विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरे — आर्य शब्दापासून या जातिवाचक शब्दाची उत्पत्ति दिसते. हे लोक मध्यप्रांत व त्रावणकोर या भागांतच आहेत. १९११ साली हिंदुस्थानांतील एकंदर २,४१२ अरे लोकांपैकीं २,२८९ मध्यप्रांत-वर्हाडांत व बाकीचे त्रावणकोर संस्थानांत आढळले.
मध्य प्रांतांतील अरे.— चांदा जिल्ह्यांतील शेतकी करणारा हा वर्ग असून यांची संख्या २००० पेक्षां जास्त आहे. मध्यप्रांतांत हे तेलंगणातील आलेले कुणबी लोकाप्रमाणें राहणारे लोक आहेत. यांचीं कांहीं आडनांवें कुणब्यांप्रमाणेच आहेत. जसें खैरे, तिरेळे. इतरांचीं नांवे कायथ व खत्री अशीं आहेत. हे ब्राम्हण बनिया व कोमटी लोकांस जातींत घेतात. महाराष्ट्रांतून हे पूर्वीं तेलंगणांत जाऊन तिकडून चांद्याकडे आले असावे.
तेलंगणांतील अरे.— तोवळ तालुक्याच्या दक्षिण भागांत हे लोक राहतात. ब्राह्मणांच्या सर्व धर्मविधीचें आचरण ते ब्राह्मणांच्या मदतीनें करतात परंतु ते ब्राह्मणांबरोबर अन्नोदक विधी करीत नाहीतं. सुतक व वृद्धि यांचा काल १५ दिवस असतो. [ सेन्सस रिपोट, व हिरालालकास्ट अँड ट्राइब्स सी. पी.]