विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरबी समुद्र – हिंदी-महासागराचा भाग. याला पूर्वेस हिंदुस्थानानें, उत्तरेस बलुचिस्तान आणि इराणचा दक्षिण भाग यांनीं, पश्चिमेस अरबस्तानानें, आणि दक्षिणेस कन्याकुमारी व केप गार्डाफुइ यांमधील रेषेनें मर्यादीत केलें आहे. त्याच्या दोन शाखा आहेत. त्या नैॠत्येला बाबेल मँडेबच्या सामुद्रधुनीच्या मार्फत तांबड्या समुद्राला मिळणारे एडनचें आखात आणि वायव्येला इराणच्या आखाताला मिळणारें ओमानचें आखात या होत. वरील शाखांखेरीज खंबायतचें आखात आणि कच्छचें आखात हींहि आहेत. हिंदुस्थान आणि यूरोप यांच्यामधील प्रमुख रस्त्याचा भाग म्हणून अरबीसमुद्राला महत्त्व आहे. यांतील द्वीपें फार लहान व अप्रसिद्ध आहेत. यांपैकीं मुख्य म्हणजे सोकोत्रा आणि लखदीव बेटें होत.