विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अॅम्स्टरडॅम − हॉलंडचें राजधानीचें शहर. हें उत्तार हॉलंड प्रांतांत असून उत्तार अ. ५२°२२' आणि पूर्व रे. ४°५३' यांवर आहे. तें विजेच्या ट्रामगाडयांनीं एडम, पुरमेंरेंड, आलकमार आणि हिलव्हरझम या शहरांशीं जोडलें आहे. ऍमस्टरडॅम म्हणजे ऍमस्टेल नदीचें धरण हें नांव याला ऍमस्टेल नदीवरून पडलें आहे. शहराची तटबंदी सध्यां पडली असून त्याठिकाणीं आतां बगीचे व घरें दृष्टीस पडतात. शहरांत आणि शहराला वेष्टून पुष्कळसे कालवे असून यांतील एकाच्या टोंकाला शोकस्तम्भ आहे. पूर्वी येथून लोक आपल्या आप्तेष्टांनां दु:खित अंत:करणानें रजा देत म्हणून याला हें नांव पडलें असें म्हणतात. ' प्रिन्सेन ग्रयाट ' या नांवाच्या कालव्याच्या उत्तारेस डी. जॉरडम नांवाचा नँटीजचें फर्मान-प्रॉटेस्टंटाविरूद्ध-(एडिक्ट ऑफ न्याटिज ) मुळें पळून आलेल्या फ्रेंच लोकांनीं वसविलेला प्रांत आहे. शहरच्या अगदीं जुन्या भागांतील रस्ते अरुंद व ओबडधोबड आहेत. परंतु नवीन भागांतील रस्ते रुंद असून त्यांच्या दुतर्फा झाडें लावलेलीं आहेत. या भागाच्या अगदीं मधोमध व्हाँडेल पार्क म्हणून एक आरामस्थल असून त्यांतज स्ट व्हॉन डेन व्हॉडेल या राष्ट्रीय कवीचा पुतळा आहे. शहराच्या जुन्या भागांत प्राणिशास्त्रविषयक व वनस्पतिशास्त्रविषय बगीचे आहेत.
अॅमस्टेल नदीचें धरण हें फार महत्वाचें ठिकाण असून या ठिकाणीं सर्व ट्रामगाडीचे रस्ते येऊन मिळतात. या धरणाच्या मध्यभागीं १८३० च्या बेलजिअन राज्यक्रांतींत धारातीर्थी पतन पावलेल्या योद्धयांचें स्मारक आहे. त्याला ' मेटल क्रॉस ' असें म्हणतात. अॅम्टरडॅम येथें जो राजवाडा आहे, त्यासंबधीं लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याला खांबांचा बिलकूल आधार नाहीं. येथील प्रार्थनामदिर गांथिक पद्धतीनें बांधलेले असून तेथें हॉलंडच्या राजांनां राज्याभिषेक होत असे. या शहरांत पुष्कळ पाहण्याजोगीं पदार्थसंग्रहालयें व चित्रगृहें असून त्यांत ' रीक्स म्यूझिअम ' चा पहिला नंबर लागतो.
ऍम्स्टरडॅम येथें दोन विश्वविद्यालयें आहेत. ऍमस्टर डॅमच्या विश्वविद्यालयांत १,००,००० ग्रंथ आहेत. शिक्षक शाळा, उद्योगधंदे शिकविणार्या शाळा व शिल्पशाळा इत्यादि निरनिराळया धंदेशिक्षणाच्या संस्था आहेत आणि या सर्व संस्था विशेषत: लोकांच्या सहाय्यानें चालल्या आहेत. येथें ' सर्व जनहितसाधक मंडळ ' म्हणून शिक्षणप्रसाराकरितां स्थापिलेली एक संस्था आहे.
येथील मुख्य मुख्य आयात मालाच्या वस्तू म्हणजे इमारतीचें लाकूड, कोळसा, धान्य, अशुद्ध खनिज पदार्थ व पेट्रोलिअम ह्या होत. तंबाखू, चहा, कॉफी, साखर इत्यादि पदार्थ येथें वसाहतींतून येतात. हिर्याचे पैलू पाडण्याचा धंदा येथें बर्याच मोठया प्रमाणावर चालतो. साबू, तेलें, लोखंड इत्यादि विषयक धंदेहि चालतात.
ज्याला सध्यां अॅम्स्टरडॅम म्हणतात तें स्थळ पूर्वी ऍम्स्टेलच्या अमीरउमरावांच्या ताब्यांत होतें. तें १२९६ त त्यांच्यापासून गॉथ ऑफ हॅनॉल्ट याला मिळालें. वेस्ट फॅलीआच्या तहानें या शहराला बरेंच महत्तव प्राप्त झालें. प्रथम प्रथम अॅम्स्टरडॅम हें विल्यमच्या घराण्याचा द्वेष करीत असे. पण पुढें तें तिसर्या विल्यमचें कट्टें पुरस्कर्ते बनलें. १७९५ ते फ्रेंचांनीं तें काबीज केलें व पुढें कांहीं काळानें हॉलंडच्या राज्याच्या राजधानीचें शहर बनलें.
हॉलंड देशांत गुल्डेन नांवाचें नाणें चालूं असून त्याची किंमत सव्वारुपाया आहे. शंभर सेंटिमचा एक गुल्डेन होतो. येथील जुन्या राजवाडयाचा हल्लीं टौन हालसारखा उपयोग होतो. राजवाडयांतील जमीनीस, भिंतीस सर्व ठिकाणीं पांढरा दगड बसविला असल्यानें आंतील काम प्रेक्षणीय झालें आहे. न्याशनल म्यूझियम फार जुनाट म्हणजे सन १६०० तली असून तींतील चित्रें चांगलीं आहेत. हें पाहाण्यास तीन तास लागतात. नव्या वस्तींत क्रिस्टल पॅलेस ( स्फटिकमंदिर ) म्हणून एक नाटकगृहाची मोठी जागा आहे. पॅलेसमध्यें पाहण्यासारखें फारसें कांहीं नाहीं. या भागांतील वस्ती चांगली असून रस्तेहि उत्तम आहेत. गांवांत समुद्राचे अनेक लहान लहान कालवे असल्यानें या शहरास '' छोटे व्हेनिस '' म्हणतात. कालव्यांच्या कांठांनीं गाडया जातील इतके रुंद रस्ते केले आहेत ( यूरोपचा प्रवास मुजुमदार १९१५ )
अम्हारा- अबिसीनिया देशामधील मध्यप्रांत. गोंडार हें या प्रांताचें मुख्य शहर होय. मध्ययुगापासून १८५४ सालापर्यंत अबिसीनियाच्या बादशहाचें गोंडार हें निवासस्थान होतें. येथील रहिवाशांची भाषा अम्हारिक-ही अबि-सीनियांतील राजदरबारची भाषा होय.