विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अमोघवर्ष (८१४—८७८)—राष्ट्रकूट राजघराण्यांत चार अमोघवर्ष नांवाचे राजे होऊन गेले, त्यांपैकीं पहिला प्रसिद्ध आहे. आपला पिता तिसरा गोविंद (जगत्तुंग ) याच्यामागून हा गादीवर आला ( इ. स. ८१४ किंवा ८१५ ). यानें धारण केलेल्या अनेक बिरुदांपैकीं ' नृपतुंग ' व ' महाराज-शर्व ' हीं विशेष होत. याला 'महाराज-षंड' व 'अतिशयधवल' अशींहि नांवें होतीं. यांखेरीज त्याच्या दप्तरीं 'महाराजाधिराज' 'परेमेश्वर' 'भटार' 'परमभट्टारक' व 'पृथिवीवल्लभ' यांसारख्या पदव्या आढळतात. शिरूर येथील लेखांत अमोघवर्षाचें जें वर्णन आढळतें त्यांत तीन शुभ्र छत्रें, शंख, पालिध्वज, व ओककेतु असलेला; रट्टकुळांत जन्मलेला, गरुड चिन्हांकित तुरा धारण केलेला; टिविळी वाद्याच्या आवाजावरून ज्याचें आगमन सूचित होतें असा, व ' लट्टलूर-पुर-परमेश्वर ' अशी वंशपरंपरागत पदवी असलेला, अशा शब्दांनीं त्याला गौरविलें आहे. सूडीच्या पश्चिम गंगराजांनीं दिलेल्या दानपत्रावरून याला अब्बलब्बे नांवाची मुलगी होती असें ध्वनित होतें ( ए. इं. पु. ३ ).
अमोघवर्षाला सुखासमाधानानें गादी मिळाली नाहीं असें दिसतें. गुजराथच्या सुवर्णवर्ष—कर्कराजानें त्याला राज्य जिंकून घेण्यांत मदत केली ( ए. इं. पु. १ पा. ५३ ; इं. अँ. पु. १४ पा. २०१ ). पण एकदां गादीवर बसल्यानंतर त्यानें आपल्या बापाइतकाच अधिकार मिळविला व आपलें राज्य मोठें विस्तृत केलें. शिरूरच्या लेखांत म्हटलें आहे कीं अंग, वंग, मगध, मालव, आणि वेंगी येथील राजे त्याच्या सेवेला होते पण हें केवळ अतिप्रशंसा करण्याकरितांच लिहिलें असेल. याच्या अमदानींत एकसारखीं युध्दें चालत होतीं हें खरें इ. ९९३ च्या सांगली दानपत्रांत अमोघ-वर्षानें विंगवल्ली येथें चालुक्यांनां जिंकलें असें लिहिलें आहे. इ. स. ९७२ च्या कऱ्हाड दानपत्रांत व ९०० च्या देओली दानपत्रांत मान्यखेत ( आधुनिक मालखेड-निझामचें राज्य ) शहर त्यानें वसविल्याचें वर्णन आहे. अमोघवर्षाच्या वेळची बरीच माहिती करून देणारे शिलालेख, ताम्रपट वगैरे उपलब्ध आहेत. अतिशय म्हातारपण झाल्यामुळें अमोघ-वर्षानें राज्यत्याग केला व आपला मुलगा कृष्ण ( दुसरा) यास गादी दिली ( भांडारकर—दख्खनचा इतिहास ).
हा जैनधर्मीय होता असें दिसतें. गुणभद्राच्या उत्तर पुराणांतील एका परिशिष्टांत, आदिपुराणकर्ता जिनसेन याचा तो उपासक होता असें म्हटलें आहे. वीराचार्याच्या सारसंग्रह नामक गणितीग्रंथांत प्रस्तावनेमध्यें अमोघवर्ष जैनधर्मानुयायी होता असें एक विधान आहे. '' प्रश्नोत्तर— रत्नमालिका '' नांवाचा लहानसा नीतिग्रंथ अमोघवर्षानेंच राज्यत्यागानंतर लिहिला असें दिगंबर जैन म्हणतात. विवेकात्यक्तराज्येन राज्ञेयं रत्नमालिका । रचितामोघवर्षेण सुधियां सदरलंकृति :' ॥ ( भांडारकर रिपोर्ट १८८३—८४ ) या ग्रंथाच्या जैन प्रतींत वरील श्लोक आढळतो. याच्या तिबेटी भाषांतरांतहि ग्र्रंथकर्तृत्व अमोघवर्षांकडे दिलें आहे. राष्ट्रकूट घराण्यांत कांहीं अमोघवर्ष नांवाचे राजे होऊन गेले पण त्यांपैकीं कोणी हा ग्रंथ रचिला असेल हें संभवत नाहीं. [ इ. अँ. पु. ५;१२—१४ केव्हटेंपल इन्स्क्रिप्शन्स. ए. इं १,३. भांडारकर—अलीं हिस्टरी ऑफ दि डेक्कन. इ. ]