विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरसुपल्ली — कोचीन प्रांतातील एका जातीचें नांव. हे लोक तेलगु, किंवा कानडी आहेत हें निश्चितपणें माहीत नाहीं. अरसु किंवा राजपिंडे ही जात म्हैसूरच्या राजांची आप्तसंबंधी आहे. हे शेतकींत किंवा म्हैसूरच्या राजवाड्यांत नोकरीस आहेत. राजपिंडे यांचा धर्म शैव व वैष्णवहि आहे. यांचे उपाध्याय ब्राह्मण आणि लिंगायत वडेर असतात. अरसु (= राजा ) हा पल्ली आणि परैयन तामिळ जातींचा एक पोटवर्ग आहे. उर्स हें अरसु याचें संकुचित रूप असावे. हें नांव म्हैसूर राजघराण्याच्या मंडळींत आढळतें; जसें :- कांतराज उर्स. [ सेन्सस रिपोर्ट-कोचीन; थर्स्टन].