विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृतसर जि ल्हा.− पंजाब लाहोर भागांतील जिल्हा. ३१°१०' ते ३२°३' उत्तर अक्षांश व ७४°३०' ते ७५°२४' पूर्व रेशांख ' क्षेत्रफळ १६०१ चौरस मैल. हा प्रदेश रावी आणि बिआस या दोन नद्यांमध्यें वसलेला असून बहुतेक सपाट आहे. सर्व जमीन मळईची असल्यामुळें खनिज पदार्थ या तालुक्यांत मुळींच सांपडत नाहींत. या जिल्ह्यांत बोर, जांभूळ व आंबे यांची मोठया प्रमाणावर लागवड केलेली आढळते.
व न्य प्रा णी - लांडगे क्वचित् दृष्टीस पडतात. याशिवाय नीलगाई व काळवीट कुठें कुठें पहावयास सांपडतात.
जवळपास डोंगर असल्यामुळें व कालव्याचें वहातें पाणी या जिल्ह्यांत खेळत असल्याकारणानें लाहोरपेक्षां या भागांत हिंवतापाची साथ बहुतेक नेहमीं असते. पाऊस साधारणपणें १६ इंचापासून २४ इंचपर्यंत पडतो.
इ ति हा स.−फार प्राचीन काळचा इतिहास या जिल्ह्याविषयीं उपलब्ध नाहीं. शीख लोकांचा उदय होऊं लागल्या पासून या जिल्ह्याचा इतिहास सांपडतो. गुरुनानक याच्या मागें त्याच्या पीठावर आलेला अंगड हा या जिल्ह्याच्या दक्षिणेस बिआस नदीजवळ खादुर नांवाच्या खेडयांत येऊन राहिला होता. तेथेंच तो इ. स. १५५२ मध्यें मरण पावला. पीठावरील तिसरा गुरु अंबादास हा जवळच गोविंदवाल येथें रहात असे व हा इ. स. १५७४ सालीं मरण पावल्यावर त्याचा जावई रामदास हा गुरु झाला. यानें अकबर बादशहानें इनाम दिलेल्या जागेवर अमृतसर शहराचा पाया घातला. हा इ. स. १५८१ सालीं मरण पावला. केकय देशाची राजधानी जें गिरिव्रज शहर त्याच्या जवळच हें वसलेलें आहे असें अर्वाचीन कोशकर म्हणतात.
रामदासानें अमृतसरस नांवाचा तलाव खोदला व मध्यभागाच्या बेटावर शिखांचें पवित्र देऊळ बांधण्यास सुरवात केली. रामदासाचा पुत्र अर्जुन हा पांचवा गुरु होय. यानें तें देऊळ बांधण्याचें काम पुरें केलें व याच्या हयातींत अमृतसर शहराची पुष्कळ भरभराट झाली. परंतु लाहोर येथील सुभेदार व अर्जुन या दोघाचें कांहीं भांडण झाल्यामुळें अर्जुनास लाहोरशहरीं तो कैद असतांनाच इ. स. १६०६ सालीं मरण आलें. अर्जुनानंतर त्याचा पुत्र हरगोविंद हा गुरु झाला. याच्या अमदानींत प्रथम शिखानीं मोंगली सत्तेस विरोध केला. आपणाविरुद्ध पाठविलेल्या मोंगल सैन्याचा पराभव हरगोविंदानें केला. परंतु त्यास पुढें पंजाब सोडणें भाग पडलें व त्यास त्याच स्थितींत इ. स. १६४४−५ सालीं मृत्यु आला. नानक नंतरचा दहावा गुरु गुरुगोविंद होय. यानें या धर्मास धार्मिक व लष्करी स्वरूप दिलें व त्या धर्मांतील प्रत्येकास सारखे अधिकार असावे व सर्व लढवय्ये असावे असें ठरविलें. इ. स. १७०८ सालीं या गुरु गोविंदानंतर झालेला गुरु बंदा हा परत अमृतसर येथें आला व त्यानें मुसुलमानाशीं धर्म राखण्यांकरतां लढाई करावी असा उपदेश सुरू केला. त्यावेळेपासून अमृतसर हें त्या धर्माचें मुख्य ठिकाण झालें. नादीरशहाच्या स्वारीनंतर यांनीं अमृतसर येथें रामरावणी किल्ला बांधला व पंजाबचा सुभेदार मीर मन्नु यास विरोध केला. शिखांचा त्यावेळीं पराभव झाला. परंतु अहमदशहाच्या दुसर्या स्वारीचा फायदा घेऊन त्यांनीं अमृतसर व त्याच्या आसपासचा प्रदेश आपल्या ताब्यांत घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीं जरी अदीना बेग यानें त्यांचा पराभव केला तरी त्यांनीं अमृतसराचा किल्ला पुन्हां बांधला. हा किल्ला तैमूरनें पुन्हां जमीनदोस्त केला व त्या पवित्र तलावांत तो टाकला. परंतु शीख लोक स्वस्थ बसले नव्हते; त्यांची बंडाळी चालूच होती. इ. स. १७६२ सालीं अहमदशहा परत आपल्या देशीं जात असतांना त्यानें शिखांचा पतिआळा संस्थानांतील बर्नाळा येथें पुर्ण पराजय केला. त्यावेळीं त्यानें अमृतसर शहराचा फार नाश करून शिखांचें पवित्र देऊळ उडवून दिलें व त्या पवित्र जागीं गाईंची कत्तल करून ती जागा विटाळिली. परंतु अहमदशहा आपल्या देशीं गेल्याबरोबर त्यानीं पुन्हां इ. स. १७६३ सालीं उचल केली व सरहिंदच्या लढाईंत त्यांनीं आपलें स्वातंत्र्य पुन्हां प्रस्थापित केलें. त्या पवित्र देवळाची पुन्हां नीट व्यवस्था लावली. कांहीं काळ अमृतसर त्या प्रांताच्या राजधानीचें शहर होतें. यावेळीं अमृतसर शहरांत त्यावेळच्या प्रत्येक राजकर्त्या संस्थेचें ( कान्फिडेटरीचें ) ठाणें होतें. पुढें इ. स. १७९९ सालीं रणजितसिंगानें लाहोरचा ताबा मिळविला व त्यानें हळूहळू आसपासचा सर्व प्रदेश आपल्या अमलाखालीं आणला व इ. स. १८०१ सालीं सर्व जिल्हा रणजितसिंगाच्या पूर्णपणें ताब्यांत आला.
इ. स. १८४९ सालीं दुसरें शीख युद्ध झाल्यावर पंजाब बरोबर अमृतसर जिल्हाहि ब्रिटिश राज्यांत सामील करण्यांत आला. प्रथमत: नारोवाल तहशिलीचा यांत अंतर्भाव केला होता. परंतु इ. स. १८६७ सालीं ती तहशील सियाळकोट जिल्ह्यांत घालण्यांत आली. त्याचप्रमाणें कांहीं फेरफार वेळोवेळीं करण्यांत आले आहेत.
इ. स. १८५७ च्या बंडाच्या वेळीं येथील अधिकार्यांस फार काळजी वाटत होती. कारण अमृतसर जवळील गोविंद गड किल्ल्यांत ठेवलेल्या देशी सैन्याबद्दल इंग्रजास मोठी धास्ती होती. शहरांत मात्र शांतता होती. परंतु लवकरच योग्य मदत आल्याकारणानें संकट टळलें.
मुसुलमानी अमलाच्या वेळचीं हल्लीं दिसत असलेलीं स्मारकें म्हटलीं म्हणजे फत्तेहबाद, नुरुद्दीन आणि अमानत खान येथील सरायांचे [ धर्मशाळांचे ] पडके दरवाजे होत. शीख लोकांच्या वेळचीं कामें ' अमृतसर शहर ' आणि ' तरन तारण ' यावरील लेख पहा.
या जिल्ह्यांत पांच मोठीं गांवें व १०४२ खेडीं असून त्यांची लोकसंख्या [ १९२१ ] ९,२९,३७४ होती. या जिल्ह्यांत अमृतसर, तरनतारण व अजनाळ या तीन तहशिली आहेत.
या जिल्ह्यांत पंजाबी भाषा बोलतात. येथे सहसा दुष्काळ पडत नाहीं. मुख्य पीक−गहूं, हरभरा, मका इत्यादि.
गुरांची पैदास कमीच होते कारण चराउरान फार कमी आहे. अमृतसर येथें दिवाळींत व वैशाखांत जत्रा भरतांत, त्यावेळीं शेतकरी गुरें विकत घेतात. त्याचवेळीं घोडेहि येतात. येथें म्हशीचा उपयोग विहिरीचें पाणी काढण्याकरतां करतात.
पूर्वी अमृतसर येथें उत्तम शाली तयार होत असत. परंतु फ्रँको-जर्मन लढाईनंतर या धंद्यास उतरती कळा लागली आहे. हल्लीं येथें हातमागावर सत्रंज्या व गालीचे पुष्कळ तयार होतात. अमृतसर हें पंजाबांतील व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे. नॉर्थ वेस्टर्न रेल्वे या जिल्ह्यांतूत जाते.
बारी दोआब कालवा बांधण्यापूर्वी या भागांत पंजाबांतील इतर भागांप्रमाणें दुष्काळ पडत असे.
जिल्ह्याचा अधिकारी डेप्युटी कमिशनर असतो. या जिल्ह्यांत अमृतसर, मजीथा, जंडियाला गुरु, आणि तरन-तारण या चार गांवीं म्युनिसिपालिट्या आहेत. या जिल्याचें १९०३−४ सालीं एकंदर उत्पन्न तेवीस लक्ष शहात्तर हजार होतें, त्यांपैकीं जमीन महसूल दहा लक्ष अठयायशीं हजार होता.
त ह शी ल.−अमृतसर जिल्ह्याची तहशील. ३१°२९' ते ३१°५१' उत्तर अ. व ७४°४२' ते ७५°२४' पूर्व रे. याचें क्षेत्रफळ ५४५ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें पांच लक्ष.
या तहशिलींत अमृतसर, मजिठा आणि जंडियाला हीं गांवें असून ३७३ खेडीं आहेत. इ. स. १९०३−४ सालीं एकंदर उत्पन्न ६२२००० रुपये होतें.
श ह र.- अमृतसर जिल्ह्याचें मुख्य ठिकाण व शीखांचें पवित्रस्थान. ३१°३८' उत्तर अ. व ७४°५३' पूर्व रे. यांवर लाहोरच्या पूर्वेस ३३ मैलांवर हे नॉर्थवेस्टर्न रेल्वेचें स्टेशन आहे. लोकसंख्या सुमारें एक लक्ष बासष्ट हजार.
इ ति हा स.- [अमृतसर जिल्हा पहा ]. इ. स. १८०२ सालीं रणजितजिंगानें अमृतसर सर केलें. रणजितसिंग कट्टा शीखधर्मी असल्यामुळें त्यानें येथील शिखांच्या देवळांकरितां हजारों रुपये खर्च केले.
रणजितसिंगाच्या वेळेपासून या शहरास व्यापारी महत्त्व येत चाललें. देवळाच्या कीर्तीमुळें पुष्कळ लोक यात्रेसाठीं इकडे येऊं लागले. याच सुमारास वैशाखी व दिवाळी जत्रा सुरू करण्यांत आल्या. जत्रा जरी धार्मिक दृष्टीनें भारतात तरी त्यावेळीं थोडाबहुत व्यापार होतोच. इ. स. १८३३ च्या सुमारास येथील शालींच्या धंद्यास बरेंच उत्तेजन मिळालें; कारण या वर्षी काश्मीरांतील पुष्कळ विणकरी आपला दुष्काळग्रस्त देश सोडून अमृतसर शहरांत कायमची वस्ती करून राहिले. ब्रिटिश सरकारांत हा भाग खालसा झाल्यावर सुमारें ४००० हातमाग या अमृतसर शहरांत काम करीत होते असें म्हणतात. पण पुढें यूरोपियन लोक शाली वापरीनासे झाल्यामुळें हा धंदा कमी होत चालला आहे. परंतु त्यामुळें या शहराचा एकंदर व्यापार बसला नाहीं. गालीचे तयार करण्याचा धंदा हल्लीं येथे भरभराटीस येत चालला आहे. येथें बोखारा, काबूल व हिंदुस्थानांतील दूरदूरचे व्यापारी व्यापार करण्यास येतात.
शीख लोकांच्या सुवर्णदेवालयास ' दरबार साहेब ' असें म्हणतात. देवळास घुमट असून तो तांब्याच्या पत्र्यानें मढविलेला आहे असें म्हणतात. देवळाच्या भिंती संगमरवरी दगडाच्या असून त्यांतील बरेच दगड जहांगीरचें थडगें व इतर मुसुलमानी इमारती यांच्यापैकीं आहेत. घुमटामध्यें एका रेशमी झालरीखालीं शिखांचा पवित्र ग्रंथ−ग्रंथसाहेब−याची स्थापना केलेली असून तेथील पुजारी सांजसकाळ त्यांतील भाग वाचीत असतात. देवळाभोंवतीं तलाव असून तलावाकांठीं येण्यास रस्ता आहे. कांठावर पुष्कळ इमारती आहेत. यांपैकीं अकालबुंगा नामक इमारतींत देवळाचा जामदारखाना आहे. गुरु हरगोविंद याच्या पुत्राच्या स्मरणार्थ सुमारें एक शतकापूर्वी बांधलेला बाबाअतल नांवाचा सात मजली मनोरा आहे. शहराच्या वायव्येस गोविंदगड नांवाचा किल्ला इ. स. १८०५−९ च्या दरम्यान रणजितसिंगानें बांधला. त्याचप्रमाणें शहरच्या वायव्येस रामबाग असून तींतहि लाहोर येथील मुसुलमानी वस्तुशिल्पांचे नमुने ठेविलेले आहेत.
इ. स. १८६७ सालीं येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. तिचें इ. स. १९०३−४ सालचे उत्पन्न ११.९ लक्ष रुपये व खर्च ११.४ लक्ष होता. येथें लष्कर असतें. येथें चार हॉस्पिटलें, सहा हायस्कुलें, एक कॉलेज, दोन व्यापारी शाळा व इतर कांहीं प्राथमिक शाळा आहेत. सहा वर्तमानपत्रें व मासिकें निघतात. पांच बँका आहेत. कापसाचे व विणण्याचे कारखाने, दारू गाळण्याचा एक कारखाना, चार पिठाच्या गिरण्या व तांदूळ सडण्याच्या, लाकूड कापण्याच्या, साखरेच्या, बर्फाच्या वगैरे दुसर्याहि गिरण्या आहेत. येथें १९१९ सालीं रौलट अॅक्टाबद्दलच्या हरताळामुळें बराच दंगा होऊन प्रसिद्ध जालियनवाला बागेंतील निरपराधी लोकांची कत्तल झाली. यासंबंधीं माहिती ज्ञानकोशाच्या पहिल्या विभागांतील परिशिष्टांत दिली आहे. १९१९ मध्यें येथें राष्ट्रीय सभेचें अधिवेशन झालें.
सु व र्ण मं दि र.−हें मंदिर प्रख्यात अमृत सरोवरांत असून त्याच्या मध्यभागीं ७५॥ चौरस फूट अशा एका लहान द्वीपावर तें बांधलें आहे. हें सरोवर बहुतेक चौकोनी असून त्याची प्रत्येक बाजू वरल्या अंगास ५१० फूट लांब भरते. बारीदोआब कालव्यांतून त्याला पाणी मिळतें. मंदिराच्या पश्चिम भागीं २२७ फूट लांब व १८ फूट रुंद असा सेतु आहे. मध्य देवस्थानाला हरमंदिर असें नांव असून तें ४०॥ फुटांची एक एक बाजू असलेलें एक गृह असून त्याच्या प्रत्येक बाजूला एक एक दरवाजा आहे. बाहेरील भिंतीचा खालचा भाग आग्र्याच्या ताजमहालाप्रमाणें संगमरवरी दगडांनीं मढविलेला असून वरच्या भिंती आणि छप्पर सोनेरी मुलामा केलेल्या तांब्याच्या पत्र्यांनीं आच्छादलेलें आहे. त्यावरून त्याला सुवर्णमंदिर हें नांव पडलें. शीख लोक या देवस्थानाला व त्याच्या आसमंतांतील भागाला दरबार साहेब म्हणतात याचें कारण असें असावें कीं, शीख लोक आपल्या पवित्र ग्रंथाला मोठा माणूस समजून त्याचा रोज त्या ठिकाणीं दरबार भरत असतो असें मानतात. रोज सकाळीं अकाली बुंगांतून मोठया थाटानें सेतुमार्गानें देवळांत ग्रंथ आणतात आणि तशाच थाटानें रात्रीं तो परत पोंचवितात. देवळामध्यें एका छत्राखालीं त्याला ठेवतात व ग्रंथी त्याच्या पाठीमागें बसून त्याजवर दिवसभर चौरी वारीत असतो. त्याच्या दक्षिणेला पुजारी बसतात आणि उत्तरेला मुसुलमानी गवयी ( रागी किंवा रबाबी ) बसून वाद्यांच्या तालावर ग्रंथांतील सूक्तें गांतात. ग्रंथाच्या पुढें एक वस्त्र असून त्यावर भावीक लोक कांहीं देणग्या ठेवतात. १८९८ सालापासून देवळाची बाहेरील बाजू विजेच्या दिव्यांनीं प्रकाशित होत आहे. तरी मुख्य देवळांत मेणबत्त्या किंवा तुपाचे दिवे असतात. देवळाच्या आवारांत जोडे घालून येणें व विडी ओढणें निषिद्ध मानलें आहे. ग्रंथ सदोदित जमीनीवर स्थापन केलेला असल्याकारणानें देवळाच्या आवारांत खुर्चीवर किंवा उंचावर बसणें अयोग्य समजतात.
सरोवराच्या चारी बाजूंनी ३० फूट रुंदीचा एक फरसबंदी रस्ता आहे. त्याला परिक्रम म्हणतात. त्या ठिकाणीं अनेक लोक जमतात. आग्नेयीच्या कोंपर्याला सरोवरांतून जेथें बाहेर पाणी पडतें, त्या ठिकाणीं हलक्या दर्जाचे शीख लोक स्नान करतात. इतर शीख त्यांनां ( मझबीनांनां ) आपल्या बरोबरीचे समजत नाहींत व त्यांनां आपल्या धर्मांत मिसळूं देत नाहींत. या रस्त्याच्या सभोंवती बुंग नांवाच्या अनेक सुंदर इमारती असून शीख संस्थानिकांनीं अमृतसरला आलें असतां आपणांस राहण्याकरितां १८ व्या शतकाच्या अखेरीस त्या बांधिल्या. त्यांपैकीं रामगऱ्हिय सरदारांचा बुंग सर्वांत मोठा दिसतो. त्याला दोन उंच शिखरें असून तो लांबूनहि ओळखतां येतो.
मुख्य देवस्थानाला जोडलेल्या खालील तीन संस्था शिखांच्या दृष्टीनें फार महत्त्वाच्या आहेत. पहिली अकाल-बुंग, मुख्य देवस्थानाला लागूनच सेतूच्या पश्चिम बाजूला आहे. हें अकाली किंवा निहंग शिखांचें मुख्य ठिकाण समजतात. रात्रीच्या वेळीं ग्रंथसाहेब येथें ठेवण्यांत येतो. शिवाय गुरु हरगोविंद आणि इतर शीख गुरु यांची हत्यारें येथें ठेविलीं आहेत. अकालबुंगाच्या पुढल्या अंगणांत '' पहल '' किंवा शीख धर्माची दीक्षा देण्याचें स्थान आहे. येथें दरवर्षी सुमारें बाराशें लोकांनां शीख धर्माची दीक्षा देण्यांत येतें. दुसरी संस्था म्हणजे बाबाअतलचें देवस्थान होय. हें हरमंदिराच्या आग्नेयीस कांहीं अंतरावर असून त्याला एक कळस आहे. गुरु हरगोविंदचा धाकटा मुलगा बाबाअतल याच्या स्मरणार्थ १७२९ सालीं हें मंदिर बांधण्यास सुरुवात झाली. बाबाअतलसंबधांनें अशी गोष्ट सांगतात कीं, त्याचा एक आवडता खेळगडी मोहन नांवाचा होता. एके दिवशीं सकाळीं आपल्या मित्राच्या घरीं खेळण्यास तो आला. तेव्हां रात्रीं मोहन सर्पदंशानें मेलेला अतलच्या दृष्टीस पडला अतलनें आपला हात त्याच्या प्रेतावर टाकतांच तो पुन्हां जिवंत झाला. हें पाहून सर्व मंडळी स्तंभित झाली आणि त्या सात वर्षे वयाच्या पोरापुढें गुडघे टेंकून त्याची आराधना करूं लागले. पण त्याचा बाप हरगोविंद याला बातमी समजतांच, तो त्रासून अतलला म्हणाला कीं, पवित्र आयुष्य आणि शुद्ध तत्त्वें यांच्या प्रीत्यर्थच केवळ गुरूंनीं आपलें सामर्थ्य प्रगट करावयाचें असतें. अतलला हें बोलणे इतकें लागलें कीं, तो एका सरोवरावर गेला आणि तेथें त्यानें आपला अंत करून घेतला. तिसरी संस्था तरनतारण देवालय होय. हें अमृतसरच्या दक्षिणेस १३ मैलांवर असून ५ वा गुरु अर्जुन यानें त्याची स्थापना केली. हें देऊळ एका मोठया सरोवरांतील बेटावर बांधलें आहे. दर महिन्याला त्या ठिकाणीं जत्रा भरते. अमृतसरच्या देवळाचीहि दिवाळी आणि वैशाख अशा दोन वेळीं मोठी जत्रा भरत असते.
सुवर्णमंदिराची इमारत आणि त्याचा परिकर यांचा खर्च त्याला असलेल्या जहागिरींतून चालतो. ग्रंथसाहेब वाचणारे तीन ग्रंथी यांचा उदरनिर्वाह भाविकांकडून त्यांनां मिळणार्या देणग्यांवर चालतो. पुजार्यांनां, त्याचप्रमाणें गवई व इतर नोकरचाकर यांनां देवस्थान देणगींतील कांहीं भाग मिळतो. मुख्य देवस्थान आणि त्याला जोडून असणार्या संस्था यांच्यावर देखरेख करण्याकरितां पूर्वी सरकारनें नेमिलेला एक शीख व्यवस्थापक असे; हल्लीं गुरुद्वार प्रबंधक कमिटी हें काम पाहते.