विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरबीपाशा – (सुमारें १८३९-१९११) हा इजिप्त मधील योद्धा व राज्यक्रांतिकारक पुढारी १८३९-किंवा १८४० मध्यें फैल्ला कुळांत जन्मला. सैन्यांत साधारण दर्जाची सक्तीची नोकरी केल्यावर वाढतां वाढतां तो १८६२ मध्यें एक सैन्याधिकारी बनला व १८७५ त इस्माइलपाशाच्या अधिपत्याखालीं जी अबिसीनियन मोहीम झाली तींत तो होता. याच मोहिमेंत पैसे खाल्ल्याचा त्याच्यावर आरोप आला होता पण तो शाबीत झाला नाहीं, तथापि त्याला अर्ध्या पगारावर ठेविलें. या अवधीत इजिप्शियन सैन्याची तुर्की अधिकार्यांपासून सुटका करण्याकरितां अल्लीरुबीनें स्थापलेल्या गुप्त कटांत तो सामील झाला. एल्लअझारच्या मशीदींत चाललेल्या व्याख्यानमालेंत भाग घेऊन उत्तम वक्ता अशी त्यानें प्रसिद्धी मिळविली. इ.स. १८७८ मध्यें नूबर रिव्हर्स विल्सन, आणि डी ब्लिगनिएरेस, यांच्या मंत्रीमंडळाविरुद्ध अराजकता माजविण्याच्या कामीं इस्माइलनें त्याला नेमिलें व मोबदला म्हणून आपल्या जनानखान्यांतील एक बायको, व एका तुकडीचे आधिपत्य त्याला अर्पण केलें. यामुळें गुप्त संघांतील त्याचें वजन वाढून यूरोपियन लोकांविरुद्ध त्या संघानें चळवळ चालविली. पुढील सर्व कृत्या-असंतोषी इजिप्शियनांचा पुढारी म्हणून अरबीचें नांव पुढें करण्यांत आलें होतें. पण वास्तविक पाहतां अल्लीरुबी आणि महमद समी यासारख्या वरचढ माणसाच्या हातातील तो केवळ बाहुलें व त्याचें मुख बनला होता. इ.स. १८८१ च्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेस अरबी आणि दोन इतर इजिप्शियन सेनाधिकारी यांनां लष्करी न्यायकोर्टापुढें ओढून आणिलें पण त्यांच्या सैनिकांनीं त्यांनां सोडविलें. यामुळें खेदीवाला आपल्या त्यावेळच्या युद्धमंत्र्याला पदच्युत करून त्या जागीं महंमूद समीला नेमावें लागलें. ता. ८ सप्टेंबर १८८१ या दिवशीं अरबीनें सैनिकांचा पुढाकार घेऊन खेदीवला सैन्याची संख्या व पगार वाढविणें भाग पाडून शिवाय रियाजपाशा या मुख्य प्रधानाच्या जागीं सेरिफपाशा आणि शिष्ट लोकांचें एक सल्लागार मंडळ नेमणें भाग पाडिलें. इ.स. १८८२ च्या आरंभीं हा अरबी युद्धखात्याचा दुय्यम चिटणीस झाला तरी आपली कारस्थानें त्यानें सोडलीं नाहींत. बजेटावर मतें देण्याचा हक्क शिष्ट सल्लागार मंडळानें जेव्हां मागितला तेव्हां इजिप्शियन जमावसुली खात्याची व्यवस्था ठेवण्याकरतां नेमलेल्या परकी नियामक अधिकार्याशीं तंटा होण्याचा प्रसंग उद्भवला. फेब्रुवारी महिन्यांत सेरीफ जाऊन महंमूद समी जेव्हां मुख्य दिवाण झाला तेव्हां अरबीपाशा युद्धमंत्री बनला. ब्रिटिश सरकारला घाबरून सोडण्याजोगी मुखत्यारी त्यानें लवकरच मिळविली. जूनच्या आरंभी ब्रिटिश आणि फ्रेंच लढाऊ गलबतें अलेकझँड्रियाका आलीं, व त्या शहरांत त्या महिन्याच्या अकराव्या तारखेस दंगा होऊन अनेक यूरोपियनांचे बळी पडले. तेव्हां अरबीनें मध्यें पडून शांतता केली पण आता त्याचा कल उघडपणें यूरोपियनाविरुद्ध दिसला. अलेक्झँड्रिया येथील त्यानें चालविलेल्या किल्ल्यांचा बंदोबस्त ब्रिटिश आरमारला तोंड देण्याकरितां होता असें समजण्यांत येऊन, फ्रान्सची मदत नसतांना सुद्धां ब्रिटिश आरमारानें किल्ल्यावर तोफा डागल्या, आणि तेलेल केबीर येथें सर गारनेट वूल्सले यानें अरबीचा पराभव केला. अरबी केरोला पळाला; पण तेथें शरण आल्यावर बंड करण्याच्या गुन्ह्यावरून त्याची चौकशी चालविली. अरबीनें गुन्हा कबूल केल्यावर फांशीची शिक्षा रद्द करून सिलोनला हद्दपार करण्यांत आलें. महंमूद समी आणि इतर यांनां हीच शिक्षा देण्यांत आली. शिक्षा जन्मठेप होती तरी सुमारे वीस वर्षांनीं आपल्या अधिकारांत १९०१ सालच्या मे महिन्यांत खेदिवानें अरबीला इजिप्तला परत येण्याची परवानगी दिली. १८८१-१८८२ च्या चळवळींत अरबी हा खरा प्रोत्साहन देणारा नसून केवळ पुढें दिसणारा मनुष्य म्हणून होता व ज्यांच्या हातांतलें बाहुलें होऊन तो राहिला होता त्यांच्यापेक्षां तो कमी हुषार असला तरी जास्त प्रामाणिक होता. हा १९११ मध्यें मृत्यु पावला.