विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्काट दक्षिण — मद्रास इलाख्यातील आग्नेयेकडील जिल्हा. उ. अ. ११० ११' ते १२० ३५' व पू.रे. ७८० ३८' ते ८०० क्षेत्रफळ ५२१७ चौ. मैल. अर्काट शब्दाची उपपत्ति मागें उत्तर अर्काटमध्यें आलेलीच आहे. याच्या पूर्वेस बंगालचा उपसागर, दक्षिणेस तंजावर आणि त्रिचनापल्ली, पश्चिमेस सालेम व उत्तरेस उत्तर अर्काट व चिंगलपट्ट ह्या सीमा आहेत. या प्रांतांत कलरायन व जवादि या डोंगरांच्या रांगा मुख्य आहेत.
येथील सर्व नद्या पूर्ववाहिनी आहेत, पोनैयार ही सर्वांत मोठी आहे. जिंजी, गडिलम, व वेल्लार या दुसर्या नद्या आहेत. या प्रांतांत चंदनाचीं झाडें पुष्कळ आहे. डोंगराळ प्रदेशांत चित्ता, अस्वल, सांबर, भेकर, रानडुक्कर सांपडतात. तसेंच ससे, पाणकोंबडी वगैरे पक्षी पुष्कळ आहेत. येथील समुद्रामध्यें पुष्कळ जातीचे मासे सांपडतात.
ह वा मा न.— हवा बरीच कोरडी असून आरोग्यकारक आहे. तरी पण कांहीं भागांत मलेरीया; तसेंच समुद्र किनार्यावर "एलेफंटायसिस" हे रोग बरच आहेत. आंतल्या भागापेक्षां समुद्र किनार्यावर उष्णतामान कमी असतें. तेथें पाऊस सरासरी ५२ इंच पडतो. आपण जसजसें आंतल्या प्रदेशांत जावें तसतसें पावसाचें मान कमी कमी होत जातें. मध्यभागांत ते ४५ इंच असतें तर अगदीं आंत ३९ इंच आढळतें.
इ ति हा स.— उत्तर अर्काटच्या इतिहासाहून हा फारसा भिन्न नाहीं. हा प्रदेश चोल राजांचा असून पुढें तो कांची येथील पल्लव राजांच्या ताब्यात गेला. नंतर इ.स. १४ व्या शतकाच्या अखेरीस तो विजयनगराच्या राज्यांत सामील केला गेला. तालिकोटच्या लढाईनंतर तो विजापूरकरांच्या हातांत जाऊन शिवाजी राजे यांनीं तो त्यापासून जिंकून घेतला. राजारामाच्या कारकीर्दींत मोंगलाच्या ताब्यांत गेला. इंग्लिशांचा या प्रांताशीं संबंध इ. स. १६७४ मध्यें आला. इ. स. १६८३ मध्यें कडलोर येथें त्यांनीं मराठ्यांच्या पासून सध्यांचा फोर्ट सेन्ट डेव्हिड व सभोंवतालचा प्रांत विकत घेतला. कर्नाटक व म्हैसूर युद्धांत याचा संबंध बराच आहे.
या प्रांतांत पुरातन काळच्या गुहा पुष्कळ आढळून येतात. राजारामाच्या कारकीर्दींत मराठी सैन्याचीं सूत्रें जेथून हलविलीं जात तो जिंजीचा प्रसिद्ध किल्ला याच प्रांतांत आहे.
लो क.— दक्षिण अर्काटमध्यें २७४५ गावें व १० शहरें आहेत. याचे आठ तालुके पाडलेले आहेत. इ. स. १९२१ मध्यें येथील लोकसंख्या २३,२०,०८५ होती. कडलूर, चिदंबर तिरुवन्नामले हीं मुख्य शहरें आहेत. तेथें शेकडा ९४ लोक हिंदु असून बाकीचे मुसलमान व ख्रिश्चन आहेत. यांत जैनांची संख्या सुमारें पांच हजार आहे. येथील लोक तामिळ भाषा बोलतात. या प्रांतांत तेलगू जातींचा भरणा बराच आहे पण तामिली लोकांचे संख्याधिक्य आहे. यापैकीं पल्ली आणि पराया जातीचे लोक हा तिकडील शेतकरी वर्ग आहे.
ज मी न व पि के.- येथील दोन तृतयांश जमीन तांबडी असून बाकीची कापसाला योग्य अशी काळी आहे. ५२१० चौ. मैल जमीन रयतेच्या ताब्यांत असून ३४९ चौ. मैल जमीनदाराची इनाम आहे. कंबु, वरगु, रागी हीं येथील मुख्य पिकें आहेत. भाजीपाला व फळफळावळ याची लागवड कडलूर, तिंडीवनं, विलुपुरं व चिदंबरं या तालुक्यांत पुष्कळ होते. उद्योगधंद्याच्या दृष्टीनें भुइमूग हें फार महत्त्वाचें पीक आहे. येथें पाटबंधारे पुष्कळ आहेत. त्यांतील पुष्कळ फार प्राचीन काळापासूनचे आहेत. चोड राजे पाणी पुरवठ्यासंबंधानें फार दक्ष होते. इ. स. १९०३-४ सालीं रयतवारी इनाम जमिनीपैकीं शेकडा ३२ चौ. मैलाला पाणी पुरविण्यांत आले. तेथें ८७ बंधारे २०५ कालवे व ३२४३ तळी आहेत.
धं दे व व्या पा र.— या भागांत धातूंच्या खाणी म्हणण्यासारख्या मुळीच नाहींत. कांहीं भागांत लोखंड सांपडतें. तसेंच विशेष सांगण्यासारखे जिन्नसहि तयार होत नाहींत फक्त नेलिकंप येथें साखरेचे कारखाने एका इंग्लिश कंपनीनें चालविलेले आहेत. येथे पूर्वीं नीळ पुष्कळ तयार होत असे. पण सध्यां व्यापारी चढाओढीनें तो धंदा अगदी बसला आहे. खेडेगावांतून मागावर सुती व लोकरी कापड विणले जातें.
या प्रांतांत कडालूर व पोर्टानोव्हो हीं दोन बंदरें आहेत. भुइमूग, पेंड, कातडीं, भात, हळद, तंबाकू चिरुट वगैरे माल बाहेर देशीं जातो. येथील भुइमूग फ्रान्स देशांत जवळ ६० लाख रूपयांचा जातो. आंतल्या देशांत वाहतुकीचें साधन "साउथ इंडियन रेलवे" आहे. तसेंच सडका वगैरे पुष्कळ असून चांगल्या आहेत. दर आठवड्यास ब्रिटीश नॅव्हिगेशन कंपनीची आगबोट कुडालोर बंदरांत येते.
रा ज्य व्य व स्था.— राज्यव्यवस्थेच्या सोईकरितां याचे चार भाग केले असून ते कलेक्टराच्या ताब्यांत असतात. त्याच्या हाताखालीं डेप्युटि कलेक्टर्स व प्रत्येक तालुक्याला एकेक मामलेदार असतो तसेंच प्रत्येक तालुक्याच्या मुख्य ठिकाणीं मुनसफ कोर्ट आहे व प्रांताला एक सेशन्स कोर्ट व अपील कोर्ट आहे. मोठे गुन्हे फार थोडे घडतात. खून वगैरे तर क्वचित् होतात.
हिंदु राजे तसेंच मुसुलमान राजे यांच्यां वेळीं जमीनधार्याची काय पद्धत होती हें फारसें सांपडत नाहीं. पण नबाब महंमदअल्लीचा कारभारी रायजी यानें जमिनीची मोजणी करून धारा ठरविला. त्याच्यावेळीं बागा विहिरी असलेल्या जमीनीचा धारा पैशाच्या रूपानें व बाकीचा पिकाच्या रूपानें द्यावा लागत असे. त्यावेळीं वसुली जमा मक्त्यानें देण्यांत येत असे, व ही पद्धत इ. स. १८०१ पर्यंत ब्रिटीश अमदानींत सुद्धां चांलू होती. ती इ. स. १८०६ मध्यें दुसरी मोजणी झाल्यावर बंद करण्यांत आली. इ. स. १९०३ मध्यें जमीनीचा वसूल ४९,५७,००० रूपये होता.