विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमृतसिद्धि योग - आदित्यवारापासून क्रमानें प्रत्येक वारीं हस्त, श्रवण, अश्विनी, अनुराधा, पुष्य, रेवती व रोहिणी या नक्षत्रांचा योग झालेला असतो, त्याला अमृतसिद्धियोग म्हणतात. हा काल फार शुभ गणिला आहे ( आपटेकृत मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी ). या संबंधीं ज्योतिषग्रंथांत पुढील प्रमाणें श्लोक आढळतो:−
आदित्य हस्ते, गुरुपुष्य योगे, बुधानुराधा, शनि रोहिणीच । सोमेच श्रवणं ( सौम्यं ) भृगुरेवतीच भौमाश्विनी चामृतसिद्धियोगा:॥
म्हणजे, रविवारीं हस्त, गुरुवारी पुष्य, बुधवारीं अनुराधा; शनिवारीं रोहिणी, सोमवारीं श्रवण ( मृग ), शुक्रवारीं रेवती आणि मंगळवारीं अश्विंनी याप्रमाणें वार व नक्षत्रें यांचा योग आला असतां त्याला अमृतसिद्धि योग म्हणतात.