विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरख - ही उत्तर हिंदुस्थानांतील शेतकर्यांची जात द्राविड वंशांतील दिसते. १९०१ च्या खानेसुमारींत यांची संख्या ७६,४३६ भरली. यापैकीं बहुतेकजण संयुक्त प्रांतांत आढळले. १९११ च्या खानेसुमारींत मध्यहिंदुस्थानांत २,५२९ अरख होते. मध्यप्रांत व वर्हाडमध्यें १,९९९ व संयुक्त प्रांतांत ८४,५९१ हिंदु अरख आणि ६५ मुसुलमान अरख सांपडले. हे आपल्याला हिंदु असें जरी म्हणवितात तरी त्यांचा धर्म म्हणजे वास्तविक वन्यधर्मांचेंच
एक स्वरूप आहे असें म्हणतां येईल. त्यांची कुलदेवता देवी असून तिला ते बोकड बळी देतात व या वेळचा संस्कार हलक्या दर्जाच्या ब्राह्मणाकडून करविला जातो. ते सामान्यत: हिंदूसण पाळतात. कर्वाचौथ या सणाच्या दिवशीं त्यांच्या बायका कर्वा घातलेल्या मातीच्या भांड्यांतील पाणी जमीनीवर ओतून चंद्राची पूजा करितात. मध्यहिंदुस्थानांत ब्राह्मण त्यांच्या घरी पूजेला जात नाहींत. ते करतल देव नांवाच्या सर्पदेवतेची प्रमुखत्वानें उपासना करितात.
म ध्य प्रां तां ती ल अ र ख. - चांदा जिल्हा व वर्हाड यांत हे बरेच आढळतात. हे आपली उत्पत्ति परशुरामास एकदां जळू चावली असतां निघालेल्या रक्तापासून झाली असें म्हणतात व युद्धांत त्याला मदत केली नाहीं म्हणून अथवा त्याच्या पश्चात त्याच्या धनुष्यानें शिकार केली ह्मणून शाप दिल्यामुळें यांच्यांत दोन भेद झाले असें ह्मणतात एका पोटभेदाचें नांव पासो व दुसर्याचें अरख असें पडलें. हे लोक पक्षी धरतात आणि शिकारहि करतात. हे हिंदू पद्धतीनें लग्नें करीत नाहींत. हें डुकरें पाळतात. मद्यमांस यथेच्छ खातात, पण चांभारास शिवत नाहींत. चाद्यांतील अरख गोंडांचे अगदीं जवळचे भाईबंद दिसतात. ते सगोत्रविवाह करीत नाहींत. हे कुलाचारप्रमाणें ३, ४, ५, ६, ७, ८, आणि १२ देवताची पूजा करितात आणि समान संख्येच्या देवाची पूजा करणारीं घराणीं परस्पर विवाहसंबंध करीत नाहींत. यास माटिया, तेखाम, तेसली, गोदाम, मडई, सयाम अशीं अडनावें देवांच्या संख्येवरून पडली आहेत. हे लोक गोंड आणि पासी यांच्या संबंधापासून झालेले असावें असें रसेल व हिरालाल आपल्या ग्रंथांत म्हणतात. यांच्या सामाजिक चालीरीती कनिष्ठ हिंदूजातीप्रमाणें आहेत. लग्नें मारुतीच्या देवळासमोर अगर आदल्या वर्षी होळी जाळली असेल त्या जागेवर होतात. मुलीचें शुल्क २५ ते ४० रुपये असतें. विधवेच्या विवाहांत वर तिच्या घरीं जातो. तेथें वधू-वरांस स्नान घालतात. त्यांस पाटावर बसवितात आणि जवळ कपाशीचें झाड लावितात. नवरा ५ दोर्यांचें पोतीचें मंगळसूत्र वधूच्या गळ्यांत बांधतो. मृतांचें अशौच १ दिवस पाळतात. (सेन्सस रिपोर्ट; रसेल आणि हिरालाल-कास्ट अँड ट्राइब्स इन सी. पी. ए. रि. ए.)