विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमूदर्या किंवा ऑक्सस − मध्य आशियांतील मोठ्या नद्यांपैकीं एक नदी. हिला संस्कृत व बौद्ध ग्रंथांत वंक्षु असें म्हटलें आहे.
१८८५ मध्यें रशिया-अफगाण सरहद्द ठरविण्याकरितां नेमलेल्या कमिशनची बैठक होईपर्यंत उत्तर ऑक्सस प्रदेशाची माहिती फार कमी होती व या नदीचा प्रवाह कसा जातो याची रूपरेखाहि स्पष्ट नव्हती रशियन संशोधक व टेहळणी करण्यांत वाकबगार असे. हिंदी लोक यांनीं बरीच मेहनत घेऊन या नदीचा प्रवाह व त्याला मिळणार्या सर्व नद्या शोधून काढिल्या. पामीरमधील व्हिकटोरिया सरोवरापासून अफगाण तुर्कस्थानच्या अधुकी जिल्ह्याच्या कांठावर असलेल्या खमिआबपर्यंतच्या सुमारें ६८० मैलांच्या प्रदेशाची ही ऑक्सस नदी अफगाणिस्तान व तुर्कस्तान यांच्यामधील सरहद्द होऊं शकते. खमिआबच्या खालीं आणखी ५५० मैल हिचा प्रवाह स्वैर व शिथिल असा होत जाऊन शेवटीं आरल समुद्रांत तो गडप होतो. चर्जुयी (खमिआबच्या खालीं १५० मैल ) येथें हिच्यावर लांकडी पूल बांधला असून मर्व्हपासून समर्कंदपर्यंतची रशियन रेल्वे यावरून गेली आहे.
पुष्कळ वर्षेंपर्यंत ऑक्ससच्या उगमाबद्दल एक मोठा मनोरंजक भौगोलिक वाद माजून राहिला होता व या वादापासून कांहीं राजकीय महत्त्वाची बाबहि उपस्थित झाली होती. कारण रशिया-अफगाण सरहद्दीवर या उगमाचा संबंध प्रत्येकाला मान्य होता.