विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृतवेल − कुंडलच्या ईशान्येस ६ मैलावरील एक ठिकाण ( काठेवाड ). हें अनवरशहा नावाच्या एका बुखारी सय्यदाच्या ताब्यात होतें. या सय्यदाच्या नोकरींत एक बलाल नांवाचा सिद्दी होता. एके दिवशीं निशानिया विहिरीवर एक सुंदर ब्राह्मणाची बाई पाणी ओढीत असतां सिद्दयाच्या मनात पापवासना उत्पन्न होऊन त्यानें तिजवर बळजबरी केली व तिचा नवरा जेव्हा गवगवा करूं लागला तेव्हां सिद्दयानें त्याला ठार केलें. ती ब्राह्मणाची बाई मग सती गेली. त्या जागेवर अद्याप तिचें स्मारक दिसतें. त्यावर शनिवार भाद्रपद शुद्ध (दशमी ) संवत् १०४२ अशीं मिति आहे. वरील अत्याचाराचा सूड म्हणून जुना सावरवाल्यानीं हे गांव जाळून उध्वस्त केलें व सिद्दी आणि सय्यद या दोघांनांहि ठार मारिलें. नंतर १५ व्या शतकांत खुमान लोकांनीं येथें वस्ती करून त्याला आतांचें अमृतवेल हें नांव दिलें.