विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृत बाजार —(बंगाल). जेसोर जिल्ह्यांतील एक खेडें. २३°९' उत्तर अक्षांश व ८९°४' पूर्व रेखांश यांवर. लोकसंख्या सुमारें बाराशें. याच ठिकाणीं प्रथम अमृत बझार पत्रिका नांवाचें सुप्रसिद्ध वर्तमानपत्र सुरू झालें. हल्लीं तें कलकत्ता येथें प्रसिद्ध होत असतें हें इ. स. १८६७ मध्यें शिशिरकुमार व मोतीलाल घोष या दोघां तरुणांनीं सुरू केलें. त्यांच्या आईचें नांव अमृतमयी असून तिच्या स्मरणार्थ त्यांनीं लांकडी हात छापखान्यावर स्वत:च खिळे जुळवून व शाई लावून हें पत्र मोठ्या निस्पृहतेनें चालविलें होतें. पुढें त्यांनीं तें कलकत्त्यास नेलें. लॉर्ड लिटनच्या कारकीर्दीत एतद्देशीय वर्तमानपत्राचा कायदा झाल्यावर पत्रिका इंग्रजींत निघूं लागली. पत्रिकेचा आरंभापासूनच सरकारवर वचक असे. तिच्या खोंचदार, सत्य व स्पष्ट भाषेमुळें व गुप्त सरकारी व इतर माहिती अचानक प्रसिद्ध करण्याच्या धाडसामुळें लोकांनां हें पत्र म्हणजे आपला पाठिराखा व सरकारला आणि अरेरावी संस्थानिकांनां तें शत्रूसारखें भासल्यास नवल नाहीं. शिशिरकुमारानंतर मोतीलालजींनीं परवांपर्यंत तें उत्तम रीतीनें चालविलें. त्यांच्या मृत्यूनंतरहि तें जोमानें चालेल अशी अपेक्षा आहे.