विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमेरिका − ज्यामध्यें विविध देशांचा समावेश होतो, व ज्यांत तीव्रतर थंडीपासून तो प्रखर उष्णतेपर्यंत सर्वप्रकारचें हवामान आढळतें, आणि जेथें कोठें अतिवृष्टि तर कोठें अगदीं अनावृष्टि, कांहीं भागीं शेंकडों मैल पसरलेलें घनघोर अरण्य तर कित्येक ठिकाणीं मैलचेमैल असलेला रुक्ष प्रदेश ; ज्याचा दक्षिणोत्तर विस्तार सर्वांत अधिक ; असे अनेक सृष्टिचमत्कार जर कोणत्या भूभागांत पहावयास मिळतील तर ते अमेरिकाखंडातच होय. एका नांवाखालीं येणारा एवढा मोठा विस्तृत प्रदेश पृथ्वीच्या पाटीवर दुसरा कोणताहि नाहीं. यावरून या खंडास अमेरिका हें प्रथम नांव देण्यात कांहीं तरी सयुक्तिक कारण असेल, असें अनुमान करणें जितकें साहजिक आहे, तितकें तें चूकहि आहे, हें विसरतां कामा नये.
कांहीं अर्वाचीन भूस्तरशास्त्रवेत्ते मात्र ' या दोन खंडास एक नांव दिलें आहे तें बरोबर आहे व शास्त्रीय दृष्टया सकारण आहे ' असें अलीकडे प्रतिपादन करूं लागले आहेत. त्यांच्या मतें आरंभीं पृथ्वी म्हणजे सूर्यासारखा एक वायुरूप तप्त गोल होता व तो थंड होत असतांना, त्याचे कवच आकुंचन पावूं लागलें, पण हें आकुंचन सर्व ठिकाणीं सारखें होत गेलें नाहीं. त्यायोगानें सध्यां जे भूमिभाग दृष्टीस पडतात ते खरोखर चतुष्कोनघनाकृति फलक होत. या विधानास प्रत्यक्ष दृश्य पुरावा म्हणजे अमेरिका खंडाचा त्रिकोणाकृति आकार होय. या त्रिकोणाची एक भुजा म्हणजे उत्तर अमेरिकेच्या आर्तिक किनार्याची विषम रेषा व त्याच खंडाचे पूर्वेकडे व पश्चिमेकडे समुद्रांत दूरवर गेलेली टोकें हेच दोनकोन होत. दक्षिण अमेरिकेचा अंतार्तिक महासागराकडे वळलेला अगदीं चिचोळा भाग हाच या त्रिकोणाचा तिसरा कोन होय.
या खंडाच्या उत्तर व दक्षिण विभागांतील पृष्ठभागाकडे सूक्ष्म रीतीनें अवलोकन केलें असतां, त्याचें पर्वत, नद्या व सपाट प्रदेश यामधील साम्य दिसून येईल. पण इतकें असूनहि प्रत्येक खंडाच्या रचनेंत कांहीं विशिष्टपणा असतो या तत्वास कांहीं बाध येत नाहीं. ज्यांत उघड साम्य दिसतें, त्यांपैकीं ( १ ) ईशान्येकडील मूलभूत प्रस्तराचाभाग, ( २ ) नैर्ऋत्येचे उंचवटयाचे प्रदेश, ( ३ ) पश्चिमेकडे पसरलेले पर्वत व ( ४ ) सखल प्रदेश व त्यांतील नद्या हीं मुख्य आहेत. उत्तर अमेरिका एकंदरींत शीत तर दक्षिण अमेरिका उष्ण आहे हा एक मोठा फरक दृष्टीस पडतो. यूरोप व आशिया खंडातील अगदीं उत्तरेकडील प्रदेशांत आढळणारें प्राणी व वनस्पती उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागांत सांपडतात. पण असलें साम्य दक्षिण अमेरिका व इतर खंडाचे दक्षिणदेश यांत मुळींच दिसत नाहीं, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे.
अमेरिका (उत्तर व दक्षिण मिळून) खंडाचें एकंदर क्षेत्रफळ १४,८००,००० चौरस मैल असून, लोकसंख्या १५,८०,००००० आहे. रेड इंडियन २,३०,००००० आहेत. धर्मानुसार वर्गीकरण केल्यास १३,९३,००००० ख्रिस्ती, २०,३०,००० ज्यू, २,१०,००० हिंदू, १,००००० बौद्ध व २५००० मुसुलमान आढळून येतील.
ब्रि टि श सा म्रा ज्या खा लीं अ स णा रा अ मे रि के चा भा ग.−कानडा, न्यूफाऊंडलंड आणि लॅब्राडोर, ब्रिटिश हाँडुरस, ब्रिटिश ग्वायाना, बर्म्युडा, वेस्ट इंडीज बेटें, (बहामाज, टर्क्स आणि काइकोज बेटें, जमेका, केमन बेटें, बार्बाडोज, विंडवर्ड आणि लीवर्डबेटें, ट्रिनिदाद आणि टोबॅगो ) आणि फाकलंड बेटें. याचें एकंदर क्षेत्रफळ ४०,१०,२१६ चौरसमैल व लोकसंख्या [ १९१७-१८ सालीं ] १,०८,३४००० होती.
फ्रा न्स च्या व सा ह ती.− सेंट पिएरे आणि मिकेलॉन, ग्वाडेलोउपे, मार्टिनिक्वे आणि ग्वायाना यांचें क्षेत्रफळ ३३,२०० चौरस मैल व लोकसंख्या ४,५९,०८२ आहे.
ने द र्लं ड च्या व सा ह ती.−सुरिनाम किंवा डच ग्वायाना आणि कुरॅशाओ. क्षेत्रफळ ४६४६३ चौरस मैल व लोकसंख्या अजमासें दीड लाख आहे.
याठिकाणीं अमेरिकेची सामान्य माहिती दिली. सविस्तर माहिती या खंडांतील निरनिराळ्या देशांखालीं येणार असल्यानें ती येथें गाळली आहे. अमेरिकेचा यूरोपीय लोकांस परिचय, तेथील भाषा, तेथील मानवजाति, तेथील संस्कृति व तेथील लोकांवर यूरोपीयांचें वर्चस्व इत्यादि माहिती ज्ञानकोश प्रस्तावनाखंड विभाग चवथा प्रकरण २३ मध्यें दिली आहे. आतां हिंदुस्थान व अमेरिका यांच्या संबंधाकडे थोडें लक्ष देऊं.
हिं दु स्था न व अ मे रि का.−ज्ञानकोश−प्रस्तावनाखंड विभाग १ ला ( हिंदुस्थान आणि जग, प्र. ९ ) यांत हिंदी लोकांच्या अमेरिकेंतील वसाहतींविषयीं सविस्तर विवेचन दिलें आहे. तें प्रस्तुत विषयाला फार उपयुक्त वाटेल. अमेरिकेंत बहुधां पॅसिफिक किनार्यावरच हिंदी लोक राहतात.
डॉ. रजनीकांत दास यांनीं अमेरिकन संयुक्त संस्थानांच्या लेबर डिपार्टमेंटनें सांगितल्यावरून जो पॅसिफिक किनार्यावरील हिंदी लोकांसंबंधीं रिपोर्ट तयार केला त्याचा सारांश पुढें दिला आहे.
पॅसिफिक किनार्यावरील हिंदुस्थानी लोक:− ज्या ठिकाणीं हिंदी लोक प्रथम उतरले तीं अतिशय महत्वाचीं दोन बंदरें म्हणजे सॅनफ्रॅन्सिस्को व व्हँकुवर हीं होत. या दोन केंद्रांहून ते हळू हळू दक्षिण, पूर्व आणि उत्तर या दिशांकडे पसरले व कालांतरानें पॅसिफिक किनार्याच्या निरनिंराळ्या भागीं ते पोंचले.
१९१० च्या खानेसुमारीवरून पाहतां संयुक्त संस्थानांतील हिंदी लोक पुढें दिल्याप्रमाणें विखुरलेले दिसतात.
कॅलिफोर्निया | २,७,४२ |
वाशिंग्टन | १,४१४ |
न्यूयॉर्क | ४९२ |
ऑरेगॉन | २०८ |
न्यू जर्से | १३१ |
मिसौरी | ११९ |
इतर | ११८ |
एकंदर सं. संस्थानांत | ५,२२४ |
हवाई | ३६२ |
एकंदर | ५,५८६ |
वरील कोष्टकावरून असें दिसून येतें कीं, ब्रिटिश कोलंबिया म्हणजे जेथें १९०५−९ या चार वर्षांत ५,१७९ हिंदुस्थानीं आले, त्याच्या खालोखाल कॅलिफोर्नियांत देशांतर केलेले हिंदुस्थानी लोक होते. यांच्या खालचा नंबर वाशिंग्टनचा लागतो. तेथें १,४१४ हिंदुस्थानी होते; त्यांपैकीं पुष्कळसे ब्रिटिश कोलंबियामधून आलेले होते. ऑरेगॉनमधील बहुतेक हिंदुस्थानी लोक मालगलाठ्यांतील कामकरी आढळले. न्यूयॉर्क संस्थानांतील ५९२ हिंदी लोकांपैकीं न्यूयॉर्क शहरांतच त्यांची मोठी संख्या होती. त्या ठिकाणीं ते बहुतेक खलाशी म्हणून आलेले होते, तर कांहीं थोडे व्यापारार्थ येऊन राहिले होते. हीच गोष्ट न्यू जर्सी व मिसौरी संस्थानांतील हिंदवासीयांची आहे.
मागील कांहीं वर्षांच्या अवधींत संयुक्त संस्थानांतील हिंदी लोकवस्तीच्या वांटणींत बराच फरक पडलेला आहे. हल्लीं पुष्कळसे हिंदुस्थानी खालील जागीं वस्ती करून राहिलेले आहेत:−
सॅन जोआक्विन खोरे :−हें मोठें खोरें. सॅन फ्रॅन्सिस्कोच्या दक्षिणेस सुमारें ७५ मैलांवर आहे व त्यांत कॅलिफोर्नियांतील कांही समृद्ध जिल्हे आहेत. येथील जमीन साधारणपणें वाळु व चिकणमाती यांची बनलेली असून वानस्पत्य-अन्नांतील सर्व खनिज द्रव्यें हींत सांपडतात. पाऊस सरासरी दहा इंच पडत असून मे पासून सप्टेंबरपर्यंतचा काळ कोरडा जातो. उन्हाळयांत उष्णमान ८२° अंशांपर्यंत चढत जाऊन हिवाळयांत ते ४७° अंशांपर्यंत खालीं उतरतें. द्राक्षें, पीच, अप्रिकॉट, बदाम, ऑलिव्ह, अंजीर, संत्रीं, वाटाणे, बटाटे, धान्य आणि भाजी इत्यादि या खोर्यांत पीक येतें.
ही कृषिसंपत्ति सोडून दिली तरी हें नुसतें खोरेंच अति सुंदर व मनोरम दिसतें. सहज पाहणारालाहि येथील सृष्टि सौदर्य मोहून टाकितें, मग येथें वस्ती करून राहण्याची इच्छा बाळगणार्याला, यहुद्यांनां ज्याप्रमाणें पॅलेस्टाइन ही ईश्वरदत्तभूमि (प्रॉमिस्ड लँड ) वाटते, त्याप्रमाणें वाटावी यांत नवल नाहीं.
अमेरिकेंत पाऊल टाकल्यावर लवकरच हिंदी लोकांनां या खोर्याची महति कळली. रेल्वेवर काम करीत असतांना त्यांनां प्रवास करून या समृद्ध प्रदेशाची माहिती करून घेण्याची संधि लाभली व तेथील '' रँच '' ( गोस्थाना ) मध्यें नोकरी मिळविण्याची इच्छा तेव्हापासून उत्पन्न झाली. १९०७ मध्यें प्रथमच या हिंदी लोकांची एक वसाहत सॅन जोआक्विन खोर्यांत झाली. नंतर हळू हळू त्यांच्यापैकीं पुष्कळसे स्टॉक्टन, फ्रेस्नो व बेकर्सफील्ड यांच्या आसमंतांतून राहिले व तेव्हांपासून हीं तीन शहरें सॅन जोआक्विन खोर्यांतील हिंदी कामकर्यांचे मुख्य अड्डे बनले.
या तीन अड्ड्यापैकीं स्टॉक्टन. हें साहाजिकपणें प्रमुख बनलें. हिंदुस्थानी लोकांची बरीच मोठी संख्या स्टॉक्टनच्या सभोंवतालच्या शेतांतून काम करीत असे व एका शेतांतून दुसर्या शेतांत कामासाठीं जातांना स्टॉक्टन येथेंच आपलें ठाणें करणें त्यांनां सोयीचें पडे.
सध्यां स्टॉक्टनभोंवतांलच्या ज्या इतर महत्वाच्या गांवीं हिंदी लोक राहिले आहेत तीं गांवें म्हणजे होल्ट, लोदी व सँडो हीं होत.
या खोर्यांतील त्यांचा दुसरा मोठा अड्डा फ्रेस्नो परगणा होय. पॅसिफिक किनार्यावरील याच ठिकाणीं सर्वांत जास्त हिंदी वसाहतवाले आढळतील. लोनस्टार, कोनेजो, क्लोव्हिस मॅदेश व इतर कांहीं जागीं यांची वस्ती पसरलेली आहे.
सॅक्रॅमेंटो खोरें:—सॅक्रॅमेंटो खोरें हा उत्तर कॅलिफोर्नियाचा दुसरा सक समृद्ध भाग आहे. भौतिक परिस्थिति सॅन जोआक्विन खोर्याहून फारशी भिन्न नाहीं; पण एका महत्वाच्या बाबींत मात्र भिन्नता दृष्टीस पडते. ती म्हणजे या खोर्यांत तांदूळ पिकविण्यास योग्य अशी दलदलीची मोठी जमीन आहे.
सॅन जोआक्विनो खोर्यांत हिंदुस्थानी ज्या वेळीं शिरले त्याच सुमारास या ठिकाणींहि ते आले. पुढें लवकरच सॅक्रॅमेंटो शहर त्यांचें एक मुख्य ठिकाण बनलें. फ्रेस्नो शहराप्रमाणें सॅक्रॅमेंटो शहरहि फिरत्या हिंदी मजुरांचे विरामस्थान आहे. उत्तर कॅलिफोर्नियांतील भातशेतांतील व पश्चिम आणि दक्षिण भागांतील जागांतील काम करण्याचा हंगाम संपला म्हणजे तो सुरू होईपावेतों हिंदी मजूर या शहरीं विसाव्याला राहतात व आपल्या सामाजिक चळवळींमध्यें पडतात.
सेक्रॅमेंटो खोर्यामध्यें या शहराखेरीज दोन निराळ्या भागांत लोकसंघ आढळतात. पहिला फोलसोम, ऑरेंजव्हिले, लूमिस आणि न्यू कॅसल हा फळें पिकणारा भाग व दुसरा मेरिसव्हिले, कोल्युसो, ट्यूडर, विलोज, चिको, बुट्टेशहर, नेल्सन, ग्रिडले आणि ब्रिग्स हा भात पिकणार्या जिल्ह्यांचा भाग. या दुसर्या भागांत हिंदी लोक मोठे यशस्वी व्यापारी बनले असून कॅलिफोर्नियांतील भातपिकाचा मोठा हिस्सा यांच्या हातांत आहे.
इंपीरियल ( बादशाही ) खोरें.—दक्षिण कॅलिफोर्नियांत मेक्सिकोच्या सरहद्दीवर हें खोरें आहे. या खोर्याचा मोठा भाग समुद्रसपाटीच्या खालीं आहे. याची लांबीरुंदी अनुक्रमें ६० व ४५ मैल असून १९२० सालीं लोकसंख्या अजमासें ४३,००० होती. पाऊस एक इंचापेक्षां जास्त पडत नाहीं. हवा नेहमीं कोरडी असते. उष्णमान हिंवाळयांत २४ अंशांखालीं व उन्हाळ्यांत ११५ च्यावर जातें. जमीन चांगली समृद्ध असून शेतकी पाटबंधार्यांवर चालते या खोर्यांतील मुख्य पीक म्हणजे द्राक्षें, कापूस, अलफालफा, मिलो, बार्ली आणि कॅंटेलौप्स.
हिंदी लोक या ठिकाणीं १९१० सालापासून दिसूं लागले; पण त्या वेळीं हा प्रदेश मुळींच सुधारलेला नव्हता. कडक उन्हाळ्यामुळें फारसे अमेरिकन येथें वस्तीस येत नाहींत. या ठिकाणीं हिंदी लोकांनां औद्योगिक चळवळी करण्यास चांगला वाव मिळाला. १९१९ मध्यें या खोर्यांत त्यांची संख्या सुमारें ३०० होती व कापसाचें पीक बुडाल्यामुळें पुष्कळजण जरी बाहेर गेले तथापि एलसेंट्रो, कलेग्झिको, होल्टव्हिले आणि ब्राले यांसारख्या शहरानजीक शेतकींत गुंतलेले २०० तरी हिंदी अद्याप सांपडतील.
ब्रिटिश कोलंबिया:— पॅसिफिक महासागराच्या किनार्यावरच्या कॅनडियन मुलखांतील अति समृद्ध प्रांतांपैकीं ब्रिटिश कोलंबिया हा एक असून त्याचें क्षेत्रफळ ३,७२,६३० चौरस मैल आहे. हा प्रदेश डोंगराळ असला तरी किनार्यालगतची व खोर्यांतील जमीन चांगली सुपीक आहे. हवा समशीतोष्ण व पावसाळी आहे. फळांच्या लागवडीला हा भाग हितावह असल्यानें जगांतील कोणत्याहि भागांत होणारीं फळें येथें उत्कृष्ट प्रकारें होतात. सोनें, चांदी, तांबें, जस्त, पारा, कोळसा व लोखंड यांसारखे खनिज पदार्थ खाणींतून निघतात. मासेहि खोल पाण्यांत व नदींत सांपडतात. जंगलतोड हा एक महत्तवाचा धंदा आहे. व्हँकुवर बेटांत खाणींतून सोनें काढण्याचा मोठा व्यापार आहे. वीस वर्षांपूर्वी येथें येणार्या हिंदुस्थानी लोकांनां हे निरनिराळे उद्योगधंदे चांगले लाभदायक होते.
व्हँकुवर हें तेव्हांपासून पॅसिफिक किनार्यावरील हिंदी लोकांच्या सामाजिक, धार्मिक व औद्योगिक चळवळींचें मोठें केंद्र बनलें आहे. कानडा किंवा संयुक्तसंस्थानें यांतील कोणत्याहि शहरांत येथल्या इतके हिंदू सांपडणार नाहींत. हिंदूंमध्यें शिखांचा भरणा विशेष आहे. व्हँकुवर येथून हिंदी लोक सर्वत्र पसरले व हल्लीं ते न्यूवेस्टमिन्स्टर, फ्रेझरमिल्स, डंकन, कूंब्स, आणि ओशन फाल्स येथें आढळतात.
किरकोळ : — वर उल्लेखिलेल्या केंद्रांखेरीज इतर पुष्कळ संस्थानांत व शहरांत थोडे फार हिंदुस्थानी सांपडतात.
संस्थानें :—हिंदुस्थांनीं लोकांनां आमिष दाखविणार्या इतर संस्थानांमध्यें ऑरेगॉन याचा विशेष प्रामुख्यानें उल्लेख केला पाहिजे. अॅक्टोरिया, लिंटन आणि ब्रायडल व्हेल या ठिकाणीं असलेल्या लांकडाच्या कारखान्यांत पुष्कळसे हिंदी नोकरीस आहेत. दहा वर्षांपूर्वी ऑरेगॉनमध्यें २०० वर हिंदी होते पण लांकूडतोडीचा धंदा कमी झाल्यामुळें व हे लोक इकडे येण्याचेच कमी झाल्यामुळें हल्लीं त्यांची संख्या सुमारें शंभर भरेल.
वाशिंग्टन संस्थानांत बेलिंग्हॅम आणि टॅकोमासारख्या ठिकाणीं असलेल्या निरनिराळ्या लांकूडकारखान्यांतून कांहीं हिंदुस्थानी पूर्वी नोकरीस होते पण हल्लीं त्यांची संख्या फारच कमी दिसते. याचें एक कारण कांहीं राजकारणी लोकांनीं व मजूर पुढार्यांनीं हिंदूविरुद्ध सुरू केलेली मोहीम होय.
उटाह, अॅरिझोना, नेव्हाडा आणि साउथ डाकोटा या संस्थानांतून देखील पुष्कळ हिंदी आहेत. गेल्या महायुध्दांत गव्हाचा भाव जेव्हां फार चढला तेव्हां यांच्यापैकीं कांहींनीं अॅरिझोनामधील चँडलरजवळ जमीन खरेदी करून गहूं पिकविला. त्याचप्रमाणें उटाहांत बर्याच जणांनीं शेतकी आरंभिली. तेथील ब्रिग्हॅम शहराजवळ सुमारें १५ हिंदुस्थानी शेतकी करतात.
शहरें:—व्हँकुवर, व्क्टिोरिया, सॅक्रॅमेंटो या शहरां खेरीज पॅसिफिक किनार्यावर अन्यत्र क्वचितच औद्योगिक चळवळींत पडलेले हिंदी सांपडतील. पण अॅटलांटिक किनार्यावरील पुष्कळ शहरांतून निरनिराळ्या उद्योगधंद्यांत पडलेले पुष्कळ हिंदुस्थानी दिसतात. शिकागो येथें सुमारें ५०, डेट्राईट २०, बफेलो २५, न्यू आर्लियन्स ३५, चार्लस्टन ३० व कांहीं थोडे अॅसबरी पार्क येथें असल्याची माहिती मिळते. बोस्टन, न्यूयॉर्क, फिलाडेल्फिया आणि बाल्टिमोर यासारख्या महत्त्वाच्या बंदरीं किती हिंदुस्थानी आहेत याची मोजदाद करणें फार कठीण आहे.