विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्झिजन — अगर एरझिंजन हें आशियांतील तुर्कस्तानांत असून अर्झरूम विलायतेंतील एका संजकाचें मुख्य ठिकाण आहे. लष्करी दृष्टीनें याचें महत्त्व बरेंच आहे. शहर ३९०० फूट उंचीवर वसलेलें आहे. शहराभोंवतालीं फळबागा व फुलबागा बर्याच आहेत. शहराच्या पूर्वटोंकापासून पश्चिम टोंकाकडे जाणारा एक मोठा राजमार्ग आहे. बाकीचे रस्ते अरुंद व घाणेरडे आहेत. सरकारी इमारती व हाजी इझत पाशाची मशीद यांच्याजवळून जाणारे रस्ते जरा चांगले आहेत व पहाण्यासारख्या याच इमारती आहेत. शिपायांच्या राहण्याच्या मुख्य चाळी, लष्करी इस्पितळ व कपड्याच्या वखारी ह्या करटलूक येथे आहेत. शिपायांच्या जुन्या चाळी व लष्करी जोडे करण्याचे कारखाने या शहरांत आहेत. येथील लोकसंख्या १५००० असून तीपैकीं निम्मे लोक आर्मेनियन आहेत. येतील मुख्य उद्योगधंदे रेशीम व कापूस यासंबंधीं असून तांब्याचीं भांडीहि येथें तयार होतात. उन्हाळ्यांत येथील हवा उष्ण असते व हिंवाळ्यांत साधारण असते. गहूं, फळें, द्राक्षें, आणि कापूस हीं येथें पिकतात, लोक गुरें व मेंढ्या पाळतात. पाणी मुबलक आहे. आसपास लोखंड सांपडतें, कांहीं गरम पाण्याचे झरे आहेत. रुमच्या सुलतानानें १२४३ सालीं मोंगल लोकांचा येथील मैदानावर पराभव केला. सेंट ग्रेगरीचा प्रसिद्ध मठ या शहरापासून ११ मैलांवर होता.
पूर्वीं ज्या शहरांत अनैटीसचें देऊळ होतें, त्याच ठिकाणीं सध्यांचें शहर आहे. अनैटिस ही प्राचीन अर्मेनियाची एक स्त्रीदेवता होती. पर्शूंची अनाहित देवता हीच असावी असें कांहीं म्हणतात. सेंट ग्रेगरीच्या वेळेस चवथ्या शतकांत हें शहर एक महत्त्वाचें ठिकाण होतें. रोम्यानसचा १०७१ सालीं पराभव झाल्यानंतर हें शहर बायझनटाईन लोकांच्या हातून सेलजुकांच्या ताब्यांत गेलें व १२४३ सालीं मोंगल लोकांनीं घेतलें. मोंगलांच्या नंतर तार्तर व तार्तरांच्या मागून तुर्कोमन लोकांनीं हें शहर घेतलें, व सरतेशेवटीं दुसर्या महमदशहानें १४७३ सालीं उसमानअल्ली साम्राज्यात या शहराचा समावेश केला. भूकंपानें १७८४ सालीं ह्या शहराचा बहुतेक नाश झाला.