विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्जुनसादडा — या वृक्षास संस्कृतमध्यें अर्जुन हें नांव आहे. ऐनच्या झाडाप्रमाणें हेंहि झाड अरण्यांत सांपडतें. मराठींत यास सादडा असेंहि म्हणतात. पानें सुमारें ५ अंगुळें रुंद असून वीतभर लांब असतात. त्यास पांढरा सफेत डीक येतो. या झाडाची साल पांढुरकी असते. वाळल्यावरहि ह्या सालीचा रंग पांढराच राहतो. फुलेंहि पांढर्या रंगाचींच येतात. मध्य हिंदुस्थानांत आणि उत्तरेस अयोध्ये पर्यंत त्याचप्रमाणें ब्रह्मदेश व सिलोन मध्यें नद्यांच्या व प्रवाहाच्या काठीं हें झाड आढळतें. पंजाबांत हीं मुद्दाम लावलेलीं असतात. याचा पांढरा स्वच्छ डिंक उत्तर हिंदुस्थानांत औषधी म्हणून विकला जातो. याची साल तुरट असते. तिचा रंग देण्याकरितां कातडें कमावण्याकरितां, व औषधीकरितांहि उपयोग करतात. हें लांकूड काम करण्यास जड असतें; परंतु खटारगाड्या, शेतीचीं अवजारें, घर बांधणें, वगैरे कामाला उपयोगी पडतें. या लांकडाच्या राखेंत चुन्याचें प्रमाण बरेंच असतें. याच्या अंतरसालीचा उपयोग औषधाचे कामीं होतो. बिब्बा अंगावर उतल्यास अर्जुनसादडाची साल व पानें कुटून बिबा उतल्याजागीं लेप करावा. व्रण भरून येण्यास सादड्याच्या सालीच्या काढ्यानें व्रण धुवावा. म्हणजे तो लौकर भरून त्यांत कृमि वगैरे होत नाहींत. किंवा या झाडाच्या सालीचें चूर्ण व्रणांत भरावें म्हणजे साधे व्रण किंवा अग्निदग्धव्रण लौकर भरून येतात. याखेरीज पुष्कळ विकारावर हें झाड उपयोगी पडतें. (पदे-वनौ. वॉट.)