विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरसूर डोंगर — (मुंबई इलाखा.) महीकांठा एजन्सीतींल पर्वत. दांता गांवाच्या उत्तरेस सुमारें १८ मैलांवर, अरवली पर्वताच्या नैॠत्य कोंपर्याशीं व सरस्वती नदीच्या उगमाशीं जें आंबा भवानीचें (आंबाजीचें) प्राचीन देऊळ आहे त्याच्यामुळें हा डोंगर प्रसिद्ध आहे. वलभीच्या काळांत इ. स. ७४६ सालीं हें जितकें प्रसिद्ध होतें तितकेंच हल्लीं प्रसिद्ध आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. श्रीकृष्णानें रुक्मिणीचें हरण याच ठिकाणीं केले अशी कथा आहे (उमरावती पहा). दरवर्षी नवरात्रांत या ठिकाणीं मोठी जत्रा भरते. आठव्या माळेस दांताचा राणा पूजेस हजर असतो. देऊळ कधीं बांधलें याचा पत्ता लागत नाहीं. देवळाच्या कांहीं खांबावर सोळाव्या शतकांतील शिलालेख आहेत. अंबाभवानीच्या देवळाच्या आग्नेयीस चार मैलांवर कोटेश्वर महादेवाचें देऊळ आहे. भवानीच्या यात्रेस आलेले यात्रेकरू या देवाचें दर्शन घेण्यास येतात व सरस्वती नदींत स्नान करतात. (बाँ. गॅ. पु. ५; अंबाभवानी पहा)