला. तथापि त्यामुळें त्याचें नुकसान न होतां उलट त्याची यशवंतराव होळकराशीं मैत्री जडून त्याच्या उत्कर्षास प्रारंभ झाला.
यशवंतराव होळकर आणि अमीरखान यांचा प्रथम संबंध आला तेव्हां त्यांचें नातें बरोबरीचें होतें. पण यशवंतरावाचा दर्जा एका मोठ्या संस्थानाचा अधिपति व तडफदार योद्धा म्हणून चढत जाऊन त्यांच्यामधील नातें पुढें राजा आणि आश्रित असें बनलें. तथापि यशवंतराव अमीरखानास नेहमीं आपला भाऊ म्हणून संबोधी, आणि आपल्या इतर सरदारांपेक्षां त्याच्या बडेजाव जास्त राखी. इ. स. १८०२ च्या नोव्हेंबरच्या सुमारास सुवर्णदुर्गाच्या आसमंतांत हा आला असल्याचें ऐकून बाजीराव तेथून पळाला. यावरून त्याचें त्यापूर्वींच यशवंतराव होळकराशीं सख्य झालें असावें असें दिसतें. (ग्रांटडफ. पु. तिसरें पृ. १९५ व २१०). अमीरखान हा आपल्या सैन्याचा स्वतंत्र अधिकारी असून तो आपल्या इच्छेप्रमाणे कोणालाहि नेमूं किंवा काढूं शकत असे. परंतु याप्रमाणें तो अगदीं स्वतंत्र होता तरी त्याची स्थिति फारशी चांगली नव्हती. त्याचे सैनिक संख्येनें त्याच्या ऐपतीपेक्षीं जास्त असून ते नेहमीं बंडाळी माजवीत व दरवर्षीं सहा महिन्यावर आपल्या मुख्याला अटकेंत ठेवीत. आपल्या बंडखोर सैनिकांच्या त्रासामुळें व त्यांच्या वेतनाची तरतूद करण्याच्या आवश्यकतेमुळें त्याला ठराविक असें कांहींच धोरण ठेवतां येत नसे याचें उदाहरण म्हणजे सागर येथें त्याच्या पठाणांचा अतिरेक व त्याहूनहि जास्त म्हणजे पुण्यास घडलेला प्रसंग होय (इ. स. १८०३). त्या वेळीं त्यांनीं त्याला पकडून बेदम मारलें इतकेंच नव्हे तर त्याच्या पागोट्याचा फांस त्याच्या गळ्याला लावून ते त्याचा जीव घेण्याच्या बेतांत होते. यशवंतरावानें ही बंडाळी मोडून बंडखोरांनां शिक्षा ठोठावल्या; तरी त्यांचा समूळ नाटनाट करण्यास अमीरखान कबूल होईना. कारण पुढें मागें ते आपला सूड उगवतील अशी त्याला भीति वाटत होती. प्रत्यक्ष पुण्याच्या शेजारीं सुद्धां गोहत्या करून अमीरखानाचे शिपाई हिंदूंनां चिडवीत. पण त्याबद्दल त्यांनां शिक्षा होत नसे, ही एकच गोष्ट ते इतर वेळीं किती उद्दामपणानें वागत असतील याची कल्पना येण्यास पुरेशी आहे. यशवंतराव त्यांनां नेहमीं कोठें तरी दूरच्या मोहिमीवर गुंतवून ठेवीत असे. तो त्यांनां लुटारूपेक्षां अधीक महत्त्व देत नसे, व त्यांचा उपयोग त्यांच्या पुढार्याशींच फक्त संबंध ठेवून करून घेतां येण्यासारखा आहे हें तो जाणून होता. उलटपक्षीं हे पेंढारिहि एका प्रमुख संस्थानिकाच्या वतीनें लुटालूट करण्यांत केवढा फायदा आहे हें जाणून होते. व अमीरखानास त्यांचा पुढारी होण्याचें श्रेय केवळ होळकर घरण्याशीं त्याचा संबंध असण्यावरच अवलंबून होतें.
यशवंतराव व अमीरखा विभक्त होईपर्यंत अमीरखानाचा इतिहास यशवंतरावाच्या इतिहासाशीं संबद्ध आहे. मराठ्यांच्या इतिहासांत त्याचा उल्लेख कित्येक ठिकाणीं येतो. इ. स. १८०३ च्या एप्रिल महिन्याच्या सुमारास फत्तेसिंग माने व अमीरखानाची कांहीं फौज यांची कृष्णा व भीमा नद्यांच्या दरम्यान लुटालूट चालली होती. जनरल वेलस्ली आल्यावर त्यानें ह्यांनां लुटालूट बंद करण्यास सांगतांच फत्तेसिंग माने परत फिरला. पण तो भीमा नदी ओलांडून गेला नसेल तोंच अमीरखानास फत्तेसिंग बाजीरावास जाऊन मिळतो कीं काय अशी शंका येऊन त्यानें त्याला पकडून त्याचे लोक उधळून लावण्याचा प्रयत्न केला (ग्रांटडफ पु. ति. पृ. २३०). पुढें १८०४ सालीं होळकर व इंग्रज यांच्या दरम्यान युद्ध चाललें असतां, अमीरखानानें बुंदेलखंडांतील एका किल्लेदाराच्या मदतीस जाऊन तो किल्ला सर करण्यास आलेल्या इंग्रजांच्या सैन्यांतील तोफखाना हस्तगत केला. व तोफखान्यावरील पन्नास एक लोक व पायदळाचे दोन कंपू कापून काढले. यानंतर त्यानें काल्पीवर हल्ला केला पुढें कित्येक दिवसपर्यंत त्यानें बुंदेलखंडांत इंग्रजांशीं गमिनी काव्यानें लढणें चालू ठेविलें. ( कित्ता पृ. २७७ ). १८०५ सालीं इंग्रजांनीं भरतपुरास वेढा दिला तेव्हां अमीरखान हा वेढा देऊन बसलेल्या. सैन्यास त्रास देण्याकरितां बुंदेलखंडांतून परत आला, व वेढ्यांतील शत्रूचें कांहीं सैन्य दुसरीकडे काढून घेण्याकरितां रोहिलखंडांत जाऊन तेथें तो लुटालूट करूं लागला. इंग्रजांचें सैन्य पाठीवर असतांहि कांहीं दिवस त्यानें हें काम चालू ठेविलें, पण पुढें जेव्हां इंग्रजांच्या सैन्यानें त्यास गांठून त्याचा पराभव केला व लोकहि त्याचा प्रतिकार करण्यास सज्ज झाले तेव्हां तो पुन्हां भरतपुरास होळकरांच्या सैन्यास येऊन मिळाला ( कित्ता पृ. २९४-९७ ).
१८०५ च्या डिसेंबरांत सेनापति लेक याजबरोबर तह करून यशवंतराव होळकर उत्तर हिंदुस्थानांतून परत फिरल्यावर अमीरखान व होळकर यांचा संबंध फार दिवस राहिला नाहीं. जयपूर व जोधपूर येथील राजे उदेपूरच्या राजकन्येसाठीं आपसांत लढत असतां जयपूरच्या राजानें होळकरापाशीं मदत मागितल्यावरून होलकरानें अमीरखान यास त्याच्या पठाणांसह जयपुराकडे रवाना केलें ( इ. स. १८०८ ). जयपूर व जोधपूरमधील सदरहू भांडणाचा अमीरखानाच्या चरित्राशीं विशेष संबंध असल्यामुळें त्यासंबंधीं सविस्तर हकिगत मालकमच्या ‘मेमॉयर्स ऑफ सेंट्रल इंडिया’ या ग्रंथावरून पुढें दिली आहे.
जयपूरचा राजा जगत्सिंग याचा जोधपूरच्या राजाशीं उदेपूरच्या राजकन्येच्या विवाहाबद्दल तंटा होता. सर्व रजपुतांत उदेपूरचें राजघराणें श्रेष्ठ मानीत व त्याच्याशीं संबंध जडणें हा अतिशय मोठा मान समजून सर्व रजपूत राजांमध्यें तो घडून येण्याबद्दल अहमहमिका लागे. उदेपूरची राजकन्या कृष्णाकुमारी ही आपल्या उच्च कुलाच्या जोडीस आणखी अद्वितीय सौंदर्य घेऊन अवतरली होती. जोधपूरचा माजी राजा भीमसिंग याच्याशीं तिचा विवाह निश्चित झाला होता. त्याच्या मरणानंतर त्याचा दूरचा नातेवाईक मौनसिंग गादीवर बसला. पण दोन वर्षांनीं भीमसिंगाचा दिवाण सवाईसिंग यानें कोणीतरी एक खराखोटा राजपुत्र पुढें करून त्याला गादीवर स्थापण्याकरितां एक पक्ष तयार केला व आपला हेतु तडीस नेण्याकरितां जोधपूर आणि जयपूर येथील राजांमध्यें हाडवैर उत्पन्न करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मौनसिंग उदेपूरच्या राजकन्येशीं लग्न लावण्याची आशा धरून आहे हें कळतांच त्यानें जयपूरचा राजा जगतसिंग याला तिच्यासाठीं मागणी घालण्याची भर दिली. कृष्णाकुमारीच्या अप्रतिम सौंदर्याला हुरळून जगत्सिंगानें तिच्यासाठीं उदेपूरच्या राण्याकडे मागणी घातली व एक वेळीं हें लग्न निश्चित झाल्यासारखेंहि झालें होतें. पण जयपूरच्या राजाला कृष्णाकुमारी देण्याचें ठरलेलें ऐकून जोधपूरचा राजा आपला पहिला हक्क सांगू लागला व तिचा आपल्या प्रतिस्पर्ध्याशीं विवाह होऊं नये म्हणून तो वाटेल तें करण्यास सिद्ध झाला. अशा रितीनें रजपूत राजांमध्यें कलहाग्नि पेटतांच दोन्हीहि पक्षांनीं आसपासच्या संस्थानिकांस आपल्या मदतीस येण्याविषयीं विनंति केली. तेव्हां शिंद्यानें बापूजी शिंदे आणि सर्जेराव घाटगे या दोन क्रूर सरदारांनां आणि होळकरानें अमीरखानास या रजपूर राजांच्या मदतीस रवाना केलें. या भांडणामुळें दोनहि संस्थानांचें अतोनात नुकसान झालें. जयपूरला या शोकपर्यवसायी युद्धासाठीं कमींत कमी एक कोट वीसलाख रूपये तरी खर्च आला असावा.
मौनसिंग या लढाईंत गुंतला आहे असें पाहून सवाईसिंगानें धोकुलसिंग या बाप वारल्यावर जन्मलेल्या राजपुत्राला गादीवर बसविण्याविषयीं जोरानें खटपट चालविली. यावेळीं मौनसिंगाला मदतीची अत्यंत जरूर होती. परंतु सवाईसिंग केवळ आपण एकटाच त्याची बाजू सोडून गेला नाहीं, तर इतर सरदारांनां सुद्धां त्यानें फोडलें. यामुळें मौनसिंगाचा पराभव होऊन थोड्या अनुयायांसह त्याला पळ काढावा लागला. यावर जगतसिंगानें व त्याच्या पक्षाच्या मंडळींनीं जोधपूरची छावणी लुटून जोधपूरपर्यंत मौनसिंगाचा पाठलाग केला. तेव्हां ही संधि साधून इकडे जोधपुरांत धोकुलसिंग याला गादीवर बसविण्यांत येऊन बहुतेक सर्व राठोड वीरांनीं त्याच्याशीं इमान राखण्याविषयीं शपथ घेतली.
अशा रीतीनें हें भांडण बंद पडल्यासारखें वाटलें; पण मौनसिंग कच खाणारा माणूस नव्हता. त्यानें प्रथमपासूनच शत्रुपक्षांत दुफळी करण्याचें काम चालविलें होतें, व बरेच दिवसपर्यंत लांबलेल्या वेढ्यामुळें त्याला जरा जोर आला. अमीरखानानें त्याचें म्हणणें ऐकिलें आणि पगार थकल्याचा बहाणा करून वेढा देणार्या सैन्यापासून तो फुटून निघाला, व जोधपूर आणि जयपूर हद्दींतून लुटालूट करूं लागला. जयपूरच्या प्रत्येक सरदाराला त्याच्या लुटालुटीमुळें बरेंच नुकसान पोंचून त्यांनीं जगतसिंगाकडे ओरड केली, तेव्हां त्यानें अमीरखानावर एक तुकडी पाठवून दिली. प्रथम अमीरखान टोंकपर्यंत मागें हटला, पण लवकरच त्याला तोफा व सैन्य यांची मदत मिळून त्यानें जयपूरच्या सैन्यावर हल्ला करून त्याचा सपशेल पराभव केला. आतां अमीरखान जयपुरांत प्रवेश करतो असें वाटून तेथील लोक मोठे हवालदिल झाले. पण दुसर्या कित्येक प्रसंगाप्रमाणेंच यावेळींहि अमीरखानानें जें वर्तन केलें त्यावरून त्याची लुटारू लोकांचा नायक होण्यापेक्षां कांहींच अधिक महत्त्वाकांक्षा नव्हती असें लोकांच्या निदर्शनास आलें. जयाचें मोठें बक्षीस सोडून तो जयपूरच्या आसमंतांत केवळ लूटालूट करण्यांतच समाधान मानून राहिला.
जयपूरच्या सैन्याच्या पराभवाची वार्ता समजतांच वेढा घालणार्या सैन्यांत मोठा गोंधळ उडाला आणि जगतसिंगानें राजधानीला परत फिरण्याचा बेत करून शिंद्याकडील मदतीस आलेल्या लोकांनां आपल्याला तेथपर्यंत सुरक्षित पोंचविण्याबद्दल मोठी रक्कम देऊं केली. पहिल्या लढाईंत जिंकून घेतलेला तोफखाना व लूट जयपूरचा राजा परत घेऊन जाऊं लागला तेव्हां जोधपूरच्या इमानी राठोड वीरांनीं त्याच्यावर हल्ला करून ती परत मिळविली व अमीरखानास मिळून ते मोठ्या समारंभानें जोधपुरांत प्रवेश करते झाले.
अशा रितीनें मौनसिंगाचें गेलेलें वैभव पुन्हां त्याला परत मिळालें. पण त्याचा शत्रु सवाईसिंग. जिवंत असे पावेतों त्याला मोठी धास्ती होती. सवाईसिंगानें नागारेचा आश्रय घेतला होता. मौनसिंगानें अमीरखानाला त्याच्यावर चाल करून जाण्यास सांगितलें व त्याबद्दल आगाऊ दोन लाख रूपये व काम फत्ते झाल्यावर मोठें बक्षीस देऊं केलें. खानानें हें काम हातीं घेतलें, पण शक्तीपेक्षां युक्तीचाच अवलंब करण्याचे त्यानें ठरविलें. मौनसिंगाच्या कृतघ्नपणाविषयीं संशय येऊन आपण इकडे आलों आहों असा बहाणा करून तो नागोरपासून थोड्या मैलांवर उतरला व सवाईसिंगाशीं त्यानें सख्याचें बोलणें सुरू केलें. सवाईसिंगाला यांत कांहीं कपट असावें असा संशय आला, पण अमीरखानानें त्याजकडे पाठविलेल्या वकिलानें अमीरखानाच्या सचोटीबद्दल हमी भरून सवाईसिंगाकडून अमीरखानाला भेटावयास येण्याचें वचन घेतलें. वचन पुरें करण्याची वेळ आली तेव्हां सवाईसिंग कचरूं लागला पण अमीरखान स्वत: त्याला भेटावयास गेला व शपथा वगैरेंनीं त्याचें मन वळवून त्यानें त्याला विश्वास संपादन केला परंतु अखेरीस सवाईसिंग अमीरखानाच्या भेटीस आला तेव्हां अमीरखानानें आपलें खरें रूप प्रगट करून सवाईसिंग व त्याच्याबरोबर आलेले अनुयायी या सर्वांस कंठस्नान घातलें. सवाईसिंग या बक्षिसाला कितीहि पात्र असला तरी अमीरखानाचा भयंकर गुन्हा त्यामुळें कमी होत नाहीं. त्याच्या अंगीं माणुसकी किंवा नीतिमत्ता बिलकुल वास करीत नव्हती हें यावरून उघड सिद्ध होतें.
वरील गोष्टी घडत असतांना इकडे यशवंतरावास वेड लागून त्याला अटकेंत ठेवण्याची आवश्यकता दिसूं लागली. हें ऐकून अमीरखान नागोर उध्वस्त केल्यावर रामपुरा येथें आला. तेथें असें ठरलें कीं अमीरखान यानें तुळसीबाईच्या नांवावर होळकराचा सर्व राज्यकारभार चालवावा ( इ. स. १८०८-ग्रांटडफ पु. ति. पृ. ३२१ )। यानंतर अमीरखान होळकर आणि नागपूरचे भोंसले या दोघांत कांहीं हक्कासंबंधीं तंटे होते ते मिटविण्याचा बहाणा करून नागपूरकर भोंसल्यांच्या मुलुखांत शिरला [ इ. स. १८०९ ]. पण वास्तविक त्याचा हेतु केवळ लुटालूट करण्याचाच होता. अमीरखान आपला तोफखाना आणि पायदळ जोधपूर येथें महंमदशहा खानाच्या स्वाधीन करून आला होता, तरी त्याच्या बाजूस सर्व पेंढारी आणि भोपाळचा नबाब मिळाल्या कारणानें त्याचें सामर्थ्य बरेंच वाढलें होतें. भोपाळच्या नबाबाचें रघूजी भोंसल्याशीं वांकडें असल्याकारणानें तो या प्रसंगीं अमीरखानास येऊन मिळाला होता. परंतु अमीरखानास आपलें लुटालुटीचें कार्य अप्रतिबंधपणें करावयास मिळालें नाहीं. इंग्रजांनीं मध्यें पडून त्यास रघूजीच्या मुलुखांतून नर्मदापार हांकून लाविलें ( ग्रांटडफ पु. ति. पृ. ३२५ ).
यावेळीं होळकराच्या संस्थानांत माजलेली बंडाळी, शिंद्याच्य राज्यांत असणारी अस्वस्थता, निजामाच्या प्रजेंत शिरलेलें राजद्रोहाचें वारें, आणि अमीरखानाच्या हाताखालीं असलेलें अवाढव्य सैन्य यांचा विचार करतां अमीरखानास मुसुलमानी सत्ता पुन्हां प्रस्थापित करण्यास ही वेळ अतिशय अनुकूल होती यांत संशय नाहीं. पण त्याचा तशा प्रकारचा केव्हांहि उद्देश नव्हता असें मानण्याला बरीच जागा आहे. त्याचे पठाण अनुयायी नेहमीं म्हणत कीं, हा दिल्लीचा बादशहा होईल हें एका फकिरानें केलेलें. भविष्य बहुतेक खरें ठरणार आहे. पण अमीरखानानें स्वत:कधीं तशी इच्छा मनांत धरली नाहीं किंवा तसें त्यानें बोलूनहि दाखविलें नाहीं. तो स्वत:स केवळ होळकराचा आश्रित मानीत असे. इतकेंच नव्हे तर लुटारू सैन्याचा अधिपति होण्यापलीकडे राज्य स्थापण्याच्या दिशेनें त्यानें कोणताच प्रयत्न केलेला नाहीं.
नागोरहून परत आल्यावर आणि यशवंतरावर व त्याचें कुटुंब यांची धमर्कुवरपासून मुक्तता केल्यावर अमीरखान एका शोकपर्यवसायी नाटकांतील मुख्य नट बनला. जयपूर आणि जोधपूर येथील राजांत समेट घडवून आणण्याचें धोरण शहाणपणाचें व मुत्सद्दीगिरिचें होतें व तें तडीस नेण्याचें काम अमीरखानानें आपल्याकडे घेतलें. ही गोष्ट दुहेरी लग्नानें साधावयाची होती. म्हणजे जगतसिंगाला मौनसिंगाची मुलगी आणि मौनसिंगाला जगतसिंगाची बहीण देऊन ह्या दोन घराण्यांचा संबंध दृढ करावयाचा होता. हीं दोन लग्नें साधण्याकरितां तंट्याचें मूळ जी उदेपुरची राजकन्या कृष्णाकुमारी तिला नाहींसें करणें अवश्यक आहे असें अमीरखानाला वाटून त्यानें उदेपूरच्या मंत्र्यांनां आपला विचार पटवून देण्याचा प्रयत्न केला (इ. स. १८१०). भांडणाचें मूळ जिवंत असतांना हिंदुस्थानांतील बलाढ्य रजपूत संस्थानांतून शांति नांदणें शक्य नाहीं. एकाला मुलगी देणें म्हणजे दुसर्याला दुखविणें होय. बरें शेवटचा उपाय म्हणून मुलगी अविवाहित ठेवावी तर ती रजपूत कुळाला बट्टा लावणारी गोष्ट होय असा बुद्धिवाद लढवून अमीरखानानें आपली बाजू त्या लोकांपुढें मांडली. कृष्णाकुमारीच्या बापाला ही गोष्ट ( म्हणजे प्रत्यक्ष पोटच्या गोळ्याचा जीव घेणें किंवा तिला आत्महत्या करण्याला उद्युक्त करणें ) आवडली नाहीं; पण राण्याची बहीण चांदबाई हिनें हें दुष्कर्म अंगावर घेतलें व कृष्णकुमारीला आपल्या बापाची, घराण्याची व राष्ट्राची अब्रू वांचवण्याचा उपदेश करून तिच्यापुढें विषाचा प्याला केला. कृष्णाकुमारी शहाणी होती. तिनें सर्वांवरचीं संकटें दूर सारण्यासाठीं म्हणून आत्महत्या करण्याचें खुषीनें कबूल केलें, व एकामागून एक असें तीन प्याले विष गट्ट केलें. शेवटचा प्याला घेण्यापूर्वीं “हेंच लग्न माझ्या नशिबीं वाढून ठेवलें होतें” असे तिनें हृदयद्रावक उदगार काढिले. राजवाड्यांत काय चाललें आहे याची सर्वांनां जाणीव होती. तिच्या अप्रतिम लावण्यामुळें व तारूण्यामुळें सर्वांच्या मनावर फारच परिणाम झाला. उदेपूर शहरांत तिच्या मृत्यूची बातमी पसरतांच जिकडे तिकडे हाहा:कार उडाला व अशा अबलेचा बळी घेऊन ज्यांनीं सौख्य संपादन केलें त्यांच्या नामर्दपणाविषयीं छी: थू: होऊं लागली. लवकरच कृष्णाकुमारीची आई मुलीच्या शोकानें गतप्राण झाली. अमीरखानाचा या कृत्यांतील हस्तक जो अजितसिंग नांवाचा उदेपूरच्या थोर कुलांतील सरदार त्यानें उदेपूरला आणलेली नामोशी सुगवानसिंग ( करंधरचा संस्थानिक ) यानें आपल्या मानी वर्तनानें स्वच्छ केली असें म्हणण्यास हरकत नाहीं. कृष्णाकुमारीचा अशा रीतीनें अंत झालेला ऐकतांच तो महाराण्याच्या दरबारीं येऊन आपल्या कमरेची तलवार त्याच्या पायापाशीं ठेवून शांत पण करारी मुद्रेनें म्हणाला. “राणाजी माझ्या पूर्वजांनीं तीस पुढ्यांच्यावर आपली चाकरी केलेली आहे. तुमच्या विषयीं मला काय वाटतें हें बोलून दाखवितां येत नाहीं, पण आजपासून माझें शस्त्र आपल्या करितां कधींहि उचललें जावयाचें नाहीं.” यानंतर अजितसिंगाकडे वळून तो म्हणाला “रजपुतांच्या नांवाला तूं बट्टा लावला आहेस. तूं सतितहा होऊन मरशील.” सुगवानसिंग शेवटपर्यंत बोलल्याप्रमाणें वागला, व इकडे अजितसिंगहि संततिहीन होऊन शेवटीं तुच्छतेप्रत पावला.
इ. स. १८११ च्या आक्टोबरांत यशवंतराव होळकर मृत्यु पावला व तुळशीबाईनें मल्हारराव होळकरास दत्तक घेतलें. अमीरखान हा पुढें लवककरच राजपुतान्यांत गेला परंतु रामपुर्याहून निघण्यापूर्वीं त्यानें गफूरखान नामक आपल्या एक नातलगास तुळसीबाईकडून जहागीर देववून त्याला आपला प्रतिनिधि म्हणून तिजपाशीं ठेविलें ( ग्रांटडफ पु. ति. पृ ३२१ ).
उदेपूरचें प्रकरण आटोपल्यावर अमीरखान जोधपुरास गेला. जयपूर आणि उदेपूर यांच्यांतील भांडणें मिटल्यापासून त्याच्या सैन्याच्या मुसुलमानी तुकड्या लुटालुटीकरितां संबंध राजपुतानाभर हिंडत असत ( १८१२-१३ ). कधीं कधीं सैन्यांत बंडाळी होऊन किंवा सरदारामध्यें भांडणें होऊन किंवा चांगल्या तटबंदी प्रदेशांचा त्यांनां पुष्कळ विरोध होऊन त्यांचे लुटालुटीचे प्रसंग कांहीं काळ बंद पडत [ १८१४-१५ ].
थोड्या वर्षांतच, जोधपूरचें राज्य खालावत चाललेलें पाहून दिवाण इंदुराज आणि राजगुरू देवनाथ यांनीं देशांतील विध्वंसक माणसें दूर करण्याचें ठरविलें. त्यांनीं अमीरखानाला राज्य सोडून जावयास सांगितलें व तोहि तसें करण्यास कबूल झाला. पण आपली सर्व बाकी ताबडतोब चुकती करण्याविषयीं त्यानें आग्रह धरला. संस्थानानें आपल्या शक्त्यनुसार त्याची फेड केली व आतां सर्व कारभार सुरळीत चालेल असें सर्वांनां वाटलें. त्याप्रमाणें अमीरखानानें जोधपूर सोडलें व त्याचें थोडें सैन्य मात्र कांहीं बाकी वसूल करण्यासाठीं पाठीमागें राहिलें होतें. या सैन्यानें इंदुराजाला पेचांत धरलें व कांहीं बोलाचाली होऊन इंदूराज: आणि राजगुरू देवनाथ हे दोघेहि मारले गेले. अमीरखानानें ‘आपला यांत कांहीं संबंध नव्हता व सैन्याच्या उद्दामवृत्तीमुळें ही गोष्ट घडून आली’ असें वरकरणी दाखविलें. तरी त्याच्या हुकुमावरून व त्याला माहीत असतांना हा प्रकार घडला असें म्हणण्यास बरींच कारणें आहेत असें मालकम म्हणतो. देवनाथावर मौनसिंगाची फार भक्ति असल्यामुळें त्याला मोठा जबरदस्त धक्का बसून त्यानें ताबडतोब वैराग्यवृत्ति धारण केली त्यानें लोकांशीं संभाषण करणें सोडलें, श्मश्रू करविण्याचें बंद करून दाढीचे केंस वाढूं दिले आणि अशा स्थितींत तो केवळ मेल्याप्रमाणें आयुष्य कंठूं लागला. तेव्हां त्याचा मुलगा चतुरसिंग यानें राज्यकारभार हातीं घेऊन तो आपल्या मरणापर्यंत ( १८२२ ) चालविला. त्याच्या मृत्यूनंतर मात्र मौनसिंगानें आपलें वेड टाकून देऊन पुन्हां तो पूर्ववत राज्यकारभार पाहूं लागला.
अमीरखान परत जोधपूरला गेला नाहीं. पुढील दोन वर्षें तो जयपूर लुटण्यांत गुंतला होता. माधवराजपूरच्या किल्ल्याला त्यानें नऊ महिने वेढा दिला होता, व तो आपल्या बंडखोर सैन्याच्या मदतीनें तो घेणार इतक्यांत सर डेव्हिड ऑक्टरलोनी पेंढार्यांचा नायनाट करण्यासाठीं राजपुतान्यांत उतरला. अमीरखानाला जेव्हां दिसून आलें कीं, आपणांस या इंग्रज सेनापतीशीं विरोध करण्यांत यश येणार नाहीं, तेव्हां तो ब्रिटिशांनीं सांगितलेल्या अटीवर आपला लुटारूपणा सोडण्यास तयार झाला. या अटीमुळें त्याला जरी आपलें लुटारू सैन्य सोडून द्यावें लागलें तरी त्याला स्वत:ला संस्थानिकासारखी जहागिरी मिळाली; अर्थात् या तहानें त्याचें स्वत:चें कांहींच वाईट झालें नाहीं. उलट होळकरांच्या राज्यांतील त्याच्याकडे असलेला जवळ जवळ पंधरा लक्षांचा मुलुख त्याच्या कडेच ठेवण्यांत येऊन शिवाय बक्षिसादाखल म्हणून इंग्रज सरकारनें रामपूर जिल्हाहि त्यास दिला. या तहावर अमीरखानातर्फें त्याच्या हस्तकानें दिल्ली येथें ता. ९ नोव्हेंबर सन १८१७ रोजीं सही केली होती. पण स्वत: अमीरखानानें या तहास आपली संमति देण्यास थोडी दिरंगाई केली. कारण अमीरखानाच्या छावणींत यावेळीं पेशव्यांचा वकील आला असून शिवाय त्याची पुणें व नागपूर दरबारच्या राजकारणावरहि बारीक नजर होती.
अमीरखानानें ज्या कांहीं आशा मनांत बाळगळ्या होत्या त्या सर्व विलयास गेल्या. त्यामुळें आणि बेकार झालेल्या त्याच्या अनुयायांच्या शिव्याशापामुळें तह केल्यावरहि कांहीं दिवस त्याचें मन अस्वस्थच होतें. पण गव्हर्नर जनरलच्या उदारपणामुळें त्याला स्वस्थता लाभली. तो फार धोरणी असून कधीं कधीं त्यामुळें त्याच्या शौर्याबद्दल संशय उत्पन्न होई. व अर्ध्या हिंदुस्थानांतील पेंढारी लोक आपल्या हूकुमतींत ठेवण्याची शक्ति ज्याच्या अंगीं होती त्यानें ब्रिटिश सरकारशीं वैर टाकून देशांत स्वस्थता कशी नांदूं दिली यांचेंहि आश्चर्य वाटतें. त्याच्या सत्तेचा लगाम म्हणजे त्याचा दरारा, तो अजीबात मावळतांच तो अगदीं निर्माल्यवत् होऊन राहिला. होळकरदरबार, त्याजकडे ज्यामुळें तो उदयास आला त्या संस्थानचे लचकेतोडणारा मनुष्य, अशा दृष्टीनें पहात असे. मंडलेश्वराच्या तहापूर्वीं व नंतर इंग्रज सरकार आणि होळकर यांच्यामध्यें मध्यस्थी करण्याची जेव्हां त्यानें आपली इच्छा दर्शविली तेव्हां सर्वच पक्षांनीं त्याला शत्रुसमान लेखल्याचें उघड दिसून आलें. तथापि अमीरखानांत जर कांहीं सदगुण असेल तर तो मित्रप्रेम हा असून यशवंतराव होळकराशीं त्यानें अखंड मित्रत्वांचेंच वर्तन ठेविलें होतें. यशवंतरावाच्या दुष्ट संवयी घालविण्याचा त्यानें जो आटोकाट प्रयत्न केला त्याचें कारण तरी हेंच. सादरीजवळ धर्मकुंवराशीं जें युद्ध झालें त्यांत अमीरखानानें आपल्या जिवाकडे न पाहतां मित्राची बाजू संभाळिली. त्याचे कट्टे दुष्मनहि त्याचा हा गुण कबूल करितात.
[ संदर्भ ग्रंथ.−मालकमकृत मेमॉयर्स ऑफ सेंट्रल इंडिया ग्रांटडफ ].