प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ९ वें.
अर्वाचीन परदेशगमन-आफ्रिका आणि अमेरिका येथील वसाहती.

आफ्रिका व अमेरिका या खंडांत आपली वसाहत स्थापन करण्याच्या कार्यास १९ व्या शतकाच्या पूर्वार्धांत सुरुवात झाली. अमेरिकेंत आपला पूर्वीं प्रवेश झाला होता असें पेरू येथील पांच राजपुत्रांच्या एका बायकोच्या गोष्टीवरून त्यांचा आणि पांडवांचा संबंध जोडून विधान करण्यांत येते. शिवाय नॅडिलॅगच्या पुस्तकामध्यें त्यानें मेक्झिकोमध्यें आढळलेल्या गणपतीसारख्या कांहीं मूर्तींचीं चित्रें छापिलीं आहेत त्यामुळें सुपीक डोक्याच्या पाश्चात्त्य व हिंदू मंडळींनां त्यावरहि तर्कटें रचण्यास बरीच जागा झाली आहे. त्यांच्या संबंधानें आम्ही येथें विचार करीत नाहीं. *  *  *  *

तेथें भारतीयत्वाचा आज मागमूसहि नाहीं आणि तेथें आपण गेलों असता. आपल्याच रक्ताचीं हीं माणसें म्हणून आपलें स्वागत करण्यास पूर्वकालीनांच्या अस्तिव्तांत असलेल्या किंवा नसलेल्या वसाहतीचे वंशजहि कोणी नाहींत. म्हणून आपला त्या अमेरिकेंतील भागाशीं कांहींच संबंध १९ व्या शतकापूर्वीं नव्हता असें आपण धरून चालूं. आफ्रिकेशीं मात्र कांहीं संबंध पूर्वींपासून दिसत आहे;  आणि कांहीं अंशीं तो एकसारखा चालू आहे. तथापि एक गोष्ट नवीन आहे ती ही कीं, व्यापारासाठीं परदेशीं जाणारे लोक थोडे असतात. हे लोक म्हणजे वसाहत करणारे नव्हत. व्यापारासाठीं जाणारी वस्ती म्हणजे तात्पुरती होय. शेतकरी बनतात ते जमिनीस अधिक चिकटतात. यासाठीं व्यापारप्रधान परदेशगमनापेक्षां कृषिप्रधान परदेशगमन अधिक महत्त्वाचें व अधिक विचार करण्याजोगें होय.

आतां अर्वाचीन परदेशगमनाचा इतिहास पहावयाचा. अर्वाचीन परदेशगमनामध्यें ज्या देशाकडे आपल्या लोकांचे पाय अधिक फिरतात किंवा पूर्वी फिरले आहेत, ते देश म्हणजे  सिलोन, स्ट्रेट्स, सेटलमेंट्स, फेडरेटेड मलाया स्टेट्स, नाताळ, मॉरिशस, त्रिनिदाद, ब्रिटिश गियाना, फिजी, हे होत.
यांपैकीं स्ट्रेट्स सेटलमेन्ट्स आणि फिजी खेरीज करून प्रत्येक देशांत भारतीयांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. या ठिकाणीं इतकी वस्ती होण्याचें कारण कराराने बांधून भारतीयांस इतरत्र नेण्याची पद्धति होय. या भारतीय परदेशगमनाचा इतिहास उष्ण प्रदेशांत आपलें भांडवल गुंतवूं इच्छिणार्‍या यूरोपांतील लोकांशीं निगडीत आहे. उष्ण प्रदेशांत व्यवहार करूं इच्छिणार्‍या भांडवलवाल्यांचीं यूरोपांत अनेक वृत्तपत्रें आहेत. त्यांत ‘वेस्ट इंडीज कमिटी सर्क्युलर’ आणि ‘ट्रापिकल लाइफ’ यांचीं नांवें हिंदुस्थानांत अधिक परिचित आहेत. परदेशगमन करणार्‍या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठीं आणि त्यांची माहिती आपल्या देशांत पसरविण्यासाठीं ज्या चळवळी आपल्या देशांत उत्पन्न झाल्या त्यांचें निदर्शक मद्रासचें ‘इंडियन एमिग्रंट’ नावांचें एक मासिक प्रसिद्ध होत आहे. परदेशस्थ लोकांची माहिती पुरविण्याचें काम ‘मॉडर्न रिव्ह्यु’ हें मासिकहि चांगल्या तर्‍हेनें करीत असतें. मद्रासच्या ‘इंडीयन रिव्ह्यु’ चीहि कामगिरी विसरतां येण्याजोगी नाहीं. वर सांगितलेल्या ठिकाणींपैकी बर्‍याच ठिकाणीं भारतीयांची वस्ती करारानें बांधून नेलेल्या मजुरांमुळें झाली आहे, तरी सर्वच ठिकाणची प्रथमची वसाहत केवळ मजुरांमुळें उत्पन्न झालेली नव्हे. डार्विननें आपल्या जगाच्या प्रवासांत १८३९ सालीं मॉरिशस येथें मुक्काम केला असतां तेथें त्याला सुमारें १२०० हिंदू लोक आढळले. ते तेथें कैदी म्हणून पाठविले होते. तथापि ते कोणी हलके कैदी नसून इंग्रजी हुकुमास आपल्या धार्मिक समजुतीमुळें न जुमानणारे लोक होते; आणि त्यांच्या डोळ्यांत विलक्षण तेज चमकत होतें. त्यांची तुलना गुन्हेगार इंग्रजांशीं करणें अयोग्य आहे असें डार्विन म्हणतो. जे लोक नोकरीकरितां म्हणून दूर गेले ते सर्वच पोटाच्या आशेकरितां गेले असें म्हणवत नाहीं. सुमारें ५० वर्षांपूर्वीं चार्लस किंग्सले यानें वेस्ट इंडीजमध्यें जो प्रवास केला त्याचें वर्णन देणारा त्याचा ग्रंथ ‘वेस्टवर्ड हो’ (Westward Ho) म्हणून आहे. त्या ग्रंथांत पन्नास वर्षांपूर्वींच्या त्रिनिदाद येथील हिंदूंचें मोठें हृदयंगम वर्णन आलें आहे. त्यांत तो म्हणतो कीं, सत्तावन सालच्या बंडांत इंग्रजाविरुद्ध शस्त्र उचललेले अनेक शिपाईबाण्याचे लोक आपलें अनिष्ट भवितव्य चुकविण्यासाठीं निसटून त्रिनिदाद येथें आले आहेत. ब्रिटिश गियाना येथील हिंदूंच्या वसाहतीसंबंधानें आणखी माहिती देणारीं पुस्तकें म्हटली म्हणजे रॉडवेकृत ‘ब्रिटिश गियानाचा इतिहास’, हेनरि कर्ककृत तेथील अनुभवांचें पुस्तक आणि त्यापेक्षांहि जास्त मनोरम आणि विस्तृत माहिती देणारें ब्राँकहर्स्टचें पुस्तक होय. ब्राँकहर्स्टनें तद्देशस्थ हिंदूंची जितकी विविध माहिती दिली आहे तितकी दुसर्‍या कोणत्याहि ग्रंथकारानें दिली नाहीं. त्यांत त्यानें ज्या अनेक जातींचें वर्णन केलें आहे, त्यावरून असें दिसतें कीं तेथें ब्राह्मणहि पुष्कळ होते, तथापि त्या ब्राह्मण म्हणविणारांपैकीं अनेक ठिकाणचे लोक ब्राह्मण नसावेत अशी कल्पना करण्यास पुष्कळ जागा त्यानेंच उत्पन्न करून दिली आहे. ब्राँकहर्स्ट म्हणतो, सेंट लुसिया बेटांतील सर्वच हिंदूंनीं आपली जात ब्राह्मण म्हणून लिहून दिली आहे;  आणि यावर तो असें उद्‍गारतो कीं सर्वच जर उपाध्ये तर सामान्य जन कोण ? तेथील लहान लहान दागिने करणार्‍या सोनारांचीं, निग्रो आणि क्रिओल पोरांनां चटक लावणार्‍या जिलब्या करणार्‍या हलवायांचीं, आपली जातच वैद्य म्हणून सांगणार्‍या लोकांचीं, लेखकाची नोकरी मिळविण्याची आकांक्षा करणार्‍या तथापि इंग्रजीच्या अज्ञानामुळें ज्यांचा उपयोग होत नाहीं अशा कायस्थांचीं, तसेंच आपल्या घटपटादि खटपट करण्याच्या शिक्षणपद्धतीनें आणि वादविवादपद्धतीनें ब्राँकहर्स्टसारख्या भोळ्या मिशनर्‍यास वादविवाद करून पंचाइतींत पाडणार्‍यांचीं वर्णनें ब्राँकहर्स्टच्या ग्रंथांत आलीं आहेत. नाताळ येथील आणि तसेंच मॉरिशस येथील हिंदुसमाजांचें वर्णन करणारे ग्रंथ दृष्टीस पडले नाहींत. तथापि सामान्य प्रवासवर्णानांत मधून मधून भारतीयांच्या स्थितींचीं सूचक वर्णनें किंवा उल्लेख येतात. असो.

वरील तुरळक उदाहरणें सोडून देतां हें निर्विवाद आहे कीं, या वसाहतींत हिंदुस्थानी लोकांचें संख्याबाहुल्य, एशियांतून “कूली” नेण्याच्या पद्धतीमुळें आहे; आणि भारतीयांची परदेशांतील दशा समजण्यास या कूलीपद्धतीचा थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .