विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरंतांगीं - (मद्रास इलाखा). तंजावर जिल्हा. पुत्तको ट्टई तालुक्यांतील एक गांव. साउथ इंडियन रेल्वेवर असून डिस्ट्रिक्ट बोर्ड रेल्वे या गांवांपर्यंत आली आहे. इ. स. १९०१ मध्यें लोक सं. २९२६ होती. येथें दरवर्षी अजमासें ३४० २६' पाऊस पडतों. येथें प्रवाश्यांकरितां डिस्ट्रिक्ट बोर्डानें बांधलेलें एक छत्र आहे. उत्तम प्रकारचें भात, तंबाकू, भुइमुगाच्या शेंगा हीं मुख्य पिकें असून, सुती, रेशमी, व जरतारी कापड तयार होतें. रंगविण्याचें कामहि मोठ्या प्रमाणांत चालतें.
आसपास लॅटेराइट नांवाचा दगड पुष्कळ सांपडतो. त्याचा इमारतीकामाकरितां उपयोग करतात. पंधराव्या शतकांत पांड्य राजांचा सेनापति रामनदचा राजा यानें तंजावरच्या राजापासून हा गांव जिंकून घेतला व पांड्य राज्यास जोडला. सतराव्या शतकांत हा गांव तंजावरकडे होता परंतु इ. स. १६४६ सालीं पुन्हां रामनदचा राजा रघुनाथ तेवन यानें जिंकून घेतला. परंतु झालेल्या तहान्वयें पुन्हां हा गांव तंजावरकडे गेला. यानंतर इ. स. १६९८
सालीं जी लढाई झाली तींत रामनदनें पुन्हां हा गांव जिंकला. याप्रमाणें कधीं तंजावरकडे व कधीं रामनदकडे हा गांव असे. अखेरीस इ. स. १७४९ पासून तंजावरकडे हा गांव आहे. येथील किल्ल्यांत व शिवाच्या देवळांत प्राचीन शिलालेख आहेत.