विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्गास — हें ग्रीसमधील फार प्राचीन आणि महत्त्वाचें शहर आहे. इजिप्त, लिसिया वगैरे परदेशांशीं अर्गासचें फार जुन्या काळापासून दळणवळण असे. अर्गालिसचा द्वीपकल्प, सीथेरा, एजीना, सीसीऑन वगैरे प्रदेशावर अर्गासचा अंमल होता. फीडॉन राजाचे अमदानींत तर सबंध पूर्व पेलॉपोनेसस अर्गासचे ताब्यांत आला.
इ. स. पूर्वीं आठव्या शतकाच्या सुमारास मात्र अर्गासला फार वाईट ग्रह आले. कारण अर्गासचें अप्रतिहत स्वामित्वावर घाला घालण्यास स्पार्टा शहर चंग बांधून उभें राहिलें. शिवाय लासिडेमोनिआ येथील लोक तर अर्गासचे कट्टे शत्रु होते. त्यांच्याशीं झालेल्या लढाईंत अर्गासला हार खावी लागून सबंध सिन्युरीआ प्रांत गमावून बसावें लागलें आणि इ. स. पूर्वीं ४९५ त टिरीन्सच्या पराभवानें तर अर्गासच्या प्रभुत्वाचा बोजवारा उडाला. इ. स. पूर्वीं सुमारें ४७० व्या वर्षीं अर्गास आणि स्पार्टा यांच्यांत फिरून वैर जुंपलें व ४६१ त अर्गासनें अथेन्सशीं संधि करून स्पार्टाला शह दिला व वैराग्नी तात्पुरता विझविला. अथेन्सच्या मध्यस्थीच्या असा एक महत्त्वाचा परिणाम झाला की, अल्पजनसत्तेला 'खो' मिळून लोकसत्ता प्रस्थापिली गेली व ती सुमारें चाळीस वर्षेंपर्यंत अव्याहतपणें टिकली.
स्पार्टाला हाणून पाडण्याकरितां जो 'कॉरिंथिअन संघ' स्थापण्यांत आला, त्यांत अर्गास शहरानें प्रमुख भाग घेऊन कॉरिंथ हें शहर आपल्या राज्यास जोडलें. गेलेलें स्वामित्व पुन्हां मिळविण्याकरितां सत्तालोभी सरदारांनीं केलेले बंड अर्गास येथील लोकसभेनें मोडून बंडवाल्यांपैकीं १२०० लोकांनां फांशीं दिलें असें सांगतात. स्पार्टन शत्रूंचा समूळ मोड करणें अशक्य झाल्यामुळें, अर्गासच्या लोकसभेनें मॅसिडोनच्या फिलिपची मदत मागितली व सिन्युरीआ प्रांत शत्रूपासून परत मिळविला. कोणत्याहि एका राष्ट्राला दुसर्याहून वरचढ होऊं देण्याची संधी देऊं नये, हें तत्त्व इतिहासांत परोपरी दृष्टीस पडतें. मॅसोडोनचा फिलीफ सर्व ग्रीस देश हाताखालीं घालून बसला हें पाहून फिलीपनें केलेल्या उपकाराला विसरून अर्गासनें कांहीं स्वाभिमानी राष्ट्रांशीं संगनमत करून फिलीपशी युद्ध पुकारलें. येवढेंच नव्हे तर प्रत्यक्ष आपले हाडवैरी जे स्पार्टन लोक त्यांच्याशीं सहकारिता करून एपिरसचा, राजा पिर्हस याच्यावर स्वारी केली. याचा परिणाम असा झाला की अर्गासचें स्वातंत्र्य जाऊन मॅसिडोनिआच्या अँन्टीगोनस गोनाटसच्या जुलुमाला अर्गासला मुकाट्यानें नमावें लागलें.
यानंतर अर्गास हें रोमन साम्राज्याखालीं गेलें. इ. स. २६७ आणि ३९५ त गॉथ लोकांनीं हें शहर लुटलें. इ. स. १२४६ त पुन्हां अथेन्सच्या ताब्यांत गेलें. इ. स. १३९७ आणि १५०० या सालीं तुर्कांनीं सबंध लोकांची कत्तल केल्यामुळें, अलबेनिआ येथील लोकांनीं येथें येऊन वस्ती केली. १८२५ त, इब्राहीम पाशानें या शहराची जाळून होळी केली. सांप्रत अर्गास शहरांत १०,००० लोकवस्ती असून सर्व शेतकरी लोकांची आहे.
फार प्राचीन काळीं अर्गास येथील लोकांची गायन कलेबद्दल फार ख्याती होती. या ठिकाणीं हेरॅक्युम या नांवाचें अतिशय विख्यात व सुंदर देवालय आहे. दंतकथेप्रमाणें हें देवालय फोरोनिअस यानें बांधलें व असें सांगतात की ट्रोजन हा युद्धास निघण्यापूर्वीं अगामेमनॉन् यानें याच देवालयांत सर्व पुढार्यांनां जमविलें होते (ए. ब्रि.).