विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्काट शहर — मद्रास इलाख्यांतील वालाजापेट तालुक्याचे मुख्य ठिकाण. हें राणीपेठ स्टेशनपासून दोन मैलांवर पालार नदीवर आहे. मद्रास रेल्वेच्या राणीपेठ शाखेवर हें स्टेशन आहे. पाऊस सरासरी ५० इंच पडतो. लोकसंख्या ११४५०. याचें महत्व फक्त इतिहासदृष्ट्या आहे. हें पूर्वीं कर्नाटकच्या नबाबांचें राजधानीचें शहर होतें. त्यावेळीं या शहराभोवतीं ५ मैल लांब व २४ ते १२ फूट रुंदीचा तट होता. या ठिकाणीं नबाब सादतउल्लाखानची कबर आहे. गांवात २०-२५ चांगल्या मशिदी आहेत. पूर्वींच्या किल्ल्याचा व राजवाड्याचा सध्यां कांहीं एक मागमूस राहिलेले नाहीं. चांदीचीं भांडीं, सोन्याचांदीची जर, हातमाग, कापड छपाई, आणि पितळकाम यासारखे मुख्य धंदे येथें चालतात.
इ ति हा स.— इ. स. १७१२ त मोंगल सेनापति सादतउल्लाखान यानें म्हैसूरच्या मोहिमेवर असतांना अर्काट येथें आपला मुख्य तळ ठेविला होता. त्यानेंच प्रथम कर्नाटकची नबाबी, वंशपरंपरेनें आपणाकडे घेतली. पुढें वीस वर्षेंपर्यंत हें राजधानीचें ठिकाण होऊन राहिलें. पण १७४० मध्यें रघोजी भोसल्यानें हा प्रांत जिंकला व सादतउलजखानाच्या मागून आलेला नबाब दोस्तअल्ली लढाईंत मारला गेला. पुढें कांहीं वर्षें अर्काट हें अनेकांच्या हातांतून गेलें. स. १७५१ सालीं एका इंग्लिश तुकडीनें येथील किल्ला सर केला. त्याच वर्षीं क्लाईव्हनें थोड्या सैन्यानिशीं अर्काट जिंकले ही गोष्ट हिंदुस्थानांतल्या ब्रिटीश अमदानींतल्या इतिहासांत चिरस्मरणीय होऊन राहिली आहे. १७५८ त अर्काट फ्रेंचाकडे गेलें व तें १७६० मध्यें इंग्रजांनीं परत घेतलें. पुढें २० वर्षें इंग्रजांचा दोस्त नबाब महंमद याच्या ताब्यांत तें होतें. पुढें म्हैसूर-युद्ध सुरू होऊन १७८०-८२ पर्यंत अर्काट हैदरकडे होतें. टिपूनें या शहराचा तट पाडून तें सोडून दिलें. १८०१ मध्यें कर्नाटक इंग्रजांनीं खालसा केलें तेव्हां अर्काटहि त्यांच्याकडे गेलें.