विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमेट - ( राजपुताना ) उदेपूर संस्थानांतील त्याच नांवाच्या जमीनदारीचें मुख्य गांव. २५°१८' उत्तर अ० व ७३°५६' पूर्व रेखांश यांवर उदेपूर शहराच्या ईशान्येस ५० मैलांवर चंद्रभागा नदीच्या दक्षिणतीरावर हा गांव आहे. गांवाभोंवती तट असून लोकवस्ती सुमारें साडेतीन हजार आहे. जमीनदारास राऊत असें ह्मणतात. सालीना उत्पन्न २८००० रुपये असून उदेपूर दरबारास २७०० रुपये खंडणी द्यावी लागते. अमेटचा राऊत हा शिसोदिया वंशांतील चोंडावत घराण्यापैकीं आहे. याच घराण्यापैकीं पट्टा नांवाचा एक वीरपुरुष इ. स. १५६७ सालीं अकबराविरुद्ध चितोडचा किल्ला लढत असतांना रामपोल दरवाजाशीं मारला गेला.