विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्कविवाह —( रु ई शीं ल ग्न ) हा विवाह रुई नांवाच्या पवित्र मानलेल्या झाडाशीं लावतात. या झाडांत सूर्यदेवता निवास करते अशी समजूत आहे. ज्या पुरुषाच्या पहिल्या दोन बायका वारल्या असतील त्यानें तिसरी बायको केल्यास बायको किंवा नवरा कोणीतरी लांगलीच मरतें अशी समजूत आहे. ही आपत्ति टाळण्याकरितां तिसरे लग्न रुईशी, सूर्याच्या कन्येशीं, लावावें व नंतर तिसरा विवाह करावा अशी समजूत आहे. हा रुईबरोबरचा विवाह घरांत लावतात, किंवा रुईच्या झाडाशेजारीं जाऊन लावतात व तो शनवार किंवा रविवारी हस्त नक्षत्र असेल अशा मुहूर्तावर लावतात, किंवा तिसर्या बायकोबरोबर विवाह करण्यापूर्वीं कांहीं दिवस लावतात. रुईचें झाड, पानें, फुलें व फळें यांनी युक्त असावें. सामान्य विवाहाप्रमाणें या रुईबरोबरच्या विवाहांतहि पुण्याहवाचन, नांदी श्राद्ध, मधुपर्क, नंतर कन्यादान वगैरे सर्व विधि करतात. हा काल्पनिक विवाह संपविण्यासाठीं शेवटी शांतिसूक्त म्हणतात व ब्राम्हणांना दक्षिणा व भोजन दिल्यावर समारंभ पुरा होतो. (धर्मसिंधु परिच्छेद ३.)