विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
आम्लपित्त − हा स्वतंत्र रोग नसून अग्निमांद्य अगर दीर्घकालीन अपचन या रोगांच्या अनेक लक्षणांपैकीं हें एक लक्षण आहे. जेवण न पचल्यामुळें वरंचेवर आंबट ढेकरा येणें व नंतर अतिशय आम्ल झालेल्या अन्नाची वांति होण्याकडे प्रवृत्ति असणें हा ह्या लक्षणाचा विशेष होय. स्वभावत: जठररस फाजील उत्पन्न होणें अगर पचनक्रियेच्या दुर्बलतेमुळें फार वेळ जठरांत राहिल्यानें अन्न कुजून ब्यूटिरिक, ल्याक्टिक हीं अॅसिडें उत्पन्न होऊन त्यांच्या पीडेमुळें दांत आंबतील इतकी अम्ल वांति होते. चमचा दोन चमचे सोडा बायकार्बनेटची पूड पेलाभर पाण्यांत पाल्यानें या पीडेचें शमन चांगलें होतें. याविषयीं अग्निमांद्य या सदराखालीं अधिक माहिती सांपडेल.
अग्निमांद्य नसूनहि वाचन अगर बारीक काम करण्यामुळे दृष्टीस ताण बसून त्यामुळें वांतीची व मस्तकशूळाची खोड लागते. अशा वेळीं चष्मा वापरण्यासाठीं अगर कांचबिंदु हा नेत्ररोग झाला आहे किंवा काय हें कळण्यासाठीं डोळे तपासून घ्यावेत; कारण कांचबिंदु हा रोग होतांना त्याचें पूर्व स्वरूप म्हणून हें लक्षण मस्तकशूळ या लक्षणासह असतें. आयुर्वेदामध्यें यासंबंधीं पुढील माहिती आढळते:− आमाशय, कंठ, व तोंड यांत दाह करीत आंबट रसाचा द्रव पदार्थ ओकून पडण्याची संवय होते त्यास अम्लपित्ता म्हणतात. केव्हां केव्हां हा अंबट द्रवपदार्थ ( त्यासच पित्त म्हणतात ) गुदद्वारानेंहि बाहेर पडतो. त्यास अधोगत अम्लपित्ता म्हणतात व पहिल्यास ऊर्ध्वगत अम्लपित्ता म्हणतात. पैकीं पहिला उर्ध्वगत म्हणजे तोंडांतून पडणारा अम्लपित्ताचाच विकार फार पाहण्यांत येतो.
या रोगांत रोगी जें खातोपितो त्याचें सर्व पित्तच बनतें यामुळें तें प्रमाणापेक्षां जास्त झाल्यामुळें विकृत होऊन दाह, तहान, इत्यादि विकार करितें व शेवटीं शरीराच्या बाहेर निघून जातें. तें पित्त क्वचित प्रसंगीं कडू व तिखटहि असतें परंतु पुष्कळ वेळां तें आंबटच असल्यामुळें या रोगास अम्लपित्तच म्हणतात.
वैद्यशास्त्राच्या नियमांविरुद्ध अन्न खाणें, आंबट जास्त खाणें, विदाही पदार्थ खाणें, पित्ताप्रकोपकारक सर्व अन्न व पान हीं अम्लपित्ताचीं कारणें आहेत.
अन्न पचन न होणें, थकवा येणे, मळमळणें, जडपणा, कडू किंवा आंबट ढेंकर, हृदय व गळा यांचा दाह, आणि अरुचि हीं अम्लपित्ताचीं मुख्य लक्षणें आहेत.
यांपैकीं अधोगामी आम्लपित्तात तहान, दाह, बेशुध्दि, भोंवळ, अग्निमांद्य, अंगावर गांधी उठणें, रोमांच उभे राहणें, घाम येणें व अंग पिंवळें होणें हीं लक्षणें होतात.
उर्ध्वगामी अम्लपित्तांत ओकारी होते. ती ओकारी हिरवी, पिंवळी, नीळया रंगाची किंवा रक्ताचीहि होते. ती फारच आंबट असते. मांस धुतलेल्या पाण्यासारखी अतिशय बुळबुळीत, कफयुक्त व निरनिराळया खारट, तिखट इत्यादि रसांची ओकारी होते. भोजन झाल्याबरोबर अथवा तें पचत असतां अथवा जेवणाच्या पूर्वीहि केव्हां केव्हां कडू व आंबट ओकारी होते व त्याच रसाची ढेंकरहि येते व कंठ, हृदय, कुशी, यांचा दाह होतो व डोकें दुखतें.
हातपाय जास्त ऊन असणें व त्यांची आग होणें अतिशय अरुचि, ताप, खोकला, कंड सुटणें गांधी उठणें, पुळया उठणें, हीं लक्षणें उर्ध्वगामी अम्लपित्तााचीं आहेत. हा पित्ताधिक्याचा जरी रोग आहे तरी वायु व कफ यांचाहि संबंध यांत येतो. त्यावेळीं त्या दोहोचीं लक्षणेंहि होतात. उर्ध्वगामी असतां ओकारी व अधोगामी असतां अतिसार या रोगांचा संशय वैद्यास येतो, याकरितां वैद्यानें नीट लक्षणें पाहून या रोगाचें निदान करावें, नाहींतर फसण्याचा संभव आहे. यांत वायूचा संबंध असतां, कंप, बड बडणें, बेशुध्दी अंगास चुणचुण सुटणें, अंग गळणें व पोट दुखणें, डोळयापुढें अंधार्या येणें, भोंवळ, रोमांच उभे राहणें हीं लक्षणें होतात.
कफाचा संबंध असतां कफ पडणें, जडपणा, अरुचि, थंडी, गळल्यासारखें वाटणें, ओकारी, तोंड चिकट असणें, शक्ती कमी होणें, अग्नि मंद होणें; कंड सुटणें व झोंप जास्त येणें हीं लक्षणें होतात.
हा अम्लपित्त रोग नवीन असेल तर फार प्रयत्नानें बरा होतो व एक वर्षापेक्षां अधिक दिवसांचा झाला म्हणजे बरा होत नाहीं. कदाचित एखाद्याचा कष्टानें बरा होतो. वाग्भट, चरक, सुश्रुत, या ग्रंथकारांनीं या रोगाचें स्वतंत्र निदान लिहिलें नाहीं. याचा अंतर्भाव पित्ताजन्य अजीर्णांत केला आहे. परंतु याचीं कारणें, लक्षणें, चिकित्सा निराळीं असल्यामुळें माधवकारानें त्याचें स्वतंत्र निदान लिहिलें आहे.
अम्लपित्तामुळें छातीपासून घश्यापर्यंत फार जळजळ लागून रोग्यास जेव्हां तीव्र वेदना होऊं लागतात तेव्हां त्यांचें तात्काल निरसन होण्यासाठीं तो, पुष्कळदां, वैद्याकडे धांव घेतो. अशा स्थितींत त्यास अम्लरस (आसिट्रस, शंखद्रव वगैरे) कधींहि देऊं नये. त्या स्थितींत मोठया प्रमाणांत कांहीं क्षार (अल्कली-वज्रक्षार, जवखार, सज्जिखार, मीठ, सोडा, इ. ) दिला असतां तात्काळ बरें वाटतें. पुष्कळदां, अम्लपित्ताचा कोठयामध्यें अतिशय संचय झाल्यामुळें त्याच्या अंगच्या अम्लधर्माचें पूर्णपणें निरसन होण्यासाठीं क्षाराचें प्रमाण, ठराविक प्रमाणापेक्षां पुष्कळपटीनें अधिक द्यावें लागतें. असें अधिक प्रमाण देतांच आंबण्याची क्रिया बंद होते. दोन द्राम (दहा आणे भार) पर्यंत सुध्दां बायकारर्बोनेट ऑफ सोडा अथवा पोटॅश देणें केव्हां केव्हां भाग पडतें. नुसता सोडा घेण्यापेक्षां तो पाण्यांत विद्रुत करून त्यांत थोडा लिंबाचा रस अथवा टारटरिक ऍसिड मिश्र करून तो फसफसूं लागला असतांना प्याल्यापासून विशेष उपयोग होतो. ह्या उपायापासून आराम नं पडल्यास उलटीचें औषध देऊन कोठयांतील अम्लपित्ताचा संचय बाहेर काढावा. क्षार देऊन मागून उलटीचें औषध देण्यापेक्षां आरंभींच तें देणें अधिक प्रशस्त होय.
नेहमीं क्षार देणें अथवा त्याची संवय लावून घेणें चांगलें नाहीं, कारण अशामुळें कोठयाच्या श्लेष्मलत्वचेस इजा पोंचून कायमचें नुकसान होण्याचा संभव असतो. तथापि मधून मधून जरूर तेव्हां ते मोठया प्रमाणांत देण्यास मागें पाहण्याचें कारण नाहीं. शंखवटी, शंखभस्म, प्रवाळ, मौक्तिक इत्यादिकापासूनहि अम्लापित्तास बराच उपयोग होतो. सूत शेखरमात्रा दोनतीन गुंजांपर्यंत भोजना नंतर घेतल्यापासूनहि बर्याच रोग्यांस उपयोग होतो. इंग्रजी लॉक्टोपेपटीन, पपाईन, हीं औषधें दिल्यानेंहि अम्लपित्तास चांगला उपयोग होतो. फार दिवसाच्या अथवा जीर्ण अम्लपित्तांत किंवा जेव्हां कोटयाच्या रचनेंत कायमचा बिघाड झालेला असतो ( जसें कोटयाचे आतडयाच्या बाजूचें तोंड बंद होणें, श्लेष्म लत्वचेस क्षत पडणें ) तेव्हां उपचाराची कांहीं एक मात्रा चालत नाहीं असें कधीं कधीं दृष्टीस पडतें. कारण पूर्वीच्या आंबलेल्या अन्नाचा अंश कोटयांत आहे तोंच दुसरें अन्न पोटांत पडून तेंहि आंबण्याची क्रिया सुरू होते, अशा रीतीनें चोवीस तास अन्न आंबून ते पृथक्करण पावण्याचा क्रम पोटांत चालूच राहतो. अशा स्थितींत कांहीं सौम्य व शोधक औषध (कांडीझ ल्फुईड, क्रियासोट) मिश्र उदकानें कोठा अगदीं स्वच्छ धुवून टाकिला असतां चांगला उपयोग होतो. दुसर्या उपायांची जेथें कांहींएक मात्रा चालत नाहीं तेथेंहि हा उपाय फायदेशीर होतो. ह्यापासून पोट दुखणें व आंबट पाणी पडणें हीं तेव्हांच कायमचीं बंद होतात. ह्याप्रमाणें घाईचीं लक्षणें दूर केल्यानंतर आंबण्याची क्रिया मुळींच न होऊं देणारी चिकित्स करावी. ह्या कामीं इंग्रजी औषध क्रियासोट हें फार उपयोगीं पडतें. ह्याच्या प्रत्येकींत दोन थेंब असलेल्या तयार गोळया मिळतात. त्यांपैकीं प्रत्येक जेवणानंतर एक तासानें एक गोळी घेत जावी.
याशिवाय क्यार्बालिक ऍसिडचाहि त्याच प्रमाणांत उपयोग करितात. पेपरमिंटाचें तेल ३−५ थेंब दिल्यानें उपयोग होतो. पेपरमिंटाचें तेल हें जबरदस्त शोधक ( ऑन्टीसेपटीक ) असून अगदीं निरुपद्रविक आहे. त्याचप्रमाणें ओंव्याच्या फुलाचाहि चांगला उपयोग होतो. कोरडया
कोळश्याची पूड दिली असतां आंबण्याच्या क्रियेपासून उत्पन्न होणारा वायु त्यांत शोषला जाऊन त्याच्यापासून होणारी रोग्याची पीडाहि दूर होते.
ह्याप्रमाणें करून तीव्र लक्षणें दूर झाल्यावर वैद्यानें कोठयाच्या श्लेष्मलत्वचेची बिघडलेली स्थिति दूर करण्याकडे लक्ष द्यावें, कारण अम्लपित्तााच्या विकृतीचें मुख्य कारण तेंच होय. बिसमथ, म्यागनिशिया, पपाईन, इत्यादि औषधां- पासून कोठयाच्या श्लेष्मलत्वचेची स्थिति सुधारण्यास चांगला उपयोग होतो. ह्याच्या मागून कांहीं पौष्टिक वनस्पति ( काढे चिराईत, कुचला, क्यालंबा क्वाशिया, इ. ) द्यावी.
ज्यापासून अम्लपित्ता वाढतें असें अन्न रोग्यानें खाऊं नये, त्यास अनुभवानें कोणतें अन्न वर्ज करावें हें सहज समजून येतें. दहीं, ताक, वगैरे आंबट पदार्थ वर्ज करावेत. गोड पदार्थहि बेतानें खावे तांदूळ, जोंधळा, ह्यांपासून आंबण्याची क्रिया उत्तोजन पावते, करितां त्यांचा बेतानें उपयोग करून गहू खात जावा. एकंदरींत खाणें सात्विक असून नियमित असावें. रोज नेमानें मोकळया हवेंत होईल तेवढा व्यायाम करावा.