विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमेथी - ( संयुक्त प्रांत ) सुलतानपूर जिल्ह्याची नैऋत्येकडील तहशील. परगणे-असल आणि अमेथी. २६°१' ते २६°२०' उत्तर अ. व ८१°३७' ते ८२°४' पूर्व रे. यांचे दरम्यान. क्षेत्रफळ ३६६ चौरस मैल. लोकसंख्या सुमारें दोनलक्ष वीस हजार. खेडीं ४५५; मोठा गांव एकहि नाहीं. स. १९०३–४ त जमीन महसूल ३१९००० व कर वसूल ५१०००रु. यांत क्षार आलेली (ऊसर ) व दलदलीची जमीन पुष्कळ आहे. इ. स. १९०३−४ सालीं १९१ चौ. मैल जमीन लागवडीखालीं असून पैकीं ९८ चौ. मैल बागाईत होती.
(२) ( संयुक्त प्रांत. ) लखनौ जिल्ह्याच्या मोहनलालगंज तहशिलींतील एक गांव. २६°४५' उत्तर अक्षांश व ८१°१२' पूर्व रेखांश यांवर. लोकसंख्या सुमारें साडेसहा हजार. गांव फार पुरातन असून सैयद सालारच्या अधिकार्यांनीं हा जिंकला होता. पुढे तो अमेथिया रजपुतांकडे होता. परंतु इ. स. १५५० च्या सुमारास शेख लोकांनीं जिंकला. या ठिकाणीं पुष्कळ मुसुलमानी फकीरांचा जन्म झाला आहे. वाजीद अली शहाच्या कारकीर्दीत मौलवी अमीर अलीनें अयोध्येच्या प्रसिद्ध देवळा ( हनुमानगढी ) वर मोहीम केली होती. परंतु त्यांत त्याचा पराभव होऊन तो मारला गेला. येथें कापडाचा व्यापार चालतो.