विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरा [ १ ] — जशपूर संस्थानांतील याच नांवाच्या इलाखादाराचें गांव. हें जशपूर नगरच्या पूर्वेस दहा मैल आहे. इलाखादाराची एकंदर इस्टेट २८ गांवची आहे. इलाखादार 'रोतिया' जातीचा असून त्यास 'नायक' ही पदवी आहे. येथें एक प्राथमिक शाळा आहे.
[२] बंगाल प्रांतांतील शहाबाद जिल्ह्याचें मुख्य ठिकाण. इ.स. १८५७ सालच्या बंडाच्या वेळीं दिनापूरहून २००० शिपाई व कुवरसिंगाच्या हाताखालीं कांहीं खेड्यांतील लोक या गांवावर चाल करून आले. तेथील इंग्रजांचीं बायकामुलें अगोदरच बाहेर पाठवून दिलेलीं होतीं; व गांवांत फक्त थोडे इंग्रज व शीख शिपाई उरले होते; ते सर्व एका लहान घरांत जाऊन बंदोबस्तानें राहिले. त्यांनीं ८ दिवसपर्यंत आपला बचाव केल्यावर त्यांच्या मदतीला व्हिन्सेंट ऐयर हा सैन्य घेऊन आल्यामुळें कुवरसिंगास वेढा उठवून जावें लागलें.
येथें १८६५ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली आहे. तिचें उत्पन्न ५५००० रु. व खर्च ४८००० होता. ह्या गांवाला सन नदीचें गाळलेले (फिल्टर्ड) पाणी मिळतें.