विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्काट, उत्तर.— मद्रास इलाख्याच्या पूर्वेकडील जिल्हा. उत्तर अक्षांश १२० २०' ते १३०' ५५ व पूर्व रेखांश ७८० १४' ते ७९०'५९ क्षेत्रफळ सुमारें ७३८६ चौ. मैल. मुसुलमानांच्या अमदानींत हा अर्काट सुभ्याचा पालार नदीच्या उत्तरेकडील भाग होता व म्हणून त्याला हें नांव पडलें. हें अर्काट नांव "आरू काडू" (सहा अरण्यें) या तामील शब्दांचा अपभ्रंश होय. ह्या ठिकाणीं पुरातन काळीं सहा अरण्यें असून सहा ॠषी येथें राहत असत अशी समजूत आहे. हा मुलूख पुष्कळसा डोंगराळ आहे. या प्रांतांत पालार व तिला मिळणार्या चेयार आणि पायनी ह्या मुख्य नद्या आहेत. येथें उगवणारी झाडें व वनस्पती यांमध्यें विशेष असें कांहीं नाही. सह्याद्रीवर सापडणारी बहुतेक झाडें येथील डोंगरांत आहेत. शिकारीचीं मोठीं जनावरे म्हणजे गवा व वाघ हीं होत. डोंगराळ मुलुखांत चित्ता हा सर्वत्र आढळतो. आस्वल, तरस, सांबर, भेकर, आणि रानडुकर हीं कांहीं ठिकाणीं सांपडतात. येथील हवा साधारणपणे निरोगी आहे, करण ती फार कोरडी आहे. पावसाचें सरासरी मान वर्षास ३७ इंच आहे परंतु आंतल्या भागांत पाऊस सुमारे ४० इंच पडतो.
इतिहास. — अतिशय प्रुरातन काळापासून इ. स. ९०७ पर्यंत कांजीवरमच्या पाल्लव राज्यांच्या ताब्यांत हा मुलूख होता. पुढें हा प्रांत चोलराजे, राष्ट्रकूट घराण्यांतील राजे व शेवटीं विजयानगरचे हिंदु राजे यांच्या ताब्यांत आला. तालिकोटच्या लढाईनंतर विजापूर व गोवळकोंडा येथील मुसुलमान बादशहांच्या ताब्यांतून तीं राज्यें जाऊन पुढे मोंगल सुभ्यापैकीं हा एक सुभा झाला. पुढें शंभर वर्षें दक्षिणेतील युद्धांची हीं एक रणभूमीच होऊन राहिली. इ. स. १७८१ मध्यें येथील नबाबानें कर्नाटकचा वसूल ईस्ट इंडिया कंपनीस दिल्यापासून हा प्रांत ब्रिटिशांच्या हातांत गेला व इ.स. १८०१ मध्यें याचा पूर्ण ताबा त्यांनां मिळाला. ('कर्नाटकचे नबाब' पहा.)
लो क व स्ती.— येथील एकंदर लोकसंख्या ( १९२१ ) २०,५५,५९४ आहे; ती इ. स. १९११ मध्यें १९,६०,९६० होती व त्यापैकीं १८,०१,३५५ हिंदु, १,१७,९०९ मुसुलमान आणि ३२,८२२ ख्रिश्चन होते. जैनांची संख्या ८,८२६ होती. येथें १५२४५६३ लोक तामिल भाषा बोलणारे व ३२२८५९ तेलगु भाषा बोलणारे व ८४१० मराठी बोलणारे आढळले. तामील लोकांतील विशेष ध्यानांत घेण्यासारख्या जाती म्हणजे पल्ली, परैयन्, वेल्लाळ, इसला, मोडी, पानसावन ह्या होत. तेलगू मुख्य जाती म्हणजे कापु, माल, बलिजा, व कम्मा ह्या होत. २३००० ख्रिस्त्यांपैकी २२१०० एतद्देशीय आहेत. या प्रांतांत मोठमोठालीं मिशन्स आहेत.
शे त की.— येथील जमीन काळी तांबूस आहे. पिकें-भात रागी, कम्बु, ऊंस व आंबा; एके काळीं निळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असे. परंतु सध्यां तसें नाहीं. येथील शेतकीचीं जनावरें मध्यम प्रतीचीं आहेत. कुरूंब जातीची एक मेंढी आहे तिच्यावर लोंकर पुष्कळ निघते. तिचा उपयोग घोंगड्या वगैरे करण्याकडे होतो. लागवडीस येणार्या १३२७ चौ. मैल जमिनींतील ५९९ चौ. मैल जमीन पाटांच्या व विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे. १२९१ चौ. मैलाचें जंगल आहे व इ.स. १९०२-०३ मध्यें त्यापासून रु.५,३३००० उत्पन्न झाले.
ख नि ज.— इमारतीस उपयोगांत येणारा ग्रानाइट दगड सर्वत्र सांपडतो. कांहीं कांहीं ठिकाणी अभ्रक मिळतो. कालहस्ती जमिनदारी (पहा) मध्यें तांब्याच्या खाणी आहेत. कनगुंडी जमीनदारीमध्यें सोन्याच्या खाणी आहेत.
व्या पा र व द ळ ण व ळ ण.— शेतकीच्या खालोखाल कापड विणण्याचा धंदा चालतो. पण तयार होणारें कापड हलक्या दर्जाचे असते. वेलोर (पहा) जेलमध्यें गालिचे चांगले होतात पण हा धंदा बाहेर फारसा नाहीं. यूरोपियन तर्हेचीं हिरव्या रंगाचीं मातीचीं भांडी गुडियाट्टम् तालुक्यामध्यें करिगिरी येथें एका घरी होतात. कालहस्ती येथें बांगड्या तयार होतात, व पुष्कळ ठिकाणीं कातडीं कमावण्याचे कारखाने आहेत.
येथून बाहेर जाणारा माल म्हणजे भात, कातडीं, शिंगे, एक प्रकारची साखर, हळद व दगड; व आयात माल :- सूत, मीठ, मिरच्या, तमाखू आणि अशुद्ध लोखंड व पितळ. ने-आण करण्याच्या सोयी म्हणजे सदर्न मराठा रेल्वे व साऊथ इंडियन रेलवे व १४८३ मैल लांबीच्या सडका या आहेत.
रा ज्य व्य व स्था.— राज्यव्यवस्थेकरितां याचे चार भाग केले आहेत. वेलोर, राणीपेठ, आरणी (पहा) व चितूर. पहिले दोन कलेक्टरच्या व दुसरे दोन डेप्युटी कलेक्टरच्या देखरेखी खालीं आहेत. ६ मुनसफ कोर्टे आहेत.
कर्नाटकच्या नबाबांपूर्वीं येथे जमिनधार्याची पद्धत काय होती हे सांगतां येत नाहीं. इ. स. १८२२ त रयतवारी पद्धत सुरू करण्यांत आली. कोरडवाहू जमीनीवर दर एकरा मागें सरकारसारा रु. १-४-२ व पाण्याच्या जमीनीवर रु. ४-१५-२ आहे.
या प्रांतांत शिक्षणाचा प्रसार फार कमी आहे. शेंकडा ६ लोक फक्त वाचूं व लिहूं शकतात. तेलगू लोकांपेक्षां तामील लोक जास्त शिकलेले आहेत.