विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्झरूम — अर्झरूम विलायत तुर्कस्तानच्या आर्मेनिया प्रांतांत असून, तींत तीन संजक आहेत: बयाझिद, अर्झरूम आणि अर्झिगन. आर्मेनियन पठाराचा अति उंच भाग हींत आला असून, डोंगराळ प्रदेशहि बरचसे आहेत. युफ्रेटीसच्या दोन्ही शाखांचेहि उगम याच विलायतेंत आहेत. हा मुलूख मुख्यत: शेतकीचा असून धंदे थोडेच आहेत. लोखंड, मीठ, गंधक आणि इतर खनजि पदार्थ येथें सांपडतात. कांहीं कोळशाच्या खाणीहि सुरू आहेत. बरेचसे लोक आर्मेनियन व कुर्द आहेत. विलायतचें क्षेत्रफळ सुमारें १९१८० चौ. मैल असून लोकसंख्या साडेसहा लक्ष आहे.
श ह र.— अर्झरूम हें शहर याच नांवाच्या विलायतचें मुख्य ठिकाण आहे. हें लष्करी ठाणें आहे व येथील किल्ला लष्करी दृष्टीनें फार महत्त्वाचा समजला जातो. ह्या शहराच्या पूर्वेला डेव्हेबोयुन ('उंटाची मान') कडा आहे. दक्षिणेस पलानडुफन पर्वताची रांग असून त्यांतून पुष्कळ ओढ्यांचा उगम झाला आहे. ह्या ओढ्यांतूनच शहराला पाण्याचा पुरवठा होत असतो.
ह्या शहराभोंवती एक मातीचा तट आहे, जवळील टेंकड्यावर किल्ले आहेत. एकंदरींत शहराची तटबंदी मजबूत आहे. सध्यां जुन्या भिंती व अंतर्दुर्ग यांचा मागमूस देखील नाहीं. कोटांतील शहराचा भाग अकुंचित असून, रस्ते अरुंद व घाणेरडे आहेत. शहराची लोकसंख्या सुमारें ऐशी हजार आहे; कुरदिस्तानाचा ब्रिटिश वकील येथें राहतो. इतर यूरोपियन राष्ट्रांचे वकील येथेंच असून शिवाय एक अमेरिकन मिशनची शाळा आहे. हें उंचवट्यावर असल्यामुळें येथें अतिशय कडक थंडी पडते.
या ठिकाणीं बर्याच सुंदर मशिदी व सार्वजनिक स्नानगृहें आहेत. सेलजुकांनीं बाराव्या शतकांत बांधलेली 'मद्रसा' इमारत, फारच सुंदर आहे. तिचा दरवाजा नकशीदार आहे व तिला दोन मनोरे आहेत, त्यांना 'चिफ्टे मनोरे' म्हणतात. येथें पूर्वीं उंटावरून बराच व्यापार चालत असे. येथील पितळेचें काम प्रसिद्ध आहे. या ठिकाणीं कातडी कमाविलीं जातात व तुर्की बूट व जिनें तेथें तयार होतात.
या प्रांतांत गहुं, जव, डाळ व भाजीपाला उत्पन्न होतो. सुंदर इराणी गालिचे येथें मिळतात.
अर्झरुम हें फार जुनें शहर आहे. सेलजुकांनीं तें १२०१ सालीं सर केलें व १५१७ सालीं तुर्कांच्या सत्तेखालीं आलें. रशियन सेनापति पास्केविच यानें तें १८२९ सालीं घेतलें. आड्रीयानोपलचा तह होईपर्यंत तें रशियन लोकांच्या ताब्यांत होतें. १८७८ सालीं पुन्हां रशियनांनीं तें घेतलें परंतु बर्लिन तहानंतर तें तुर्कांच्या ताब्यांत आलें. शहराचा बराच भाग १८५९ मध्यें झालेल्या भूकंपामुळें नाश पावला. तसेंच १९०१ च्या सालच्या भूकंपामुळें बराच नाश झाला.