विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृतराय — धुंडिराज मालुकृत '' भक्त कथामृत '' ग्रंथांत अमृतराय हे विसामोरो यांचे आश्रित होते असें लिहिलें आहे.
विसामोरो हे अवरंगाबादेस कोणी मुत्सद्दी होते. अमृतरायाचा जन्म शके १६२० व मृत्यु शके १६७५ असे ओकांच्या आधारें आजगांवकर लिहितात.
धुवचरित्रांत '' माता उमा परम शंकर तात झाला '' अशी अमृतराय स्वत:विषयीं माहिती देतात. मध्वमुनीश्वरांच्या उपदेशानें अमृतराय ईश्वरभक्तीकडे वळले अशी आख्यायिका आहे.
'' अविनाशसंदेहहरण '' नामक ग्रंथांत अमृतरायांनीं आपल्या गुरूचें नांव अंबिकासरस्वती असें दिलें आहे. व तेंच नांव दुसर्या कित्येक पदांत उल्लेखिलेलें आढळतें. तथापि त्यांच्या कवितासंग्रहांत '' श्री गुरु मध्वनाथपर अमृतराय बलहारी '' असेंहि आढळतें. शिवाय '' अमृत म्हणे तुम्हि भजा निरंतर श्रीधर गुरूचे पाय '' असाहि उल्लेख आहे. या गुरुत्रयीवरून अनेक अमृतराय झाले असावेत कीं काय अशी शंका आजगांवकर काढतात. अमृतरायांचे शिष्य पुष्कळ होते. त्यांपैकीं माधव व ब्रह्मगिरी हे कवी असून त्यांनीं आपल्या कवितेंत रायजींचा उल्लेख केला आहे.
अ मृ त रा या चीं का व्यें.—१ गणपतिवर्णन, २ जग-दंबावर्णन, ३ ध्रुवचरित्र. ४ शुकचरित्र, ५ सुदाम-चरित्र, ६ नारदी, ७ कृष्णचरित्र, ८ द्रौपदीवस्त्रहरण, ९ रामचंद्रवर्णन, १० कृष्णवर्णन, ११ राधावर्णन, १२ कृष्णध्यान, १३ मृत्तिाकाभक्षण, १४ वत्सला-हरण, १५ रासक्रिडा, १६ कुंजवन विहार, १७ कृष्ण-लीला, १८ चंद्रावळी, १९ दुर्वासयात्रा, २० पारिजात-काख्यान, २१ जीवदशावर्णन, २२ उपदेश, २३ पूतनावध, इ.
याशिवाय ३४ प्रकरणें व १५० पदें छापलीं आहेत.' दामाजीची रसद ' हें काव्य अमृतरायांचे नसून शिष्य ब्रह्मगिरी यांनीं केलें आहे.
अमृतरायांची वर्णनशैली फार अप्रतिम आहे. सुदाम-चरित्रांत कृष्णाच्या अपरिमित ऐश्वर्याचें वर्णन, द्रौपदीवस्त्र-हरणांत अनेक वस्त्रांची व त्याकरितां प्रसिद्ध असणार्या पेठांचीं नांवें, भोजनांतील पदार्थ, रासक्रिडेंत राग रागिण्या वगैरे पाहिल्यास या म्हणण्याचें प्रत्यंतर येईल. अमृतरायांची कविता कटावबद्ध असल्यानें ती वर्णनास फार साजेशी आहे. कीर्तनकार नेहमीं आपल्या कीर्तनांत रंग भरण्यास अमृत रायांचे कटाव म्हणतात. '' कीर्तनसुखार्य झाला अवतारचि अमृतराय जीवाचा । '' असें कविवर्य मोरोपंतांनीं सन्मणिमालेंत जें म्हटलें तें यथार्थच होय.
अमृतरायांची भाषा साधी, सरस व प्रौढ आहे. त्यांनां हिंदीं भाषाहि चांगली अवगत असून तींत त्यांनीं मराठी सारखीं कवनें केलीं आहेत. काव्यांत भक्तिरस व वैराग्य ओतप्रोत दिसत असून प्रसंगविशेषीं शृंगारवीरादि रसहि अंगभूत आहेत.
अमृतरायांच्या कवितेसंबंधीं कांहींशी कल्पना येण्यासाठीं पुढील वेंचे देत आहों:
शुक्रचरित्रांतील वसंतवर्णन :—वसंत संतत सुलता प्रसवी, कंदर्पाची सत्ता बसवी, समीर दर्पहि वायु सूचवी, पुष्प वाटिका रम्य नेटका, टाकंटीका विस्तीर्ण चेटका, वस्ति खेटका, मंत्रें समान सूत्रें साधुनि, कळा कूसरि, निबीड दूरी शतिळ छाई, विकसित जाई जुई शेवंती, चमेलीचंपा-गंधमालिती, मंदाराच्या सगळ्या पंक्ती, कोरांटी बहु रंग रंगिती, आराटीची नाहीं जाती, फुलें मोगरे पिंवळी जाती, गोकर्णी गोकर्ण आकृती, एक सुकृतीं तुळशी नवती, जैसे चेंडू फुलले झेंडू, गेंद शेंदरे लोक आदरे कानिं खोविती, तुरे लाविती, घट्ट फुलांचे बट्ट मोगरे, द्वार पांगरे निंद्य कळीचे कळवळती, भळभळीत फुलले, मल्लिकांच्या दीर्घवल्लिका, कळिका फुलल्या, अपार तेथें पारिजात, जळिं बारिजात, कर तरंगते, भातभातचे वात त्यांत बहुमात करीतो, वनस्पतींचा गुण विखरीतो, खेड दुपारीं फुलें दुपारीं सरळ सुपारी, गगन चुंबिती, द्राक्ष घडांतें पक्षि भक्षिती, क्षितींबराबर शीतळ नीतळ सपाट वाहति पाट जळाचे, थाट दाट तत्प्रफुल्ल वृक्षीं फाट नसे, परि वाटमेधिं चोहाटे बांधिले, रत्नशिळा लखलखाट, त्यांच्या कळा फांकति, मधुर शब्द कोकिळा गुंजती,गुंजारवती सकळांमध्यें, बकुळाच्यासम कुळांभोवते, अलीकुळांचे वृंद हिंडती, मंद मारुतें वृक्ष डुल्लती, नागकुळें परिमळे झुल्लती, शूक शुकाते स्पष्ट बोलती, ' अरिष्ट तुज हें आले ' म्हणती, धारिष्टानें हरूं पाहती, मुख्य अघाती श्रीरागानें गीत गाती, ऐशी विवशी तुज खायाशी, वश्य कराया लक्ष लाविती, दक्ष मुनी तो अक्ष:कपाटे अक्षय देउनि, क्षेमरूपें सुक्षित जेणें, शमदमसमाधि सादर हृदयीं भरिला ॥ १० ॥
सुदामचरित्रांतील जेवण - ' मांडुनि स्वस्तिक सुवर्ण पाट, अडणीवर सोन्याचें ताट, भंवता फल शाखांचा थाट, कांठीं वरण पिंवळें दाट, मीट मिरें वरि आलें लिंबू, तुतिया खोबरें, किसून कोशिंबीर सुंदर, आम्ल रायतें, रुचिर आयतें कोमळ अंगीं, सगळीं वांगीं, शुभ्र कारलीं, मेथी, पोथी वोथी केळें, कोथिंबीर हळदीसह काथी ताथी साथी चरुसह चाकवत चुका, चवळ पिवळी, कवळया शेंगा, चिमकुरा दळ चिरुनी, चांगली चमचमीत फोडणी देउनि चरारित चारोळीं सांभारें, मउ चिमणी बोंडें , चिंचपान चिंचोळीं तोंडें, कोहळा काशीफळें, कांकडि कुहिरिया, कमळकंद कोंवळी काचरी, दूध भोपळे, दिव्य दोडके, दाळ दिंड शेवाळ वाळकें, शेंगा सुरण अरुवार परवरें, पडवळी तोंडली, कोंडली कंदमूळ फळ फूल पत्र तरु वेलमाल घृतपाचिक शाका, वडे नसति वावडे, सार आवडे, तिखट तिळवडे सारबिज वडे, सहित पापडे, कथिक वडे, आणिक कोरवडे, शिर्या-सगटगट पुर्या, बर्या गुरवळया, काचोर्या सांजोर्या, मालत्या बोटवे, शुभ्र देटवे, सायसहित शेवाया, शर्करा पायस लुचया, मांडे पांडुरवर्ण पूर्ण पोळिया, घृतें घोळिल्या द्विजें गिळिल्या, दुरडी भरूनि धिरडीं, भाजुक साजुक नाजुक राजसवाणे, कानवल्यासी मानवले, साखरफेण्या घिवर घारगे, मोतीचूर जिलेबी दळिया, बारिक ओदन दे अनुमोदन, घमघमाट तो अमोद न राहे, भात केशरी परम कूसरी, दहीं दूध धृत मधु साखर, निंबू घन राब चांबभर पन्हें फुटांचे, मठ्ठा मिठ्ठा, मटमटा बहु मधुर लापसी, लोणकडें थिजलें गाईचें तूप मधूर सुवासिक महा चंगाळ, थोर घंगाळ, वाटीभर एकएक घरींचें, सोळा हजार पदार्थ आले निजभाग्यें भोजनीं, अन्न ब्रह्मरसानुभवानें विप्र जेविला...... इत्यादि.
( सं द र्भ ग्रं थ—आजगांवकर—महाराष्ट्रकविचरित्र भाग पहिला. ओक—काव्यसंग्रह. मोल्स्वर्थ—कॅंडीकोश—प्रस्तावना. धुंडिराज मालु-भक्तकथामृत. लोंढे-अमृतराय ( वि. विस्तार ३२. ८; ३३. ७ ). सं. क. का. सूची. भरत खंडाचा अर्वाचीन कोश. महाराष्ट्र सारस्वत वाङ्मयसूचि पृ. ३५५ ).