विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृतराव — राघोबादादाचा दत्तक पुत्र. हा गोपाळराव भुसकुटे याचा औरस पुत्र असून इ. स. १७६८ त याला राघोबादादानें दत्तक घेतलें. याचें दत्तविधान झाल्यावर पुढें कांहीं वर्षांनीं राघोबादादास दुसरा बाजीराव व चिमणाजीआप्पा असे दोन औरस पुत्र झाले. त्यामुळें अमृतराव यास पेशवाईचा अधिकार प्राप्त होण्याचा योग आला नाहीं. अमृतराव हा बहुतकरून राघोबादादाच्या जवळ असे. ज्या वेळीं आनंदीबाई, बाजीराव व चिमणाजीआप्पा हे पेशव्यांच्या प्रतिबंधांत होते त्या वेळीं अमृतरावहि त्यांच्या बरोबरच होता. अमृतरावाचें लग्न राघोबादादानें इ. स. १७७१ मध्यें टोंकें मुक्कामीं मोठया थाटानें केलें. अमृतराव हा इ. स. १७९४ पर्यंत नाशकाजवळ आनंदवल्ली येथें होता. तेथून पुढे तो बाजीराव व चिमणाजी आप्पा यांच्याबरोबर शिवनेरी येथील किल्लयांत नाना फडणविसाच्या प्रतिबंधांत होता.
इ. स. १७९५ मध्यें सवाई माधवराव मृत्यु पावल्यानंतर परशुरामभाऊ पटवर्धन बाजीरावाला पुण्यास नेण्याकरितां शिवनेरीस आला तेव्हां यानें शिंद्याची वाट पाहून त्याच्या बरोबर पुण्यास जाण्याविषयीं बाजीरावास उपदेश केला, पण बाजीरावानें तिकडे लक्ष दिलें नाहीं. परशुरामभाऊ बाजीरावास घेऊन शिवनेरीहून निघाला तेव्हां याला परशुरामभाऊच्या हुकुमानें तेथेंच अटकेंत ठेवण्यांत आलें (इ. स. १७९६). मागून शिंद्याचा दिवाण बाळोबा तात्या शिवनेरीस आला तेव्हां त्यास अमृतरावाकडून सर्व हकीकत समजली. त्यानें अमृतरावास शिवनेरीहून काढून जांब गांवास आणलें परंतु त्यास बंधमुक्त केलें नाहीं.
पुढें सन १७९६ सालच्या नोव्हेंबर महिन्यांत नानाफडनविसानें बाजीरावास मसनदीवर बसविण्याकरितां पुण्यास आणलें तेव्हां अमृतरावाची कैदेंतून सुटका करण्यांत आली. बाजीराव यास आबाजी कृष्ण शेलूकर याच्या मार्फत सातारच्या छत्रपतीकडून त्या महिन्याच्या ५ व्या तारखेस पेशवाईचीं वस्त्रें मिळालीं, त्या वेळीं छत्रपतीकडून अमृतराव यासहि बहुमानाचा पोषाख मिळाल्याचा दाखला सांपडतो. या पोषाखाची किंमत रु.११८२॥।= होती. याच समयीं बाजीरावानें अमृतराव याच्या खर्चाकरितां परगणे अरुण, परगणे खुटवाड, शहाडौरा इत्यादि सहा महाल नेमून दिले व ते कांहीं दिवस त्याच्याकडे चालू होते. सन १७९७ सालच्या दिसेंबर महिन्यांत नाना फडनविसास कैद करण्याकरितां बाजीरावानें जो कट केला त्यांत अमृतराव सामील होता. त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशीं नानास कैद करण्यांत आल्यावर अमृतरावास बाजीरावानें आपला मुख्य कारभारी नेमून गोविंदराव काळे व शिवराम नारायण थत्ते यांनां त्याचे मदतनीस म्हणून ठेविलें. अमृतरावास राघोबादादाबरोबर इंग्रज सैन्याची शिस्त व टापटीप पाहण्याचे अनेक प्रसंग आल्यामुळें त्यानें बाजीरावास सूचना करून इंग्रज सेनापतीच्या हाताखालीं कांहीं कवायती फौज तयार करण्याकरितां पुणें येथें मि. टोन नांवाच्या एका यूरोपीय सरदारास नेमिलें होतें.
बाजीरावानें अमृतरावाच्या तंत्रानें राज्यकारभार चालविला असता तरी देखील त्याचें पुष्कळ हित झालें असतें पण त्यानें दौलतराव शिंद्याशीं सख्य करून अमृतरावाशीं विरोध मांडला. सन १७९८ सालीं घाटगे यानें पुण्यांतील लोकांपासून पैसे उकळण्याकरितां त्या शहरांत जे अत्याचार केले त्यानें अमृतरावास फार चीड आली. ही आपल्या बंधूचीच पैसे गोळा करण्याची युक्ति आहे याची त्या बिचार्यास कल्पनाहि नव्हती व दौलतराव भेटीस आला असता त्याला पकडून कैद करावें असा त्यानें आपल्या भावास सल्ला दिला. दौलतरावाचा कांटा मार्गांतून काढून टाकण्यास बाजीराव उत्सुक असल्यामुळें त्यानेंहि लागलीच ह्या गोष्टीस आपली संमति दिली, त्याप्रमाणें अमृतरावानें आबा काळे नांवाच्या पेशव्याच्या एका पलटणीवरील सरदारास शिंद्याला कैद करण्यास तयार केल्यावर बाजीरावानें दौलतरावास भेटीस येण्याविषयीं आज्ञा केली. परंतु तो आल्यावर त्याला पकडण्याचा संकेताप्रमाणें इषारा देऊं कां? असें जेव्हां अमृतरावानें बाजीरावास विचारलें तेव्हा मात्र ' होय ' म्हणण्यास बाजीरावाचा धीर झाला नाहीं. इतकेंच नाहीं तर अमृतरावानें तुम्हांस पकडण्याचा कट केला होता करितां त्याच्यापासून सावध रहा, असें देखील त्यानें पुढें दौलतरावास सांगितलें.
त्याच सालीं घाटगे शिंद्याच्या बायांनां पकडण्याची खटपट करीत असतां अमृतरावानें त्यांना आपल्या छावणीत आश्रय दिला व पुढें जून महिन्याच्या ७ व्या तारखेस रात्रीं शिंद्याच्या पलटणी याच्या छावणीवर अचानक छापा घालण्यास आल्या असतां त्याच्यावर हल्ला करून यानें त्यांनां पिटाळून लाविलें. शिंद्यानें बाई जेथें राहूं इच्छितील तेथें आपण त्यांच्या खर्चाची व्यवस्था लावून देऊं असे अभिवचन दिल्यामुळें अमृतराव पुण्यास येऊन शिंद्याच्या छावणीजवळ खडकीच्या पुलानजीक तळ देऊन राहिला व शिंद्याच्याबायांनीं विठ्ठलवाडींत मुक्काम केला. अशा रीतीनें तो बेसावध असतां ता. २६ जून रोजीं नदींत ताबूत बुडविण्याकरितां आलेल्या मिरवणुकीच्या व्यवस्थेकरितां म्हणून घाटग्यानें तोफा व पलटणी आणून याच्या छावणीवर आकस्मात् हल्ला करून ती लुटली.
बाजीरावाचें अशा प्रकारचें वर्तन पाहून अमृतराव पुणें सोडून जुन्नर येथें जाऊन राहिला. पुढें बाजीरावानें पुणें येथें अनन्वित कृत्यें केलीं व विठोजी होळकरास हत्तीच्या पायीं देऊन ठार मारलें. या गोष्टीचा सूड घेण्याकरितां यशवंतराव होळकरानें पुण्यावर चाल केली. तारीख २५ आक्टोबर सन १८०२ रोजीं पुण्यास होळकराची शिंदे व पेशवे यांच्या सैन्याशीं लढाई होऊन तींत शिंद्याच्या व पेशव्यांच्या सैन्याचा पराभव झाला, व बाजीराव पुण्याहून पळून सिंहगडास गेला. प्रथमत: यशवंतरावानें बाजीरावास पुण्याला परत आणण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; परंतु त्यात त्याला यश आले नाहीं. तेव्हां त्यानें अमृतरावास जुन्नराहून पुण्याला येऊन पेशवाईचा कारभार हातीं घेण्याविषयीं विनंति केली. अमृतरावानें प्रथम बरेच आढेवेढे घेतले. पण शेवटीं तारीख १२ नोव्हेंबर रोजी तो पुण्यास आला व पुण्याजवळ भांबुर्डें म्हणून गांव आहे तेथें तंबूंत तो आपला दरबार भरवूं लागला. या वेळीं होळकरा कडून पैशाकरितां पुण्याच्या लोकाचा जो छळ झाला त्याचा बराचसा दोष अमृतरावाकडेहि येतो. तो स्वत: पेशव्याच्या मसनदीवर बसला नाहीं किंवा होळकरानें सुचविल्याप्रमाणें तो आपला पुत्र विनायकराव यासहि मसनदीवर बसवूं देईना. परंतु बाजीराव महाड सोडून इंग्रजांच्या आश्रयास जांताच बाजीरावानें आपल्या पेशवाई पदावर पाणी सोडलें असाच त्याचा अर्थ होत असल्याचें दाखवून त्यानें विनायकरावास मसनदीवर बसविण्याच्या होळकराच्या सूचनेस संमति दिली. होळकरानें त्याप्रमाणें सातारच्या छत्रपतीकडून १८०२ सालीं पेशवाईचीं वस्त्रें आणून तीं विनायकरावास अर्पण केलीं. परंतु या वस्त्राचा उपभोग अमृतरावाच्या मुलास अवघे दोन महिनेहि घेता आला नाहीं. कारण इकडे बाजीरावानें महाडहून इंग्रजांशीं तहाचें बोलणें लावून ता. ३१ दिसेंबर १८०२ रोजीं वसई येथे तहनामा ठरवून इंग्रजाच्या साहाय्यानें पेशवाईचीं वस्त्रे पुन्हा मिळविण्याची सिद्धता केली. ता. २० एप्रिल सन १९०३ रोजीं वेलस्ली बाजीरावासह पुण्यास येऊन दाखल झाला. त्यापूर्वीं बरेच तास अगोदर अमृतराव पुणे सोडून निघून गेला होता. पुण्याहून निघाल्यावर तो मार्गांतील गावें व खेडीं लुटीत संगमनेरास गेला व नंतर नाशिककडे वळून त्यानें बाजीरावाच्या पक्षाच्या राजे बहाद्दराच्या फौजेच्या एका टोळीवर हल्ला करून तिचा पराभव केला. पुढें त्यानें नाशकास जाऊन तें शहरहि लुटले. हें शहर लुटीत असता तेथें पुण्याइतकेच माणुसकीस न शोभण्यासारखे प्रकार झाले. यानंतर कांहीं दिवसपर्यंत अमृतराव नाशिकच्या आसमंतांतच होता.
अमृतरावानें अगोदर बाजीरावाशीं समेट करण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ झाल्यावर त्यानें जनरल वेलस्ली याशीं बोलणें लावून पुढें झालेल्या लढायांत तो आपल्या पथकासह इंग्रजांच्या फौजेंत सामील झाला. त्यामुळें इंग्रजांकडून त्याला आठ लक्ष रुपयांचें वार्षिक वेतन करून देण्यांत आलें. तेव्हां अमृतरावानें आपल्यास राहण्याकरितां काशीक्षेत्र पसंत करून तो तेथें जाऊन राहिला.
अमृतराव हा काशीं येथें इ. स. १८२४ मध्यें निवर्तला. काशी येथें त्यानें पुष्कळ दानधर्म करून मोठी किर्ति मिळविली. तेथें त्यानें घाट व देवालयें बांधिलीं व कित्येक अन्नसत्रें स्थापिलीं. अमृतराव पेशव्याच्या दानधर्माचा काशीं येथें अद्यापि मोठा लौकिक आहे.
अमृतराव यास विनायकराव उर्फ बापूसाहेब या नांवाचा मुलगा होता. तो त्याच्या पश्चात् त्याच्या जहागिरीचा मालक झाला. अमृतराव यास जें आठ लक्ष रुपयांचें पेनशन होतें. त्यामध्यें एक लक्ष रुपये त्याच्या आश्रयास येणार्या सरदार लोकांसाठीं म्हणून होते; परंतु तसे सरदार कोणी त्याच्याबरोबर उत्तर हिंदुस्थानांत गेले नाहींत. म्हणून ब्रिटिश सरकारनें विनायकराव यास आठ लक्षांऐवजी फक्त सात लक्षच पेनशन चालू केलें. विनायकराव हा इ. स. १८२९ मध्यें चित्रकूटाजवळ कारवी या नांवाचे एक गांव आहे, तेथें राहण्यास गेला. हें ठिकाण बांदेवाले नबाब समशेर बहादूर यांची राजधानी जें बांदा शहर, त्याच्या पूर्वेस ४५ मैल अंतरावर आहे. येथें विनायकराव यानें आपली राजधानी केली, असें म्हटलें तरी चालेल. येथून चित्रकूट हें रामायणप्रसिद्ध क्षेत्र अगदीं समीप असून तेथें प्रतिवर्षी मोठी यात्रा भरत असते. ह्या स्थळास विनायकराव पेशव्याच्या सान्निध्यानें विशेष महत्तव व ऐश्वर्य प्राप्त होऊन त्याची महाराष्ट्रांत विशेष प्रसिद्धि झाली. विनायकराव यास व याच्या वंशजास ' चित्रकूटवाले पेशवे ' असें नांव प्राप्त झालें व तें अद्यापि प्रसिद्ध आहे.
विनायकराव यानें कारवी येथें मोठा विस्तीर्ण भव्य वाडा बांधिला. त्याचप्रमाणें तिेथें पिंवळी कोठी, कोठी तलाव, जंगली बाग, कंटोरा तलाव इत्यादि अनेक मंदिरें, तलाव व बगीचे वगैरे बांधिले. त्यामुळें त्याच्या राजधानीस विशेष ऐश्वर्य प्राप्त होऊन तेथें दक्षिणी लोकांची पुष्कळ वस्ती झाली. विनायकराव यानें ' गणेशबाग ' या नावाचें जें उत्कृष्ट व रमणीय उद्यान बांधिलें, त्याचा कांहीं भाग अद्यापि अस्तित्वांत असून तो त्याच्या भव्यपणाची अद्यापि साक्ष देत आहे. विनायकराव यास औरस पुत्रसंतति नसून फक्त काशीबाई या नांवाची एक मुलगी होती. ती जोग ह्यांच्या घराण्यांत दिली होती. विनायकराव हा इ. स. १८५३ सालीं निवर्तला. त्यानें नारायणराव व माधवराव असे दोन मुलगे दत्तक घेतले होते. ते अज्ञान असल्यामुळें त्यांची सर्व व्यवस्था रामचंद्र राम पेंडसे या नांवाचा एक गृहस्थ हिंदुस्थान सरकारच्या देखरेखीखालीं पहात असे. विनायकराव पेशव्याची संपत्ति अपार असून खुद्द ब्रिटिश गव्हर्नमेंटलाहि त्यानें पांच लाख रुपये कर्जाऊ दिले होते व त्याचे व्याज ४ रुपये शेंकडयाप्रमाणें दरसाल २०,००० रुपये काशी येथील देवस्थानाच्या खर्चास वेगळें लावून दिलें होतें. ते इंग्रज सरकारकडून इ. स. १८५६ पर्यंत नियमानें मिळत असत.
इ. स. १८५७ सालीं उत्तर हिंदुस्थानांत बंड उद्भवलें व ब्रह्मावर्त येथील बाजीराव पेशव्यांचा मुलगा नानासाहेब व त्याचा भाऊ हे त्यांत सामील झाले आणि कानपूर, ग्वाल्हेर, झांशी, बांदा वगैरे ठिकाणीं बंडाचा प्रादुर्भाव झाला. त्या वेळीं कारवी येथेंहि कांहीं चलबिचल झाली व तेथील जॉइन्ट मॅजिस्ट्रेट मिस्टर कॉकरेल ह्याच्यावर संकट आलें. त्यानंतर कारवी येथें आठ महिनेपर्यंत अस्वस्थता होती. कोणी म्हणतात कीं, नारायणराव स्वत:स स्वतंत्र पेशवा मानून कारवीचा राज्यकारभार चालवीत होता. इ. स. १८५८ च्या जून महिन्यामध्यें सर ह्यू रोज यानें झांशी, काल्पी वगैरे ठिकाणें घेऊन ग्वाल्हेर हस्तगत केलें व बंडवाल्यांचा अगदीं पराभव केला. त्याच वेळीं जनरल व्हिटलॉक यांनें बांदें शहरावर चाल करून तें हस्तगत केलें व कारवीवर ता. २ जून १८५८ रोजीं मोर्चा वळविला. कारवी येथें बिलकूल लढाई न होतां माधवराव व नारायणराव पेशवे हे व्हिटलॉक साहेबांस शरण आले. जनरल व्हिटलॉक यानें ते बंडांत सामील असल्याचा संशय धरून त्यांस आपल्या लष्करांत कैदेंत ठेविलें. जनरल व्हिटलॉक याच्या सैन्यानें ता. ७ जून इ. स. १८५८ रोजीं कारवी येथील पेशव्यांचा वाडा वगैरे लुटून अगणित संपत्ति हस्तगत केली. ती पुढें विजयाचें बक्षीस म्हणून इंग्रज सैन्यास देण्यात आली. यासंबंधानें इंग्रज सेनापति सर ह्यू रोज व जनरल व्हिटलॉक ह्यांच्या मध्यें वादविवाद होऊन इंग्लंडमध्यें '' कारवी आणि बांदा प्राईज मनी '' म्हणून मोठा दावा चालला होता. त्यांत जनरल व्हिटलॉक यास यश येऊन त्यास व त्याच्या सैनिकांस ९,००,००० पौंड मिळाले.
वस्तुत: कारवी येथील पेशव्यांचा बंडाशीं कांहीं संबंध नसून त्यांची इंग्रज सरकारविषयींची राजनिष्ठा कायम होती असें पुढें सिद्ध झालें. नारायणराव यास इंग्रज सरकारनें ७०० रुपये दरमहा तैनात देऊन हजारीबाग येथें ठेविले. तेथें तो इ. स. १८६० मध्यें मृत्यु पावला. त्याचा भाऊ माधवराव यास इंग्रज सरकारनें रायबरेली येथें दरसाल २५‚०००रुपयांची नेमणूक करून देऊन ठेविलें; तो तेथेंच कायम राहिला. अर्थात् इ. स. १८५७−५८ च्या बंडामुळें कारवी येथील पेशव्यांच्या घराण्याचें अतोनात नुकसान झालें. इंग्रज सरकारनें माधवराव यास नेमणूक करून देऊन बरेली येथें ठेविलें, हें वर सांगितलेंच आहे. त्याप्रमाणें त्यांनीं विनायकराव याच्या मुलीचा दत्तकपुत्र बळवंतराव हरी जोग यास, विनायकराव पेशव्याचीं दोन तीन गांवें जहागीर देऊन त्याचा वंश कारवी येथे कायम ठेविला आहे. बळवंतराव जोग यानें इंग्रज अधिकार्यांस बंडाच्या वेळीं विशेष साहाय्य केलें व आपली राजनिष्ठा चांगल्या रीतीनें दाखविली म्हणून बांद्याचा मॅजिस्ट्रेट एफ. ओमेन याच्या शिफारसीवरून ब्रिटिश सरकारनें त्याकडे ' श्रीमंतराव ' ही पदवी कायम ठेवून त्याचा मानमरातब त्याच्या दर्जास शोभेल या रीतीनें तसाच चालविला. बळवंतराव हा इ. स. १९०२ मध्यें आपल्या वयाच्या ७४ व्या वर्षी मृत्यु पावला. त्यानें मोरेश्वरराव या नांवाचा दत्तकपुत्र घेतला. त्याच्याकडे इंग्रज सरकारनें तीन जहागीर गांवें व ' श्रीमंतराव ' हा किताब अद्यापि चालविला आहे. हा कारवी येथें साप्रत वास करीत आहे. कारवी येथील श्रीमंत अमृतराव व विनायकराव पेशव्यांचें पूर्ववैभव आतां विलयास गेलें आहे, तथापि या शेष राहिलेल्या घराण्याच्या योगानें त्याचें नांव येथें अस्तित्वांत आहे. कारवी येथील श्रीमंत मोरेश्वरराव ह्याच्या जहागिरीचें उत्पन्न सालीना अजमासें साडे दहा हजार रुपये आहे असें समजतें. ( संदर्भ ग्रंथ.−इतिहाससंग्रह. पुस्तक ५ वें‚ अंक ४−५−६; ग्रँडटफ. )