विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्जेंटिना — उर्फ अर्जेंटाइन रिपब्लिक, हें ब्रेझिलच्या खालोखाल महत्त्वाचे स्पानिश भाषा बोलणारे, लोकसत्ताक राष्ट्र आहे. या देशानें दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण भागाचा बराच भाग व्यापला आहे. त्याचा आकार पाचरीसारखा असून दक्षिण अक्षांश २१०-५५' ते ५५० - २'- ३०" व ५३० ते ७३० - १७'- ०" या रेखांशांत पसरला आहे. याची उत्तरदक्षिण लांबी २२८५ मैल व पूर्वपश्चिम रुंदी ९३० मैल आहे. याचें क्षेत्रफळ १०,८३,५९६ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस बोलिव्हिया व पाराग्वे, पूर्वेस पाराग्वे, ब्राझील, युराग्वे व अटलांटिक, पश्चिमेस चिली व दक्षिणेस अटलांटिक व चिली आहेत.
स र ह द्दी — अर्जेंटिनाची शेजारच्या राज्यांशीं सरहद्दीसंबंधी निरनिराळ्या वेळीं भांडणें झालीं.
सा मा न्य व र्ण न. — अर्जेंटिनाचे तीन मोठे भाग पडतात. या रिपब्लिकच्या सबंध लांबीवर पसरलेले पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश व पठारे; मिल्को मायोपासून रिओ नीग्रो पर्यंतचीं पूर्वेकडील मोठीं मैदानें; आणि पॅटॅगोनियाचीं ओसाड व रुक्ष माळरानें. डोंगराळ प्रदेशांतून विशेषतः ज्वालामुखी भागांतून सोनें, रुपें, कथील आणि तांबें यांचे दगड सांपडतात. पाऊस व उष्णमान यांचें प्रमाण उत्तर गोलार्धावरील याच अक्षांशांतल्यापेक्षां निराळें असतें; उदाहरणार्थ, दक्षिण पॅटॅगोनिया व टिएरोडल फ्वेएगो यांचे अक्षांश लाब्राडोर इतकेच आहेत. तथापि हे दोन प्रांत विषुववृत्तीय प्रवाहामुळें बनलेलें वस्तीला योग्य असे दक्षिण आहेत. तथापि पश्चिम यूरोपांतल्या याच अक्षांशांतील प्रदेशांपेक्षां येथें थंडी अधिक असते. पॅटॅगोनियाचा समुद्रकिनारा व डोंगरी भाग उष्ण व उत्तम हवेचे आहेत. विशेषतः अर्जेंटिनामधील उत्तरेकडची कॅटॅमार्कासारखीं उंच पठारें आरोग्यस्थानें म्हणून प्रसिद्ध आहेत.
यूरोपियन संस्कृतीच्या प्रवेशापासून अर्जेंटिनामध्यें नवीन वृक्षवनस्पती शिरल्या. त्यांपैकीं गहूं, बारली, ओट, व द्राक्षें, सफरचंद, वगैरे फळें होत. आस्ट्रेलियन युक्यालिपटस झाड येथें उगवूं लागलें आहे व यूरोपांतील खाण्याच्या धान्यांपासून देशास सांपत्तिकदृष्ट्या मोठा फायदा होत आहे.
टापिर व ग्वानाको हे प्राणी मूळचे होत. घोडे, गाढव, गुरें, शेळ्यामेंढ्या व डुकरें ही यूरोपियनांबरोबर आलेलीं जनावरें होत. उत्तर व ईशान्य या बाजूंस बरेच प्राणी आहेत. प्यूमा नांवाचा सिंह, जगॅर नांवाचा वाघ व रानटी मांजराच्या एक दोन जाती या प्रदेशांतून पुष्कळशा आढळतात.
न द्या व स रो व रे — पाराग्वे, पाराना व युरग्वे या मोठ्या नद्या आहेत. पिम्कोमायो, बर्मेजो, सॅलॅडो, डेल नॉर्टे, कॅरकेरानाल या लाप्लाटा प्रणालींतीलच्या नद्या आहेत. प्रिमेरो, सेगुंडो, क्विंटो, लुजान या लहान नद्या आहेत. कोरिंटिज, फेलिसिआनो, ग्वालेग्वे, अॅगुआपे, मिरिने या नद्या पाराना व युरुग्वे या नद्यांनां मिळतात. सॅलॅडो डेल सूड ही खार्या पाण्याची नदी आहे. कोलोरॅडो व नीग्रो या मोठ्या व नाव्य नद्या आहेत. या देशांत असंख्य सरोवरें आहेत; परंतु यांपैकीं बरींच उथळ, लहान व खारट आहेत. बेबेडेरोव, पोरोंगोस हीं उथळ व खार्या पाण्याचीं सरोवरें आहेत. मार चिक्विटा हें मोठें खारें सरोवर आहे.
बं द रें — अर्जेंटिनाचा समुद्रकिनारा लांब असून चांगलीं बंदरें फार थोडीं आहेत. मोठीं बंदरें ब्यूनॉस एरीझ व एन्सेनाडा हीं आहेत. उत्तम नैसर्गिक बंदर बॉहिया ब्लँका हें आहे. बॉहिया ब्लँकाच्या दक्षिणेस १०० मैलांवर सॅन ब्लासचा उपसागर आहे व ४२ व ४३ अक्षांशांत सॅन जोसे व न्युव्या हे उपसागर आहेत. प्युर्टो डेसीडो, सँटाक्रुझ, उशुआ, टेराडेल फ्वगो हीं लहान बंदरें आहेत. नदीवरील बंदरें कॉन्कॉर्डिया युरुग्वे नदीवर, सॅन निकोलस व कॅम्पाना पाराना नदीवर, सँटा फे सॅलॅडो नदीवर व ग्वालेग्वे याच नांवाच्या नदीवर आहेत.
लो क सं ख्या.— या देशाची १९२० ची लोकसंख्या ८,५३,३४३ होती. लोक स्पॅनिश भाषा कोर्डोबाचें विश्वविद्यालय जरी फार जुनें आहे तरी अर्जेन्टिनाच्या वाङ्मयांत मुळींच भर पडली नाहीं. ग्रेगोरिओ फ्युन्स (१७४९-१८३७) यानें ऐतिहासिक ग्रंथ लिहिले. प्रेसिडेंट सॅर्मिन्टोनें शास्त्रीय शिक्षण कोर्डोबाच्या विश्वविद्यालयांत सुरू केलें. वाङ्मयांत हा देश अजून मागासलेला आहे. ब्युनॉस एरीझ येथें कांहीं उत्कृष्ट दैनिकें प्रसिद्ध होतात.
रा ज की य वि भा ग व श ह रें.— या देशाचे राजकीय विभाग म्हटले म्हणजे एक फेडरल डिस्ट्रिक्ट, चौदा प्रांत व दहा परगणे होत. राजधानी ब्युनॉस एरीझ (१६६८०७२) असून इतर प्रसिद्ध शहरें रोझॅरिओ, ला प्लाटा, टुकुमॅन, कोर्डोबा, सँटाफे, मेंडोझा, पाराना, साल्टा, कॉरिन्टेस, चिव्हिलकॉय, ग्वालेग्वेचू, सॅन निकोलस, कॉन्कॉर्डिया, सॅनज्वान, रिओक्वार्टो, सॅनलुइ, बॅरॅकॅस, अलसुड हीं आहेत व त्यांची १९२० ची लोकसंख्या प्रत्येकी सव्वादोन लाख ते अठ्ठावीस हजार यांच्या दरम्यान आहे.
द ळ ण व ळ णा चे मा र्ग.— अर्जेंटिनामधील रेल्वे १८५७ साली सुरू झाली व १९०६ मध्यें १२२७४ मैल रेल्वे झाली.
शे त की व ख नि ज द्र व्यें.— १९१०-११ मध्यें ५,०३,३०,०९६ एकर जमीन लागवडाखालीं होती. १९१७-१८ मध्यें ६,१२,१८,६१३ एकर जमीन लागवडींत आली. येथील मुख्य पिकें गहूं, मका, ओट, जवस, बार्ली, द्राक्षें, कापूस, तमाकू, ऊंस, बटाटे वगैरे आहेत. कापसाची लागवड फार झपाट्यानें अलीकडे वाढली. १८९५ मध्यें ८७९ एकर, १९१४ मध्यें ३३०० एकर आणि १९१७-१८ मध्यें ११७७५, एकर जमीन लागवडीखालीं होती. सरकारनें या कामीं पुष्कळ पैसा खर्चिला व युनैटेड स्टेटस् मध्यें विद्यार्थी पाठवून या कामी तज्ज्ञ बनवून आणले आहेत. १९२० मध्यें जवस व मका यांची आर्जेंटिना मधून निर्गत जगांतील कोणत्याहि देशापेक्षां अधिक झाली. गव्हाच्या निर्गतींत या देशाचा तिसरा नंबर लागतो. युनैटेड स्टेट्स व कानडा हे पहिले दोन नंबर होत. कृषिशास्त्राचें शिक्षण देण्याच्या सोयीहि १९१०-२० या काळांत पुष्कळ वाढल्या आहेत. सर्व महत्त्वाच्या शहरांत ट्राम्वे आहेत. १८९५ च्या खानेसुमारीवरून एकंदर ४९६ मैल ट्राम्वे होती. ब्युनॉस एरीझ मधील ट्राम्वे विजेनें चालवितात. १९२० सालीं रेल्वे रस्ता २१९१५ मैलांचा होता. १९०६ मध्यें ३४०८० मैल तारायंत्र होतें, यूरोप व संयुक्त संस्थानें यांशीं दळणवळण सुरू आहे. टपाल व तारखातें राष्ट्रीय सरकारच्या ताब्यांत आहे. जरी अर्जेंटिनाचा समुद्र किनारा विस्तृत आहे तरी या देशाच्या जहाजांची संख्या कमी आहे.
शे त की.— डरहॅम, हिअरफोर्ड वगैरे ठिकाणचीं जनावरें या देशांत आणून वाढविलीं गेलीं व त्यांचें मांस देशाच्या उपयोगास पुरून बाकीचे बाहेर देशीं रवाना करण्यात येत असे. येथें गहूं, इंडियनकॉर्न, साखर, तंबाकू, ऑलिव्ह, एरंडेल, पीनट, कॅनरीसीड, जव, राय, फळें व भाज्या उत्पन्न होतात.
व्या पा र.— येथून मांस, मटन, कातडीं, लोंकर, गहूं व इंडियन कॉर्न बाहेर देशी रवाना होतात; व खाण्याचे पदार्थ, दारू, कापड, कच्चामाल, लाकूड, व त्याचे पदार्थ, लोखंड, व त्याचे जिन्नस, कागद व पुठ्ठे, कांच व मातीचीं भांडीं बाहेर देशाहून येतात. १९१८ सालीं आयात ९,९३,२५,९४३ पौंड व निर्यात १५,९०,२१,१२० पौंड होती.
रा ज्य व्य व स्था.— सध्यांची राज्यव्यवस्था १८६० सप्टेंबर २५ पासूनची आहे. कायदे करण्याची सत्ता दोन सभांच्या ताब्यांत असते. सीनेट ३० मेंबरांची असते. हे मेंबर नऊ वर्षाकरितां निवडलेले असतात व डेप्युटी लोकांच्या चेंबरमध्यें १२० मेंबर असतात. यांची निवडणूक चार वर्षांपुरती असते. सर्व कार्यकारी सत्ता प्रेसिडेंटच्या हातीं असते, प्रेसिडेंट अर्जेन्टिनाचा मूळ रहिवाशी असून रोमन कॅथॉलिक पंथाचा व तीस वर्षांहून कमी वयाचा नसला पाहिजे. त्याचें सालीना उत्पन्न निदान २००० असलें पाहिजे. प्रेसिडेंटची निवडणूक सहा वर्षांची असते. कॅबिनेट मध्यें निरनिराळ्या खात्यांचे मुख्य असे आठ मंत्री असतात यांची नेमणूक प्रेसिडेंट करतो.
न्या य.— पांच वरिष्ठ न्यायाधिशांचें वरिष्ठ फेडरल कोर्ट, अटर्नी जनरल, चार अपीलकोर्टें व कित्येक कनिष्ठ व स्थानिक कोर्टें देतात.
सै न्य.— वीस व अठ्ठाचीस वर्षांच्या दरम्यान प्रत्येक इसमास लष्करी नोकरी करणें सक्तीचें आहे. सैन्याचे (१) लाईन-यांत २०-२८ वर्षें वयाच्या नागरिकांस नोकरी करावी लागते, (२) नॅशनल गार्ड-यांत २८ ते ४० वर्षें वयांचे असतात (३) टेरिटोरियल-यांत ४० ते ४५ वर्षें वयाचे लोक असतात; हे तीन प्रकार आहेत. सॅन मार्टिन येथे लष्करी शाळा व राजधानींत ट्रेनिंग स्कूल आहे. १९२० साली सैन्यांत १७५१ आधिकारी व १८००० सैनिक होते; शिवाय रिझर्व सैन्य ३०००० होतें. १९१४ पर्यंत लष्करांत जर्मनीचें वजन विशेष असे. त्यानंतर तें कमी होऊन, ब्रिटिश, फ्रेंच, व अमेरिका यांचे अनुकरण सुरू झालें.
आ र मा र.— एकंदर ३२० आफीसर व ५००० ते ६००० शिपाई आहेत. ही नोकरी सार्वजनिक नाहीं. नॅशनल गार्डमधून दोन वर्षांकरितां लोक घेतात. शिवाय ४५० इसमांचें एक तोफखान्याचें पलटण आहे. ब्युनॉस एरीझ बंदराच्या उत्तरभागीं आरमारी तोफखाना आहे. बँदिया ब्लँका हें लष्करी बंदर आहे. ला प्लाटा येथें गोदी व टार्पेडोंचा तोफखाना आहे. झारेट येथें तोफखान्याचा डेपो व मार्टिन गार्सिया व टायग्रे या बेटांवर आरमारी डेपो आहेत. आरमारांत दोन ड्रेडनॉट, दोन प्रो-ड्रेडनॉट, चार चिलखतीं क्रुझरें, एक जुनें लाईट क्रुझर व सात डिस्ट्रॉयर्स इतकीं जहाजें १९२० सालीं होतीं. ड्रेडनॉटची गति २२०५ नॉटस आहें. आरमारांत ३१६ एक्झिक्युटिव्ह, ९७ इंजिनियर, २३ एलेक्ट्रिकल इंजिनियर व ५००० ते ६००० लढाऊ लोक होते.
शि क्ष ण-प्रा थ मि क.— प्राथमिक शिक्षण मोफत व ६ ते १४ वर्षें वयाच्या मुलांकरिता सक्तीचें आहे. दुय्यम प्रतीचें शिक्षण मोफत आहे परंतु तें सक्तीचें नाही. या शिक्षणाकरितां सरकारनें ३७ विद्यालयें स्थापन केलीं आहेत. शिवाय ३३ खाजगी कॉलेजें आहेत. शिक्षक तयार करण्याकरितां ७८ नॉर्मल स्कूलस आहेत. उच्च प्रकारच्या व धंदे शिक्षणाकरितां ५ विश्वविद्यालयें आहेत. धंदेशिक्षणाच्या शाळा आहेत. दोन वेधशाळा व पदार्थसंग्रहालयें, तसेंच हवामान अंदाजण्याचें गृह हीं आहेत. एकंदर अर्जेंटिनामधील ५२० वर्तमानपत्रांपैकी ४९३ स्पॅनिश भाषेंत, १४ इटालियन, ५ जर्मन व ५ इंग्रजी भाषेंतील आहेत.
ध र्म.— सरकार रोमन कॅथोलिक पंथ राष्ट्रीय धर्म समजतें पण इतर धर्मांस परवानगी आहे.
ज मा बं दी — जकात व अबकारी या उत्पन्नाच्या मुख्य बाबी आहेत; व राष्ट्रीय कर्जाची फेड ही खर्चाची मुख्य बाब आहे. कागदी नाणें हा अंतरराष्टीय कर्जांचा मुख्य भाग आहे व यामुळें देशाला फार त्रास झाला आहे. आर्जेंटिना सरकारचें उत्पन्न १९२० सालीं ३,९२,५५,७६४ पौंड व खर्च ३,९२,४५,७०६ पौंड होता. या सालच्या बजेटांत ३० लाख पौंड सैन्याकडे व २०,०४,६११ पौंड आरमाराकडे खर्च धरला होता.
इ ति हा स.– अर्जेंटिनामध्यें प्रथम जॉन डिआझ डिसोलिस याच्या आधिपत्याखालीं १५१६ मध्यें स्पॅनिशलोक आले. नंतर १५२० मध्यें पोर्तुगीज खलाशी फर्डिनँड मॅगेलन आला. परंतु तो वसाहत न करतां परत गेला. नंतर स्पेन सरकारनें सेबॅस्टिअन केबट यास पाठविलें. तो १५२७ मध्यें प्लेट नदीला पोहोंचला व कार्यारानाल नदीच्या मुखावर त्यानें एक वसाहत स्थापली. दोन वर्षांनंतर तो परत आला. १५३५ मध्यें मेंडोझा प्लेटनदींत शिरला व येथें त्यानें सँटा मॅरिया डि ब्युनॉस एरीझ ही वसाहत स्थापली व पारानावर कॉर्पस ख्रिस्ती नांवाचा किल्ला बांधला. हा १५३७ मध्यें परत आला. याच लोकांपैकीं इराला त्याचे सोबती यानीं १५३६ मध्यें पहिली कायमची स्पॅनिश वसाहत स्थापली इलाच पुढें असन्शन नांव मिळालें. यानंतर चाळीस वर्षांनीं जॉन गॅरे आला व यानें ब्युनॉस एरीझच्या जागीं शहर वसविलें. १५६५ मध्यें टुकुमान व १५७३ मध्यें कोर्डोबा ही शहरे वसविण्यांत आली.
सतराव्या शतकाच्या सुरुवातीस बरेच साहसी प्रयत्न करून स्पॅनिश लोकांची प्लेट नदीवर वसाहत झाली.
यापुढें या वसाहतीची उत्तरोत्तर भरभराट होत गेली. कांहीं वर्षांनीं स्पेन देशांतून या वसाहतीवर एका गव्हर्नराची नेमणूक होऊं लागली. परंतु स्पेनचें एकंदर आपल्या वसाहतीसंबंधी धोरण फारच कोत्या बुद्धीचे होतें त्यामुळें ब्युनॉस एरीझ वगैरे ठिकाणांहून अंतर्भागांशीं व्यापार करण्यास फारच गैरसोयी होऊं लागल्या व याचा परिणाम चोरटा व्यापार वाढण्यांत झाला. पोर्तुगीजांनीं ब्युनॉस एरीझ समोर एक वसाहत स्थापून चोरटा व्यापार चालविला व इंग्रजानींहि या बाबतींत त्यांस बरीच मदत केली. या वसाहतींनां गुलाम पुरविण्याचा मक्ताहि इंग्रजांकडेच होता. फ्रान्समध्यें जी राज्यक्रांति झाली त्या गडबडींत व नंतरच्या नेपोलियनयुद्धांत स्पेन गुंतला असतां इंग्रजांनी दोनदा ब्युनॉस एरीझ काबीज करण्याचा प्रयत्न केला, पण दोनहि वेळा त्यांस पिटाळून लावण्यांत आलें. परंतु या गोष्टीमुळें वसाहतवाल्यांत आत्मविश्वास उत्पन्न होऊन स्वातंत्र्यलालसा जागृत झाली.
अखेरीस १८१० मध्यें एक हत्यारबंद लोकांची सभा ब्युनॉस एरीझ येथें भरली व एक तात्पुरती जंटो स्थापण्यांत आली. कांहीं दिवस लोकपक्षामध्यें व राजकीय पक्षामध्यें लढा चालू होता व बरीच अव्यवस्था माजली होती. परंतु १८१६ मध्यें डेप्युटी लोकांची काँग्रेस भरली व डॉन मार्टिन प्वेरेडॉनला वरिष्ठ डिरेक्टर नेमण्यांत आले व रियोला प्लाटा हा संयुक्त प्रांत स्वतंत्र झाल्याचें जाहीर करण्यांत आलें. ब्युनॉस एरीझ हें राजधानीचें शहर बनविण्यांत आलें, परंतु बोलिव्हिया, पाराग्वे, उरुग्वे यांनीं ब्युनॉस एरीझ विरुद्ध बंडें केलीं व अखेरीस आपापली स्वतंत्र प्रजासत्ताक राज्यें बनविली.
ब्युनॉस एरीझ व चिली यांच्या संयुक्त सैन्यानें स्पॅनिश लोकांचा १८१८ मध्यें मैपू येथें पराभव केला. प्रजासत्ताक सैन्यानें अखेरचा जय अयाकुचा येथें १८२४ मध्यें मिळविला. स्पॅनिश सरकारनें या देशाचें स्वातंत्र १८४२ पर्यंत कबूल केलें नाही. १८२५ मध्यें संयुक्त प्राजासत्ताकांकरितां एक शासनघटना ठरविण्यांत आली व इंग्लंडनें या प्रजासत्ताक संस्थानास आपली मान्यता दिली.
१८२६ मध्यें बर्नार्डो रिव्हाडाव्हिया प्रेसिडेंट झाला. हा युनिटॅरियन्स पक्षाचा मुख्य होता. दुसरा पक्ष फेडरॅलिस्ट लोकांचा होता. याच्या कारकीर्दीत ब्राझिलशी लढाई झाली; व प्रजासत्ताकांतील निरनिराळ्या संस्थानांतील बंधनें बळकट करण्यांत आलीं. परंतु या गोष्टीस सर्वत्र विरोध दिसून आला व रिव्हाडाव्हियानें राजीनामा दिला. फेडरॅलिस्ट पक्षाचा लोपेझ, त्याच्यामागून प्रेसिडेंट झाला परंतु लागलीच डोरेगो प्रेसिडेंट झाला. युनिटॅरियन्स पक्षाचा मुख्य जॉन डि लॅव्हॅले होता. त्यानें डोरेगोला हांकून लावलें व गोळी घालून ठार केलें. इ. स. १८२८ मध्यें सर्वत्र बंडाळी व यादवी चालू होती. डोरेगो नंतर फेडरॅलिस्ट पक्षाचा जॉन मॅन्युयल डि रोझास हा मुख्य बनला. यानें १८२९ मध्यें त्यानें लाव्हॅलेचा पराभव केला व ब्युनॉस एरीझचा ताबा घेतला; आणि पुढील तीन वर्षांत आपली सत्ता सर्वत्र स्थापन केली. यानें युनिटॅरियन पक्षाचा क्रुरपणें पाठलाग केला व याची कारकीर्द म्हणजे भीतीचें साम्राज्य बनले. रोझासनें हळूहळू सर्व सत्ता बळकावली. नेहमीं याच्या कारकीर्दींत रक्तपात होत असत व हा अतिशय जुलमी बनला. अखेरीस उर्क्विझा यानें रोझसचा पाडाव १८५२ मध्यें केला.
उर्क्विझा यास १८५३ मध्यें प्रेसिडेंट निवडलें. शासनसंस्थेची घटना ठरविण्याकरितां प्रत्येक प्रांताचे सारखे प्रतिनिधी असलेली एक काँग्रेस भरविण्यांत आली. तिनें सान्टा फे येथें अधिवेशन भरविलें त्यामुळें ब्युनॉस एरीझ तींत सामील झालें नाहीं. तेव्हां उर्क्विझानें पराना हें राजधानीचें शहर केलें व ब्युनॉस एरीझला स्वतंत्र संस्थान म्हणून मान्य केलें. परंतु लवकरच संयुक्त पक्ष व ब्युनॉस एरीझ यांच्यामध्यें युद्ध होऊन ब्यूनॉस एरीझचा सेनापति मायटर याचा उर्क्विझानें पराजय केला व ब्यूनॉस एरीझ पुन्हां संघांत सामील झालें. तथापि लवकरच ब्यूनॉस एरीझ व इतर प्रांत यांच्यामध्यें वर्चस्वाबद्दल उघड लढाई जुंपली. मायटर व उर्क्विझा यांच्या हाताखालीं उभय पक्षाच्या सैन्यांची लढाई पुन्हां पॅव्हॅन येथें १८६१ मध्यें झाली. मायटर जय झाला. त्याला प्रेसिडेंट निवडण्यांत आलें व यानें या लढ्याचा कायमचा व चांगला निकाल लाविला. १८५३ ची शासनघटना कायम ठेवण्यांत आली व ब्युनॉस एरीझ हें संयुक्त संघाचे (फेडरल गव्हर्नमेंटचें) ठाणें बनलें. पुढें पाराग्वेशीं लढाई झाली. यावेळीं अर्जेंटिना, उरुग्वे व ब्राझील यांची दोस्ती झाली व १८७० मध्यें पाराग्वेच्या लोकांचा पूर्ण पराजय झाला. मध्यंतरीं अर्जेंटिनामध्यें बंड झाले परंतु त्याचा मोड करण्यांत आला. १८६८ मध्यें मायटरची मुदत संपली व डॉ. डोमिंगो फॉस्टिनो प्रेसिडेंट झाला. याच्या कारकीर्दीत शिक्षणाची व देशांतील संपत्तीची बरीच वाढ झाली. ब्युनॉस एरीझची समृद्धि व लोकसंख्या वाढली. अर्जेंटिना व ब्राझील यांच्यामधील लढाई मायटरच्या मध्यस्थींने मिटली. १८७० मध्यें एंट्रेरिऑसमध्यें लोपेझ जॉर्डन यानें बंड केलें तें प्रेडिडेंट सॅमीटोनें सैन्य पाठवून मोडलें. १८७४ च्या प्रेसिडेंटच्या निवडणुकीमुळें ब्युनॉस एरीझचे रहिवाशी (पोर्टिनो) व इतर प्रांतांतील लोक (प्रॉव्हिन्सियल्स) यांच्यामध्यें तंटा लागला. प्रॉव्हिन्सियल्सचा उमेदवार डॉ. निकोलस अव्हेलॅनेडा याची निवडणुकीमध्यें जनरल मायटरवर सरशी झाली परंतु लोकांस निवडणुकींत लबाडी झाल्याचा संशय आला. जनरल मायटरनें या लढ्याचा निकाल शस्त्रांनीं लावावा असा निश्चय केला. परंतु नवीन अध्यक्षाच्या हाताखाली सरकारी सैन्यानें या बंडखोरांवर दोन जय मिळविले व जनरल मायटर व त्याचा साथीदार अॅरेनडोडो यांस शरण यावें लागलें. परंतु पुढील निवडणुकीच्या वेळीं हें भांडण पुन्हां डोकें वर काढूं लागलें. प्रेसिडेंटचें मत जनरल रोका प्रेसिडेंट निवडून येण्याबद्दल होईल तितकें वजन खर्च करण्याचें होतें व ब्युनॉस एरीझचे लोक यास अडथळा करणार होते. पोर्टिनोनी, ब्युनॉस एरीझच्या सशक्त लोकांना लष्करी शिक्षणांत तरबेज करून स्वयंसेवक तयार करण्याकरितां व प्रॉव्हिन्सियल लोकांचे बेत हाणून पडण्याकरितां, सैन्य जमविण्याकरितां 'टिरो नॅशनल' नांवाची संस्था स्थापन केली. मध्यंतरी या स्वयंसेवक लोकांच्या नायकांनां प्रेसिडेंटनें बोलावून असली ड्रील वगैरे करण्याची मनाई केली. तेव्हां या लोकांनीं रस्त्यांतून मिरवणूकी काढल्या व अनेक सभा भरविल्या. प्रेसिडेंटनें घाबरून समेटाचें बोलणें लावले परंतु त्याचा कांहीं एक परिणाम न होतां लढाई होणें अवश्य ठरलें.
१८८० मध्यें राष्ट्रीय व सरकारी पक्ष आणि बारा प्रांत एका पक्षाला झाले व ब्युनॉस एरीझ शहर, प्रांत व कोरींटीस प्रांत दुसर्या पक्षाला झाले. कांहीं झटापटी होऊन जनरल रोकाच्या अधिपत्याखालीं राष्ट्रीय सैन्यानें पोर्टिनोस लोकांचा पराजय करून त्यांनां शरण यावयास लावलें. त्यांच्या सर्व नायकांनां सरकारी नोकरींतून काढून टाकण्यांत आलें व त्यांच्या सत्तेचा मोड करण्यांत आला. जनरल रोकाला प्रेसिडेंट निवडण्यांत आलें व त्यानें १८८० मध्यें सत्ता धारण केली.
रोका प्रेसिडेंट. — याच्या कारकीर्दीतील मुख्य गोष्ट म्हटली म्हणजे ब्युनॉस एरीझ हें शहर राष्ट्रीय मालमत्ता आहे असे जाहीर करण्यांत आलें. ब्युनॉस एरीझ प्रांताची राजधानी लाप्लाटा येथें नेण्यांत आली. यामुळें पोर्टिनोस लोकांची सत्ता फारच कमी झाली.
या प्रेसिडेंटनें देशाची संपत्ति वाढविण्याचे उपाय योजिले व सर्व प्रांतांचे ब्युनॉस एरीझशीं दळणवळण खुलें करण्याकरितां रेल्वे सुरु केल्या. परंतु त्यानें दोन ढोबळ चुका केल्या त्या म्हणजे १८८५ मध्यें दोन वर्षेंपर्यंत नोटांची रोकड मिळणार नाहीं हा फायदा पास केला व आपला मेव्हणा केल्मन यास पुढील प्रेसिडेंट म्हणून उभे केले.
केल्मन प्रेसिडेंट.— केल्मन अध्यक्ष झाल्याबरोबर जुन्या कोर्डोबा लीगचे सभासद बहुतेक सरकारी नोकरीवर चढले व या लोकांनीं लांचलुचपती वगैरे प्रकारांनीं आपली तुंबडी भरण्यास सुरुवात केली. हा जुलूम फारच वाढत चालला. याला प्रतिकार करण्याकरितां 'युनियन सिव्हिका' नांवाची संस्था ब्युनॉस एरीझच्या नागरिकांनीं स्थापन केली. १८९० मध्यें युनियन सिव्हिकानें हत्यारें धारण केली. यांच्या मदतीस कांहीं पलटणें आलीं तेव्हां केल्मननें राजीनामा दिला, व कार्लस पेलग्रिनि हा प्रेसिडेंट झाला.
पेलेग्रिनी प्रेसिडेंट.— यावेळीं देशाची सांपत्तिक स्थिति फरच शोचनीय झाली होती परंतु पेलग्रिनीला याला कांहींच तोड काढतां आली नाही. त्याची मुदत १८९२ त संपली. डॉ. साएन्झ पेना प्रेसिडेंट निवडला गेला. यानें राज्यव्यवस्था सुधारण्याचा फार प्रयत्न केला परंतु हा कोणत्याहि एका पक्षाचा नसल्यामुळें काँग्रेसमध्यें मताधिक्य याच्या बाजूचें नव्हतें. त्याला काँग्रेसमध्यें एकसारखा विरोध होत असे. १८९३ मध्यें ब्युनॉस एरीझच्या लोकांनीं तेथील गव्हर्नराविरुद्ध बंड केलें परंतु विशेष लढाई न होतां त्याचा बंदोबस्त करण्यांत आला. सँटा फे मध्येंहि बंड झालें पण तें जनरल रोकानें मोडलें. पुढें १८९४ मध्यें काँग्रेसमधील विरोध इतक्या थरास पोंचला की, काँग्रेस बजेट मंजूर करीना. तेव्हां १८९५ मध्यें पेनानें आपल्या जागेचा राजीनामा दिला व युरिबरु हा उपाध्यक्ष होता तो अध्यक्ष झाला.
युरिबरु प्रेसिडेंट. — या वेळीं चिलीच्या सरहद्दीविषयींचा लढा चालू होता व दोन्हीहि देशांचा लष्करी तयारी करण्यांत बराच पैसा खर्च झाला, असें असूनहि देशाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचे बाबतींत युरिबरुनें बरेंच काम केलें. १८९७ मध्यें ही स्थिति बरीच सुधारली व परकीय देशांत यानें आपल्या देशाची पत पुन्हा स्थापन केली.
रोका प्रेसिडेंट.— १८९८ मध्यें फिरून निवडणूक झाली व चिलीशीं लढाई होण्याचा संभव असल्यामुळे जनरल रोकाला प्रेसिडेंट निवडण्यांत आलें. प्रेसिडेंट रोकानें चिलीच्या प्रेसिडेंटची मॅगेलन सामुद्रधुनीवर मुलाखत घेऊन या सरहद्दीच्या प्रश्नांचा निकाल लवाद नेमून लावण्याचें ठरविलें व युद्धाची तयारी बंद ठेवली. कांहीं सरहद्दीबद्दलचा तंटा युनायटेड स्टेटसकडे देण्यांत आला व कांहीं इंग्लंडच्या बादशहाकडे सोंपविण्यांत आला. युनायटेड स्टेट्सच्या प्रतिनिधीनें १८९९ मध्यें सरहद्दीसंबंधीं दिलेला निकाल उभय पक्षांनीं मान्य केला. १८९९ मध्यें रोकाने न्याय देण्याच्या पद्धतींत, निवडणूकींच्या कायद्यांत व शिक्षणखात्यांत बर्याच सुधारणा सुचविल्या व त्या सर्व काँग्रेसमध्यें ताबडतोब मंजूर करण्यात आल्या. डॉलरची किंमत सरकारी रीतीनें ४४ सेंट सोनें कायम करण्यात आली व यामुळें कागदी डॉलरच्या नेहमी बदलणार्या किंमतीमुळें व्यापार व उद्योगधंदे यांच्या होणार्या नुकसानीस आळा पडला. १९०० मध्यें ब्राझिलच्या प्रेसिडेंटानें देशास मुलाखत दिली तेव्हां त्याचें फार स्नेहपूर्वक स्वागत करण्यांत आलें. चिली व अर्जेंटिना याचेमधील वैर बहुतेक संपलेंच होतें. पॅटागोनियातील सरहद्दीसंबंधीं १९०२ मध्यें सातव्या एडवर्ड बादशहानें दिलेला निकाल उभय पक्षांनीं मान्य केला.
रोकाच्या दूरदर्शीपणामुळें अशा आणीबाणीच्या प्रसंगी देशात शांतता नांदली व अर्जेंटिना व चिलीमधील भांडणाचा कायमचा निकाल लागला. रोकाची मुदत १९०४ मध्यें संपली. याच्यामागून डॉ. मॅन्युएल क्विन्टाना प्रेसिडेंट झाला. हा फार मेहनती व प्रागतिक मनुष्य होता. यानें देशांतील दळणवळणाचें मार्ग खुले करण्याचा बराच यत्न केला. हा १९०६ मध्यें मेला व याच्या मागून उपाध्यक्ष डॉ. आल्कोर्टा हा प्रेसिडेंट झाला.
१९१० आक्टोबरमध्यें प्रेसिडेंट जोसे फिगूरो अल्कोर्टा याची कारकीर्द संपून रॉक साएन्झ पेना हा प्रेसिडेंट झाला. याचा बाप १८९२-९५ पर्यंत प्रेसिडेंट होता. व्हिक्टोरिनोडला प्लाझा हा व्हाइस प्रेसिडेंट झाला. या वेळच्या प्रधानमंडळातील बरेचसे लोक परराष्ट्रात वकील म्हणून काम केलेले होते. १९१४ मध्यें रॉक साएन्झा पेना मरण पावला व डी ला प्लाझा प्रेसिडेंट झाला. या सुमारास जागतिक युद्ध सुरु झालें. त्या वेळीं आर्जेन्टिनाच्या प्रेसिडेंटनें तटस्थ वृत्ति ठेविली. तथापि पुष्कळशा लोकांचा व अधिकार्यांचा ओढा दोस्तराष्ट्रांकडे होता. १९१६ मध्यें प्रेसिडेंटची नवी निवडणूक झाली, व रॅडिकल पक्षाचा हिपोलिटो इरिगोवेन प्रेसिडेंट निवडून आला. आर्जेन्टिनाच्या इतिहासांत रॅडिकल पक्ष अधिकारारूढ होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. या प्रेसिडेंटानें पूर्वीं कोणत्याहि अधिकाराच्या जागीं काम केलेलें नव्हतें. तथापि या पक्षाचा कारभार लोकांनां पसंत पडला, आणि १९१९ च्या निवडणूकीमध्यें पुन्हां हा पक्ष अधिक बलिष्ठ होऊन अधिकारावर राहिला.
१९१७ मध्यें युनैटेडस्टेटस जागतिक युद्धांत शिरलें, त्या वेळीं अमेरिकेंतील अनेक देशांतल्याप्रमाणें अर्जेंटिनांतहि लोकमत द्विधा झालें. जर्मनीविरुद्ध युद्धांत पडावें असे एका पक्षाचें मत पडलें, व दुसरा पक्ष तटस्थ वृत्तिच फायदेशीर होईल या मताचा होता. बहुजनसमाज दोस्त राष्ट्रांबद्दल सहानुभूतिपूर्ण होता. पण अर्जेंटिनाच्या प्रजेंत २६००० जर्मन व ४०००० जर्मनवंशीय होते. या लोकांची संघशक्तीनें काम करण्याचि पद्धति चांगली असल्यामुळें देशांत त्यांचें वजनहि पुष्कळ होतें. खुद्द प्रेसिडेंटची मजूर पक्षाला सहानुभूति असल्यामुळें याच सुमारास देशांत संप वगैरे बरेच झाले, व त्यामुळें जागतिक युद्धपेक्षां स्वदेशांतील गोष्टीकडेच लोकांचें लक्ष अधिक वेधलें. १९१७ सप्टेंबरमध्यें ब्युनॉस एरीझच्या वृत्तपत्रांनीं ब्युनॉस एरीझ येथील जर्मन मिनिस्टर कौंट लक्झबर्ग यानें जर्मन परराष्ट्रीय खात्याला केलेली पुढील तार प्रसिद्ध केली, ती "अर्जेंटिनाच्या जहाजासंबंधानें माझा सल्ला असा आहे कीं त्यांना परत जाण्यास भाग पाडावें किंवा कांहीं मागमूस लागणार नाहीं अशा रीतीनें बुडवून टाकावी." याप्रमाणें चार जहाजें जर्मनानीं बुडविलीं होतीं. ही बातमी प्रसिद्ध होताच लोक फार प्रक्षुब्ध झाले व त्यानीं एका मोठ्या जर्मन क्लबाचा नाश केला, तीन जर्मनपक्षीय वृत्तपत्राच्या आफीसावर हल्ला केला, व कित्येक जर्मन दुकानांची बरीच नासधूस केली. अर्जेंटिनाच्या परराष्ट्रमंत्र्यानें लक्झबर्गला कळविले कीं त्याचें वकील या नात्यानें वास्तव्य अर्जेंटिनाच्या सरकारला नापसंत आहे. याप्रमाणें सर्वत्र जर्मनाविरुद्ध खळबळ उडून गेली, व जर्मनी बरोबर संबंध ठेवूं नये, असे ठरावहि कायदे मंडळानें पास केले. इतकी धामधूम झाली तरी प्रेसिडेंटनें राष्ट्राची तटस्थ वृत्तिच कायम ठेविली व जर्मन वकिलातहि कायम ठेविली. मात्र लक्झबर्गच्या जागीं कौंट डॉनहॉफ वकील नेमला गेला. आर्जेटिनांतील बरेच स्वयंसेवक शिपाई दोस्तांच्या सैन्याला मिळाले, आणि दोस्ताच्या रेडक्रॉस व इतर रिलिफ फंडांना लोकांनीं पैशाची मदत पुष्कळ केली.