विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अयुथिया − सयाममधील एक शहर. उत्तर अक्षांश १४°२ आणि पूर्व रेखांश १००°३२' यांवर. हल्लीं हें शहर '' क्रुंग कावो '' ( जुनी राजधानी ) नांवानें सयामांत ओळखले जातें. मेनाम नदीनें परिवेष्टिलेल्या एका मोठया बेटावर या प्रसिद्ध शहराचे अवशेष आढळतात. चार शतकां पेक्षां जास्त काल ही सयामची राजधानी होती. बहुतेक रहिवाशी तरत्या घरांतून राहतात, या जुन्या शहराचे अवशेषा पुराणवस्तुसंशोधनशास्त्राच्या दृष्टीनें फार महत्तवाचे
वाटतात म्हणून पुष्कळसे स्थानिक पदार्थसंग्रहालयांत ठेवलेले आढळतात. गांवाबाहेर हत्ती धरण्याकरतां एक प्राचीन जागा आहे. तिचा अद्यापहि त्या कामीं उपयोग करितात. अयुथिया हें रेल्वेनें बँकॉकपासून ४२ मैलांवर आहे. दरवर्षी येथून बँकाकला आगगाडीनें व जलमार्गानें पुष्कळ भात जातें व उलट तिकडून शेतकर्यांना उपयोगी अशा वस्त्रप्रावरणदि वस्तू येतात. येथें दुसरा कोणताहि व्यापार नाहीं. हें सयामच्या संपत्तिमान् प्रांतामधील एक मोठें शहर आहे. हाय कमिशनर येथें राहतो. पूर्वी राजेलोकांनीं उन्हाळयाकरितां बांधलेल्या इमारतींतून हल्लीं सरकारी कचेर्या आहेत.
ऐतिहासिक दृष्टीनें सयाममध्यें अयुथियासारखें दुसरें मनोरंजक स्थान नाहीं. ऐतिहासिक अवशेषांतून पडके राजवाडे, देवळें, किल्ले, तट वगैरे प्राचीन वैभवाचीं चिन्हें सांपडतात. प्रारंभींच्या यूरोपियन प्रवाशांनीं पाश्चिमात्य राष्ट्रांनां सयामचें ज्ञान या अवशेषांवरून करून देऊन हल्लींच्या परकीय व्यापाराचा व दळणवळणाचा पाया घालून दिला. ब्रह्मी लोकांनीं हें शहर दोनदां उध्वस्त केलें; एकदां १५५५ मध्ये व दुसर्यांदां १७६७ मध्यें. दुसर्यारीपासून येथून सयामची राजधानी हलविण्यांत आली.