प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

पारशी, यहुदी व चिनी यांचा हिंदुसमाजावर परिणाम.- आज या देशांत ख्रिस्ती व मुसुलमान यांनीं एतद्देशीय लोकांस आपल्यांतलें केलें, एवढेंच नव्हे तर पारशांनीं देखील हिंदूंतील माणसें घेऊन समाजवर्धन केलें. आजच्या पारशी लोकांतील अनेक लोकहि मुळचे इकडचेच आहेत. डावर हें आडनांव ठाण्याच्या आसपासच्या वारली जातींत व पारशांतहि आढळतें. देशांतील शिष्टवर्ग त्यांच्या संप्रदायांत मिळेना व केवळ खालच्या जातीचेच लोक त्यांच्या जातींत समाविष्ट होत म्हणून ही पार्शीकरणाची चाल त्यांनीं अलीकडे बंद केली आहे असें डॉ. ढाला म्हणतात. अलीकडे पारशांत परकीय लोकांस स्वसमाजांतर्गत करावें म्हणून म्हणणारा एक पक्ष आहे तथापि त्या पक्षाचा हेतु यूरोपीय लोकांचा आणि विशेषेंकरून स्त्रियांचा समावेश स्वजातींत व्हावा असा आहे. त्या पक्षास विरुद्ध पक्षाचे लोक ‘चिरूटिया’ किंवा ‘मडमिया’ (म्हणजे चिरूट ओढणें किंवा मडम बायको करणें या बाबतींत स्वातंत्र्य अपेक्षिणारा वर्ग) म्हणतात. परजातीयांस स्वजातींत घ्यावें किंवा नाहीं याबद्दल पारशांनीं इराणांतील धर्मशास्त्रज्ञांकडून रेवायत नांवानें ओळखिले जाणारे जे शास्त्राधार आणले त्यांत परप्रवेशानुकूल अभिप्राय व्यक्त करून घेतला आहे. आजचे पारशी स्वजातिसंवर्धनाकडे फारसें लक्ष घालीत नाहींत याचें एक कारण जातीच्या पंचायतीचा जो निधि आहे त्या निधीचा फायदा घेणार्‍यांची संख्या वाढूं नये असें सांगण्यांत येतें. तथापि हें कारण सर्वांशी खरें नाहीं. स्वकीय विद्या समाजसभासदत्व हें धन समजून त्याचा उपभोग इतरांस घेतां येऊं नये ही भावना हिंदूंप्रमाणें त्यांतहि आहेच. पारशी मद्रासांमध्यें अवेस्ता शिकविण्यासाठीं परकीयांस अजून  घेत नाहींत या गोष्टीवरून पारशांनीं वेदरक्षणाच्या सांप्रदायिक बाबतींत हिंदूंचें किती अनुकरण केलें आहे हें दिसतें. पार्शी लोकांचें हिंदूंशीं साम्य दाखविणारी दुसरी एक गोष्ट अशी आहे कीं, गाथा, वेंदिदाद या ग्रंथांत जे विचार उपदेशिले आहेत ते पारशांच्या विचारांचें नियमन करीत नाहींत, केवळ उपासना आणि विधी या गोष्टींपुरताच पारशी दस्तुरांचा आज उपयोग आहे. दस्तुर जे अवेस्ताचे पाठ म्हणतात ते शुद्ध नाहींत तर ते मूळ गाथांचे खरे उच्चार सोडून भ्रष्ट उच्चार करितात अशी पारशी सुशिक्षितांची समजूत आहे. *  जे विचार लोकांत सांगावेत आणि ज्या मतांची स्थापना चोहोंकडे करावी असे विचार आणि अशीं उत्साहजनक मतें पार्शीं ग्रंथांत नाहींत असें नाहीं. पण ते विचार अजून कर्तव्यास स्फूर्ति देतील इतक्या स्पष्ट तर्‍हेनें दस्तुरांच्याच मनांवर बिंबले नाहींत. अवेस्ताचा अर्थ न समजतां संध्येसारखा पाठ म्हणावा यापलीकडे त्यांचें ग्रंथज्ञान फारसें गेलें नाहीं. पार्शांच्या अस्तित्वामुळें हिंदूंवर काय सामाजिक परिणाम झाले हें सांगता येत नाहीं. थोडेसे हिंदू केव्हांतरी पारशी झाले हा एक परिणाम दिसतो. आपल्यांतील सोंवळ्याच्या कल्पना कमी होण्यास इराण्यांची होटेलें कारण झालीं, हा एक दुसरा परिणाम दिसतो. गुजराथी भाषेवर पारशी भाषेचा कांहीं परिणाम झाला आहे. पारशी गुजराथी म्हणून एक बोली तयार झाली आहे. तरी पण पारशांचा आपल्यावर फारसा परिणाम होण्याऐवजीं आपलाच पारशांवर अधिक झाला असें म्हणतां येईल.

पारशांशिवाय दुसरा परकीय संस्कृतीनें वेष्टीलेला अल्प समुदाय म्हणजे यहुद्यांचा होय. यहुद्यांपैकीं कांहीं गेल्या शतकांतील आहेत आणि कांहीं फार जुने आहेत. हे देखील आज आपला संप्रदाय वाढवीत नाहींत. तथापि कांही वर्षांपूर्वीं ते संप्रदाय वाढवीत असावेत असे वाटते. कोचीन येथें गोरे व काळे असे यहुद्यांमध्ये भेद आहेत. तेथील गोरे यहुदी देखील अनेक शतकें येथें आहेत त्या गोर्‍यांचें म्हणणें असें आहे कीं, ते स्वतः शुद्ध रक्ताचे आहेत आणि काळे यहुदी मिश्र किंवा मूळचे हिंदू आहेत. काळे यहुदी असें म्हणतात कीं, आम्ही जुनें आहोंत. गोरा आणि काळा हा जसा यूरोपीयांनीं हिंदुस्थान जिंकल्यामुळें तीव्र भेद वाढत आहे. बेने इस्त्रायलांस इतर यहुदी कमी समजतात. बेने इस्त्रायस पूर्वीं नवीन आलेल्यांस हलके समजत असत.

डेव्हिड सासून यानें यहुदी लोकांसाठीं ज्या मोठमोठ्या देणग्या दिल्या त्यांचा उपयोग बेने इस्त्रायलांस होत नाहीं. बेनें इस्त्रायलांमध्यें मराठी भाषा लपविण्याची प्रवृत्ति होण्यास यहुदी समाजांतील काळागोरा भेद बराच कारण होतो हें स्पष्टपणें निर्देशिलें पाहिजेच. कोंकणी यहुदी म्हणजे बेने इस्त्रायल यांचीं व इतर यहुदी लोकांचीं लग्नें होत नाहींत. जेव्हां होतात तेव्हां त्या संबंध करणार्‍या गोर्‍या यहुद्यास इतर यहुदी वाळींत टाकतात, अशीं कांहीं उदाहरणें कलकत्त्यास दृष्टीस पडतात. गोर्‍या यहुद्यांपैकीं सर्वच लोक बेने इस्त्रायलांचें जातीनें यहुदीपण अमान्य करीत नाहींत. उलटपक्षीं बेने इस्त्रायलहि असें सांगूं लागले आहेत कीं, आम्हां बेने इस्त्रायलांतच काळा आणि गोरा अशे भेद पूर्वींपासून आहेत. असें सांगणारे बेने इस्त्रायल स्वतःस गोर्‍यांत जमा करतात हें सांगावयास नकोच. बेने इस्त्रायलांच्या रक्ताविषयीं शंका न घेतां त्यांच्या आचाराच्या शुद्धतेविषयीं दोष काढण्याचें सुरू झालें आहे. उदाहरणार्थ बेने इस्त्रालांच्या बायका तेबिल्ला घेत नाहींत म्हणजे विटाळशांनीं देवळांतील हौदांत स्नान करून शुद्ध व्हावयाचें तें त्या करीत नाहींत वगैरे अपवाद आतां बाहेर पडूं लागले आहेत. यहुदी लोकांच्या धर्मांविषयींचा आणि इतिहासाविषयींचा विचार पुढें येईल.

आतां आपल्या देशांतील चिनी लोकांकडे वळूं. आज त्यांची संख्या जरी अल्प आहे तरी ती पुढेंमागें मोठी होईल असा बराच संभव आहे. शिवाय हे लोक आले म्हणजे आपल्या देशांतील वैसदृश्य अधिक वाढलें असें होईल. या बाबतींत सरकारी शासनाचा उपयोग करून घेण्यासाठीं लोकांनीं जागरूक राहिलें पाहिजे. चिनी लोक या देशांत आले तर त्याची फिकीर येथील सरकारास खास वाटत नाहीं. पूर्वीं एकदां साष्टी बेटांत चिनी लोकांची वसाहत करवावी म्हणजे मुंबईच्या इंग्रज व्यापार्‍यांस लागणारे मजूर भरपूर मिळतील अशा तर्‍हेची योजना ईस्ट इंडिया कंपनीच्या हातीं राज्य कारभार असतां झाली होती. तथापि ती पुढें सोडून देण्यांत आली. कांहीं चिनी कैदी हिंदुस्थानांत ठेविले होते आणि त्यांस येथील हलक्या जातींच्या स्त्रियांपासून संततीहि झाली आहे. या संततीस आज नांव काय आहे तें कळलें नाहीं. थरस्टन *  यांस “चायनीच तामिल क्रास” म्हणजे चिनी तामिळ मिश्रण असें म्हणतो. या वर्गाचें पुढें भवितव्य काय याजकडेहि आपणांस दृष्टी ठेवली पाहिजे.कलकत्त्यास अनेक चिनी येऊन जोड्यांचा व्यापार करणें, बूट तयार करणें, सुतारकाम करणें, या धंद्यांत पडलेले आढळतात. आजचे कलकत्त्यांतील सगळ्यांत चांगले सुतार हे चिनी होत असा समज कलकत्त्यास आहे. हे लोक जर देशांतच राहिले तर देश्य संस्कृति दुर्बल करण्यास जीं कारणे आहेत त्यांत आणखी एकाची भर पडेल. जेथें जातिभेद तीव्र आहे तेथें परकीय लोक आपल्या समाजांत समाविष्ट व्हावे ही इच्छा ठेवणें म्हणजे फार दूरच्या गोष्टीसंबंधानें ओरड करणें होय. या लोकांवर आपली छाप आपल्यांतीलच एखाद्या संप्रदायाकडून पडते असें दिसत नाहीं. कलकत्त्यास देखील कांहीं बौद्ध आहेत पण त्यांचा आणि चिनी लोकांचा संबंध मुळींच दिसत नाहीं. हे सध्यां अगदीं तुटक असल्यासारखे आहेत. नाहीं म्हणावयास एकदां असें प्रसिद्ध झालें होतें कीं हे चिनी लोक नेटिव ख्रिस्ती स्त्रियांशीं लग्ने करतात. हें जर खरें असेल तर कदाचित बंगालीपणा चिनी लोकांच्या भावी प्रजेंत शिरेल. कलकत्त्यांतील बंगाली लोकांस या संबंधानें स्पष्ट माहिती नाहीं, किंवा यासंबंधाचा विचारहि ते करूं लागले नाहींत.

पुढे वाचा:पारशी, यहुदी व चिनी यांचा हिंदुसमाजावर परिणाम

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .