विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्क - कोणत्याहि औषधीद्रव्याचा अर्क काढण्याच्या दोन मुख्य रीती आहेत. त्याचा काढा किंक कषाय करून त्यांतील उपयुक्त द्रव्यें त्या होत आणणें किंवा अलकोहालमध्यें (मद्यार्कांत) कांहीं वेळपर्यंत त्या पदार्थास ठेवून त्या रीतीनें त्यातील अर्क किंवा सत्त्व काढणें. आपल्या आर्यवैद्यकाप्रमाणें कषाय काढण्याचे ५ प्रकार आहेत, ते खाली दिल्याप्रमाणे :-
(१) कोणत्याहि ताज्या वनस्पति आणून त्याच वेळेस कुटून फडक्यांत गाळून त्या वनस्पतीचा जो रस निघतो, त्यास अंगरस म्हणतात. (२) औषधी कुटून त्या सर्व औषधींचा उपयोग करणे यास कल्क म्हणतात. (३) २ तोळे औषधी कुटून त्यांत ६ तोळे थंड पाणी घालून एक रात्रभर किंवा कांहीं तासपर्यंत ठेवल्यानंतर तें पाणी गाळून उपयोगांत आणणें यास हिम किंवा शीतकषाय म्हणतात. (४) उकळी फुटलेल्या ३ तोळे पाण्यांत ९ तोळा औषधी टाकून १०-११ तासांनीं तें पाणी गाळून घेणें व (५) ३२ तोळे पाण्यांत २ तोळे औषधी घालून तें पाणी उकळून १। तोळा राहिल्यावर घेणें. यास कषाय म्हणतात.
इंग्रजी पद्धतीप्रमाणें कोणत्याहि औषधी पदार्थाचे अर्क काढणें झाल्यास तो पदार्थ कांहीं दिवस शुद्ध मद्यार्कांत ठेवून नंतर गाळून घ्यावा म्हणजे पदार्थांचा अर्क होतो. उदाहरणार्थ पे प र मिं टा चा अ र्क.— पेपरमिंटाचें तेल १ औंस किंवा त्याच्या कांड्या घेऊन ४ औंस शुद्ध केलेल्या मद्यार्कांत टाकाव्या व त्या मिश्रणास रंग येण्याकरितां १॥ ग्रेन कारमाईन पिंवळा रंग त्यांत मिळवावा म्हणजे रंगदार 'एसेन्स' बनतें. अर्वाचीन पद्धति "एन्सेस" या शब्दाखालीं सविस्तर दिली आहे. कॉ फी चा अ र्क.— ३ औंस उत्तम प्रकारची भाजलेल्या कॉफीची वस्त्रगाळ पूड येऊन ९० डिग्री शुद्ध ३ पैंट मद्यार्कांत घालावी व एक आठवडापर्यंत बाटलीस घट्ट बूच मारून ठेवावें म्हणजे अर्क तयार होतो.
[ गु ला बा चा अ र्क.— गुलाबी अत्तर ७ द्राम घेऊन १ ग्यालन मद्यार्कांत घालून ७-८ दिवसांनीं उपयोगांत आणावा. सुं ठी चा अ र्क.— १ पैंट शुद्ध मद्यार्कांत ५ औंस दळदार सुंठीची पूड टाकून एक आठवड्यानंतर गाळून मिश्रण बाटलींत भरून ठेवावें. द व ण्या चा अ र्क.— ५ तोळे ओला किंवा वाळलेला दवणा घेऊन तो २० तोळे शुद्ध मद्यार्कांत १० दिवस भिजत ठेवून नंतर गाळावा. ध ण्या चा अ र्क.— ५ तोळे धणे घेऊन २० तोळे शुद्ध मद्यार्कांत ७ दिवस भिजत ठेवावें व नंतर गाळावें. के श रा चा अ र्क.— उत्तम केशर ४ औंस घेऊन ४ पैंट शुद्ध मद्यार्कांत ३ दिवस भिजत ठेवावें. नंतर त्यात आणखी २ पैंट मद्यार्कं घालून आणखी ३ दिवस भिजूं द्यावा व गाळून मजबूत बुचाच्या बाटलीत भरून ठेवावा. का प रा चा अ र्क.— शुद्ध मद्यार्क ८ औंस व कापूर १ औंस एका बंद केलेल्या बाटलींत ठेवावे म्हणजे अर्क तयार होतो. लिं बा चे सा ली चा अ र्क.— ताज्या खट्टया निंबाची पिंवळी साल १॥ पैंट घ्यावी व एक पैंट शुद्ध मद्यार्कांत ७ दिवस भिजत ठेवून टीपकागदांतून गाळून काढावी. हिं गा चा अ र्क.— ५ तोळे उत्तम हिंगाची पूड करून ती २५ तोळे शुद्ध मद्यार्कांत ८ दिवास भिजत ठेवावी म्हणजे हिंगाचा अर्क तयार होतो. वर लिहिल्याप्रमाणें वाटेल त्या वनस्पतींचे फुलाचे किंवा इतर सुगंधी द्रव्याचे शुद्ध मद्यार्काचे साह्यानें अर्क काढतां येतात. [कलावैभव, खानापूर, शार्ङधरादि वैद्यक ग्रंथ. सेनगुप्त-आयुर्वेदिक सिस्टिम ऑफ मेडिसिन अर्कप्रकाश.]