विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमेझॉन − हें स्त्रीयोद्धयांचें एक दंतकथात्मक प्राचीन राष्ट्र होतें. युक्झाईन समुद्राच्या किनार्याजवळ पाँटसमध्यें या बायका राहात असून, तेथें त्यांनीं एका राणीच्या नेतृत्वाखालीं एक स्वतंत्र राष्ट्र बनविलें होतें. त्याची राजधानी थर्माडॉन नदीच्या तीरावर असलेल्या थेमिसिरा गांवीं होती. या ठिकाणाहून त्यांनीं सिथिया, थ्रेस, आशियामायनरचा किनारा आणि एजियन बेटें यांवर बर्याच स्वार्या केल्या. अरबस्तान, सिरिया आणि इजिप्तपर्यंत देखील त्यांची मजल गेली होती. स्मर्ना, एफेसस, सिनोम, पाफोस इत्यादि शहरें त्यांनींच वसविलीं असें सांगतात या बायका मूळ पॅलस मेओटिस−अझोव्हचा समुद्र-कडून थर्माडॉन येथें आल्या असें कोणी सांगतात. त्यांच्या राज्यांत कोणाहि पुरुषाला राहण्याची परवानगी नसे; पण फक्त वर्षांतून एकदां आपला वंश नष्ट होऊं नये म्हणून त्या शेजारच्या गार्गारिअन लोकांकडे जाऊन येत. या भेटीपासून होणारी पुरुष संतति त्या मारून टाकीत किंवा त्यांच्या बापाकडे परत पाठवीत; मुलींनां त्यांच्या आया नीट सांभाळीत व कृषिकर्म, पारध व युद्धकला यांचें शिक्षण देत. धनुष्य सज्ज करण्यास कांहीं एक व्यत्यय येऊं नये म्हणून त्यांचे उजवे स्तन कापण्यांत किंवा जाळण्यांत येत असें म्हणतात; व म्हणून अॅमेझॉन हा शब्द ग्रीक अमाझोव्ह्ज ह्म. स्तनरहित या शब्दापासून बनविला आहे; असें कोणी मानितात. पण चित्रांतून ही चाल दिसून येत नाहीं; चित्रांत अॅमेझॉन बायकांनां दोनहि स्तन असेलेले दाखवितात; तथापि उजवा स्तन बहुधा झांकलेला असतो. दुसर्या कांहीं सुचविण्यांत आलेल्या व्युत्पत्ती म्हणजे: '' पुष्टस्तनी '' (ए= जास्तास्तन ) ' पुरुषास्पर्शी ' ( ए = अभाव, स्पर्श ) या होत. मॅझा या सर्क्याशियन शब्दाचा अर्थ'' चंद्र '' असा आहे, यावरून चंद्रोपासनेशीं त्यांचा कांहीं संबंध असावा असेंहि म्हणतात. ग्रीक देवता डायना ही चंद्रदेवता असून ती शिकारीमध्यें दंग असे व तिच्या उपासक कुमारीहि शिकारी पेशा स्वीकारून अविवाहित रहात असत.
अनेक ग्रीक दंतकथांतूत अमेझॉन स्त्रियांचा उल्लेख आढळतो. होमरच्या काव्यांत यांचा उल्लेख आहे. अलेक्झांडर दि ग्रेटच्या काळींहि या दिसतात. त्यावेळची त्यांची थालेस्ट्रिस नांवाची राणी अलेक्झांडरला भेटली व त्याच्यापासून गरोदर राहिली; मिथ्राडेटीझ याच्या सैन्यामध्यें पाँपेनें त्यांनां पाहिलें होतें असें म्हणतात. अल्बेरूनीच्या मतें अॅमेझॉन म्हणजे ज्यांच्यामध्यें कोणीहि पुरुष सहा महिन्यांपेक्षां जास्त काळ राहूं शकतात नाहीं त्या स्त्रिया.
या अमेझॉन वगैरेंच्या गोष्टींचें मूळ कशांत आहे हा प्रश्न अद्याप वादांत आहे. कोणी त्यांनां निवळ काल्पनिक लोक समजतात तर कोणी ऐतिहासिक समजतात यांच्या उपास्य देवता ग्रीक नसून आशियाखंडांतील देवतांसारख्या होत्या. असा एक समज आहे कीं, अमेझॉन बाया मूळच्या मुरळ्या किंवा देवीच्या पुजारिणी असाव्यात व देहदंड म्हणून त्या स्तननाश करीत असतील. दुसरी एक कल्पना अशी कीं, भौगोलिक ज्ञान ज्याकालीं वाढलें, तेव्हां प्रवाश्यांनीं कांहीं स्त्रीशासित जातींविषयींच्या बातम्या आणल्या, त्या अशा कीं, काहीं जातींतून आपल्याकडे जो कारभार पुरुष पहातात तो त्यांच्याच स्त्रियाच पहातात, मातृकन्यापरंपरेची चाल त्यांच्यांत आहे व तेथें स्त्रिया सत्ताधीश आहेत. यावरून अमेझॉन वगैरेंच्या संबंधीं गोष्टींवर लोकांचा साहजीकच विश्वास बसला. अशा तर्हेनें विश्वास बसल्यावर, काव्य व कला यांतून त्यांनां गोवण्यांत आलें व त्यांचीं निरनिराळया प्रकारांनीं वर्णनें करण्यांत आलीं.
या ग्रीक अमेझॉनसारखी एक गोष्ट बोहोमियाच्या इतिहासांत आढळते. आठव्या शतकांत एका बायकांच्या मोठ्या तुकडीनें बोहेमियाच्या डयूकबरोबर युद्ध केलें व त्यांच्या हातीं सांपडलेल्या सर्व पुरुषांनां कैद केलें किंवा ठार मारलें. १६ व्या शतकांत ओरेलाना नांवाच्या स्पॅनिश शोधकानें असें खात्रीपूर्वक लिहिलें आहे कीं, एकदां मॅरॅनॉन नदीवर दक्षिण अमेरिकेमध्यें त्याची लढवय्या स्त्रियांशीं झुंझ लागली होती; त्या स्त्रियांवरून या नदीला अॅमेझॉन असें नांव पडलें. कोणी म्हणतात हें नांव अॅमॅसोना ( नौका-नाशक ), या अमेरिकन-इंडियन शब्दावरून पडलें. हल्लीं अॅमेझॉन हें नांव ( लढवय्या स्त्रिया या अर्थी ) डाहोमेच्या सैन्यांत अस्तित्वांत आहे हें नि:संशय पण डाहोमे फ्रेंचांच्या ताब्यांत ( फ्रेंच प्रोटेक्टोरेट ) असतांना या स्त्रिया नाश पावल्या असें म्हणतात. दुसर्या शूर बायकांचीं व्यक्तिश: उदाहरणें पुष्कळ आहेत.
महाभारतांतहि एका स्त्रीराज्याचें वर्णन आहे तेथील प्रमिला राणीनें पांडवांचा अश्वमेधीय घोडा अडवून त्यांच्याबरोबर घोर संग्राम केला वगैरे वर्णन आहे. बृहत्संहितेंत स्त्रीराज्याचें वर्णन आहे ( १४. २२; १६. १६ ); तें या ग्रीक स्त्रियांच्या वर्णनांशीं कांहीं जुळतें. या दोन राष्ट्रांतील कल्पना परस्परसंबद्ध आहेत कीं स्वतंत्र आहेत हें संशोधकांनीं पहावें पुष्कळशा आपल्या पौराणिक कथा व ग्रीक कथा सारख्या आहेत असें दिसून येतें.
तिबेटमध्येंहि (ज्ञानकोश−हिंदुस्थान आणि जग पृ. २३९) स्त्रीराज्य असल्याबद्दल वर्णन आढळतें. चीनच्या पूर्वेकडेहि एक स्त्रीराज्य असल्याचें वर्णन आढळतें. त्याचें वर्णन असें:−
नू क्वो ह किं वा स्त्रि यां चें रा ज्य.−मात्वान लिन हा आपल्या ग्रंथांत या स्त्रीराज्याबद्दल शामन ह्वुइ शिन याच्या आधारावरून लिहितो:−'' हें राज्य फु−संगच्या पूर्वेस एक हजार ली आहे. येथील रहिवाशांची वागणूक व चालीरीती गंभीरपणाच्या व पद्धतशीर आहेत. यांचा वर्ण फारच शुभ्र व स्वच्छ आहे. त्यांचीं शरीरें फार केंसाळ असून डोक्याचे केंस जमीनीवर लोळतात. वसंत ऋतूंत येथील स्त्रिया जलक्रीडेंत फार मग्न होतात व तेथेंच त्या गर्भवती होतात. हिंवाळ्यांत मुलें जन्माला येतात. या पुरुषी स्त्रियांच्या उर:प्रदेशावर स्तन नसतात. त्यांच्या मानेच्या पृष्ठभागावर केंसांचीं मुळें असतात. व पांढर्या केंसांच्या मुळांतून एक प्रकारचा रस बाहेर पडतांना आढळतो. मुलांनां तीं शंभर दिवसांचीं होईपर्यंत अंगावर पाजण्यांत येतें व इतक्या वयांतच तीं चालूं लागतात. चवथ्या वर्षी त्यांची पूर्ण वाढ होते. पुरुष दृष्टीस पडतांच त्या दूर पळून जाऊन लपून बसतात. कारण नवरा करून घेण्याची त्यांनां भीति वाटते. त्या मसाला घातलेला एक प्रकारचा पाला खाऊन राहतात. त्याचा वास चांगला असतो व चव खारट असते.
इ. स. ५०८ मध्यें लिअंग घराण्यांतील वू−टी राजाच्या कारकीर्दीत त्सिन−न्गन येथून एक इसम समुद्रांतून जात असतां वादळांत सांपडला व वाहात जाऊन एका बेटाला लागला. बेटांत शिरल्यावर त्याला तेथें वस्ती असल्याचें आढळलें. तेथील स्त्रिया चिनी स्त्रियांप्रमाणेंच होत्या. पण त्यांची भाषा त्यास समजण्यासारखी नव्हती. पुरुषांचीं शरीरें मानवप्राण्यासारखीं होती पण त्यांचीं मस्तकें मात्र कुत्र्यांसारखीं होती व त्यांचा शब्द कुत्र्यांच्या भुंकण्यासारखा होता. त्यांचें अन्न एका लहान द्विदल धान्याचें असे व त्यांचीं वस्त्रें कापसासारखीं असत. त्यांच्या घराच्या भिंती कच्च्या विटांच्या व वाटोळ्या आकाराच्या असत व प्रवेशद्वारें गुहेच्या द्वारासारखीं असत.
मार्को पोलोवरील कर्नल यूलेनें लिहिलेल्या पुस्तकांत ( आवृत्ति सन १८७१, व्हाल्यूम २ रा. पृष्ठें ३३८−३४० ) पूर्व आशियांत अनेक कालीं प्रचलित असलेल्या या कल्पित स्त्रीराज्याविषयींच्या प्रचलित असलेल्या अनेक दंतकथा दिल्या आहेत व त्याचा उद्देश '' स्त्री व पुरुष '' या नांवाच्या दोन बेटांबद्दल व्हेनेशियननें जें प्रसिद्ध केलें आहे त्यावर प्रकाश पाडण्याचा आहे. यानेंच उत्तम प्रकारें संपादित केलेल्या ' कॅथे अँड दि वे थिदर ' ( कॅथे व तिकडे जाण्याचा मार्ग ) या नांवाच्या पुस्तकांत सुमात्रांतील स्त्रियांनीं चालविलेल्या राज्याविषयीं मॅरिग्नोलीच्या इ. स. १३३० च्या सुमारास दिलेल्या माहितीचा उल्लेख केला आहे. ह्या बहु केसाळ लोकांचा प्रदेश क्युराईल बेटांच्या बाजूला असावा, व त्यांची तुलना अलास्कांतील कुचिन इंडियन नांवाच्या रहिवाश्यांशीं करण्यासारखी आहे, असें शामन हृवुइ-शिनच्या लेखावरून वाटतें.
या कल्पित प्रदेशाबद्दल चौकशी करण्यांत अधिक वेळ दवडण्यांत अर्थ नाहीं असें वाटलें असतें ; पण ही चर्चा केल्यास फुसंग हा अमेरिकेचा एक भाग आहे असें ठरविण्यास मदत होईल अशी कल्पना एस. वेलिस विल्यम्स यानें प्रदर्शित केली आहे ( ज. अ. ओ. सो. ग्रं. ११. पृ. ८९ ).
[ इ त र सं द र्भ ग्रं थ.−ए. ब्रि. ; ए. रि. ए. होमरचे ईलियड. महाभारत. ब्रृहत्संहिता. व्हर्जिल-इनिअड हिरोडो-टस. लाकौर−ला अमेझोन्स ( १९०१ ). ]
( २ ) दक्षिण अमेरिकेंतील सर्व जगांत मोठी नदी.