प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण ११ वें.
बाह्यांचा हिंदुस्थानावर परिणाम.

यूरोपीयांच्या अभिप्रायांचें परिक्षण.- आतां या अभिप्रायांचें परीक्षण करितांना रा. शंकर बाळकृष्ण दिक्षित असें म्हणतात कीं, “गणितस्कंधाचा विचार पाहतां ग्रहांच्या मध्यम गतिस्थिति, स्पष्टगति व स्पष्टगति व स्पष्टस्थिति काढण्याच्या मंद शीघ्र फलसंस्काराचीं मानें, सारांश वेधानें निघणारीं सर्व मानें मूळ आमचीं आहेत. ग्रीक ज्योतिषाचा आमच्याशीं संबंध असेल तर तो एवढाच कीं मंदशीघ्राच्चांपासून ग्रहाचें जें अंतर म्हणजे केंद्र तदनुसार ग्रहस्थितींत फरक पडतो, हें तत्व परदेशांतून समजलें असावें असा संभव आहे. हें तत्त्व पाणिनीपूर्वींच आम्हांस कळून पुढें आमच्या ज्योतिषाचा विकास स्वतंत्रपणें झाला आहे. आणखि कांहीं किरकोळ गोष्टी कदाचित् परदेशांतून आल्या असतील. जातकविषयीं पाहतां, जातकस्कंध आमच्या देशांत आहे त्याची उत्पत्ति मूळची आमच्या देशांतील आहे, असा माझा सिद्धांत आहे.”

या गोष्टींबद्दल प्रमाण दाखवितांनां पंचसिद्धांतिकेपैकीं पैतामहाबद्दल तर वादच नाहीं पण वासिष्ठ व पौलिश हे सिद्धांत देखील रोमकाहून प्राचीन होते असें रा. दीक्षित सिद्ध करून देतात;  व हे सर्व पांच सिद्धांत  टालमीहून प्राचीन आहेत असें दाखवितात.

रा शीं चीं नां वें. - मेषादि संज्ञा या आपल्य इकडे केवळ क्रांतीवृत्ताचा भाग दाखवितात व मेष वगैरेबद्दल यूरोपीयांप्रमाणें आमच्या पुराणांत कथा वगैरे नाहींत. पण नक्षत्रांच्या आकृतींवरून त्यांनां नांवें देण्याची पद्धति आमच्यांत होती हें हस्तादीनक्षत्रांवरून उघड होतें;  व क्रिय, तावुरि हीं तिकडील नांवें कदाचित् इकडील मेषादि नांवाचीं भाषांतरें असूं शकतील, अगर त्याच्या उलट असूं शकेल. पण मेषादि संज्ञा व वारपद्धति यांत कांहीं महत्त्व नाहीं. ग्रहस्पष्टगतिस्थितीचें ज्ञान व त्याच प्रमेय यांत काय तें ज्योतिःशास्त्राचें महत्त्व आहे. आम्ही प्रथम नुसते सावन दिवस पाहिला दुसरा असे मोजीत होतों, त्याबद्दल वार घेतले किंवा क्रांतिवृत्ताच्या १२ विभागांस षडशीति इत्यादि आमच्या संज्ञा होत्या त्या टाकून मेषादि घेतल्या यांत कांहीं विशेष झालें असें नाहीं. क्रांतिवृत्ताचें १२ विभाग आमच्यांत मूळचे होते हें इतर ठिकाणीं दाखविलेलेंच आहे. ग्रहस्थिति राशीविभागावार सांगण्याची पद्धति मात्र मेषादि विभाग प्रचारांत आल्यावर सुरू झाली असें दिसतें.

ग्रहस्पष्टगतिप्रमेय आम्हीं ग्रीकांपासून घेतलें असलें तरी तें वासिष्ठसिद्धांतांत नाहीं. अर्थात् तें घेतलें असल्यास वासिष्ठसिद्धांत त्यापूर्वींचा आहे आणि त्यांत मेषादि विभाग आहेत. यावरून मेषादि विभाग खाल्डी लोक किंवा इजिप्‍तचे लोक यांपासून घेतले असल्यास त्यामुळें आम्हास कमीपणा आला असें मुळींच होत नाहीं. त्या संज्ञा इ. स. पूर्वीं ५०० च्या सुमारास आल्या असाव्या.

वे ध. - त्याप्रमाणेंच आपल्या लोकांत वेधपरंपरा नाहीं, वेधकौशल्य नाहीं, अवलोकन नाहीं, हे आरोप मिथ्या होत हेंहि रा. दीक्षितांनीं सप्रमाण दाखविलें आहे. प्राचीनतम उपलब्ध वेध म्हटले तर खाल्डी लोकांचा इ. स. पू. ७२० चें ग्रहण आणि ग्रीकांचा इ. स. पू. ४३० या वर्षीं मेटननें कलेलें उदगयनावलोकन हेच होत. आम्हीं तर उदगयनावलोकन इ. स. पू. १४०० या कालीं केलें होतें.

ग णि त स्कं ध. - गणितस्कंधाविषयीं विचार करितांना, वर्षमान, ग्रहमध्यगति, मंदोच्चें आणि पात, मंदकर्ण, विक्षेपमानें, अयनचलन, रविचंद्र परममंदफलें व पंचग्रहांचीं परममंदशीघ्रफलें, क्रांतीवृत्ततिर्यकत्व, सूर्यचंद्रलंबन, उदयास्तकालांश, यांतून कोणतीहि गोष्ट आम्ही टालमीपासून घेतली नाहीं हें रा० दीक्षित यांनीं सिद्ध करून दिलें आहे. हिपार्कस यास रविचंद्रस्पष्टीकरण मात्र माहीत होतें. ग्रहस्पष्टीकरण त्यास माहित नव्हतें. तें टालमीच्या पूर्वींच्या कोणत्याच पाश्चात्य ग्रंथांत नाहीं असें पाश्चात्य ज्योतिषाच्या इतिहासांत ग्रँट म्हणतो. *  हिंदि चांद्रमासाचें मान जितकें शुद्ध आहे तितकें ग्रीकांस कधींच साधलें नाहीं असें कोलब्रूक म्हणतो. *  एकंदरींत हिपार्कस व टालमी या दोघांच्या ग्रंथावरून आम्ही कांही घेतलें असल्यास प्रतिवृत्तपद्धतीखेरीज कांहीं घेतलें नाहीं असा सिद्धांत रा. दिक्षित काढतात.

टालमी आणि हिपार्कस यांच्या पूर्वी पाश्चात्यांजवळ ज्योतिषविषयक ज्ञान असल्यास फारच अल्प असलें पाहिजे, जवळ जवळ नव्हतेंच असें म्हणण्यास कांहीं हरकत नाहीं. कारण रविचंद्रस्पष्टीकरण आणि पंचग्रहस्पष्टीकरण ही काय ती ज्योतिषांत महत्त्वाची गोष्ट, व तिचें ज्ञान हिपार्कसपूर्वीं पाश्चात्यांस मुळींच नव्हतें असें सर्व यूरोपीय लेखक कबूल करितात.

म्लेच्छा हि यवनास्तेषु सम्यक् शास्त्रामिदं स्थितम्। या श्लोकावरून आम्ही ज्योतिष यवनांपासून म्हणजे ग्रीकांपासून घेतलें अशी  कल्पना कोणी करितात, परंतु या वचनाचा मुख्यतः जातकाशीं संबंध आहे. आमचें ज्योतिषशास्त्र मूलसूर्यसिद्धांतांत म्हणजे वराहापूर्वींच उत्तमावस्थेस आलेंस होतें असें आहे, तथापि पंचसिद्धांतिकेंत एका स्थळीं यवनपुरापासून (अलेक्झांड्रिया) उज्जनीचें देशांतर आलें आहे. रोमकनगरांत म्लेच्छावताररूपानें तुला ज्योतिषज्ञान देईन असें सूर्यानें मयास सांगितलें अशा अर्थाचा एक श्लोक सूर्यसिद्धान्तांत आढळतो. तसेंच
भूमिकक्षाद्वादशांशे लंकायाः प्राकच शाल्मले।

मयाम प्रथमप्रश्ने सौरवाक्यमिदं भवेत्॥ शा० ब्र० सि० अ. १ असें वाक्य शाकल्य ब्रह्मसिद्धान्तांत आहे. यांत प्राकच म्हणजे पूर्वेस लंकेपासून ३० अंशांवर मय आणि सूर्य यांचा संवाद झाला असें आहे. परंतु ज्योतिषाचें ज्ञान भारतीयांस मिळण्यासारखें स्थळ पूर्वेस लंकेपासून ३० अंशांवर मुळींच नाहीं तेव्हां हें वाक्य विश्वसनीय नाहीं. तरी पण सूर्यसिद्धान्तांतील कथेस यावरून जोर येतो. यावरून यवनांचा आमच्या ज्योतिषाशीं कांहीं तरी संबंध आहे असें मनांत येतें;  दोघांची प्रतिवृत्तादि पद्धति बरेच अंशी सारखी आहे यावरून या अनुमानास बराच आधार मिळतो. तथापि कोणतेहि आंकडे आम्ही ग्रीकांपासन घेतले नाहींत हें वर दाखविलेंच आहे. तेव्हां विचार करून पाहतां बर्जेसच्या अनुमानाप्रमाणें असेंच अनुमान केलें पाहिजे कीं “दोन्ही राष्ट्रांस परस्परांपासून कांहीं दिग्दर्शन मात्र मिळालें आणि तेंहि फार परस्परांपासून कांहीं दिग्दर्शन मात्र मिळालें आणि तेंहि फार प्राचीन काळीं (हिपार्कसच्या पूर्वीं) मिळालें. कारण अर्वाचीन काळीं हिंदूंनीं ग्रीकांपासून कांहीं घेतलें  काय हें सांगणें कठिण आहे, कारण दोघांच्या संख्या मुळींच मिळत नाहींत.”

दि ग्द र्श न. - आतां हें दिग्दर्शन कोणापासून कोणास मिळालें हा विचार करितांना केंद्र हा आपणास महत्त्वाचा शब्द आढळतो. मंदशीघ्रोच्चांपासून ग्रहाचें जें अंतर तें केंद्र होय; आणि तदनुसार मंदशीघ्रफलें उत्पन्न होतात. केंद्र हा शब्द ग्रीक किंवा दुसर्‍या कोणत्या तरी भाषेंतला असावा. तो संस्कृत नाहीं असें दिसतें. यावरून “केंद्रानुसार ग्रहाच्या मध्यमस्थितींत अंतर पडतें” हे तत्त्व यवनांकडून आमच्याकडे आलें असावें असा निष्कर्ष रा. दीक्षित हे काढतात. हें तत्त्व पुलिशसिद्धान्तांत प्रथम आढळतें आणि हा सिद्धान्त हिपार्कसचा ग्रंथ इकडे येण्यापूर्वींचा असल्यामुळें हें तत्त्व हिपार्कसच्या पूर्वीं इकडे आलें. हिपार्कसच्या पूर्वीं प्रतिवृत्तपद्धतीचा आणि तिजवर अवलंबून असलेल्या वरील तत्त्वाचा ज्योतिषगणितांत उपयोग कोणी केला नव्हता हें कोलब्रूक इत्यादिकांच्या अभिप्रायांत स्पष्ट आहे. परंतु प्रतिवृत्तपद्धति हिपार्कसच्या पूर्वीं अपालोनियस यानें मूळ कल्पिली असें कोलब्रूक म्हणतो. याप्रणाणें अपालोनियस किंवा दुसरा जो कोणी तिचा कल्पक असेल त्यापासून कोणत्या तरी मार्गानें ती इकडे आली. अर्थात् ती अपूर्ण होती आणि याच कारणामुळें आमच्या आणि ग्रीकांच्य प्रतिवृत्तादिपद्धतींत साम्य आहे तरी बरेंच वैषम्य आहे. पुलिशसिद्धान्ताचा वरील तात्पुरता यवनांशीं संबंध असेल. पुलिशांत भुजज्या आहेत त्या ग्रीकांपासून  इकडे आल्या नाहींत, कारण टालमीच्या ग्रंथांतहि भुजज्या नाहींत. सारांश, परकीयांपासून आम्हांस कांहीं मिळालें असल्यास ग्रीकांपासून किंवा कदाचित् बाबिलोनच्या लोकांपासून केवळ वर लिहिलेल्या नियमांचें दिग्दर्शन मिळालें असेल, दुसरें कांहीं मिळालें नाहीं. वेधप्राप्‍त गोष्टी इत्यादि तपशीलवार माहिती मिळाली नाहीं. ही ज्योतिःशास्त्राची गोष्ट झाली. यानंतर वाङ्‌मयाकडे वळूं.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .