विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्डिया — लॅटिअममध्यें रुटुली लोकांचें हें शहर दक्षिणकिनार्याच्या नैॠत्येस ३ मैल आणि व्हाया आर्डिआटिनाच्या बाजूनें रोमच्या दक्षिणेस २३ मैल आहे. ओडेसिअस आणि सर्सीच्या मुलानें किंवा परसीअसची आई डॅनी हिनें हें शहर वसविलें असावें अशा आख्यायिका आहेत. हें टुरनुसचें राजधानीचें शहर टॉरक्विनीअस सुपरबसनें जिंकलें होतें. इ. सनापूर्वीं ५०९ सालीं कार्थेजशीं झालेल्या तहाप्रमाणें रोमच्या ताब्यांत गेल्यावर लवकरच हें लॅटिन संघास मिळालें. येथें असलेलें व्हीनसचें मंदीर सॅमनाइट लोकांनीं उध्वस्त केलें. १८६ सालीं हें मुख्य बंदीखान्याचें ठिकाण झालें. व्हाया आर्डिआटिना नांवाची सडक येथून थेट रोमपर्यंत गेलेली आहे. हें शहर दोन दर्यांमधील डोंगरसपाटीवर वसलेलें आहे. याच्या भोंवती ६० फूट उंचीचे कडे आहेत.