प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.

हिंदुत्ववृद्धि म्हणजे काय. - हिंदुसमाजाचा एकंदर विस्तार आणि त्याबरोबर उपस्थित होणारे प्रश्न यांची माहिती दिल्यानंतर या समाजाचें भवितव्य काय हा प्रश्न उत्पन्न होतो. समाजाचा भवितव्यविषयक विचार करण्यासाठीं ज्या कारणांनीं समाजांत फेरबदल उत्पन्न होतात तीं कारणें आणि त्या कारणांनीं होणार्‍या फेरबदलांचें स्वरूप यांचें शास्त्र थोडेंसें अवगत करून घेतलें पाहिजे. समुच्चयांची घटना, विकास, अन्यसमाजसंयोग, स्वरूपांतर, विघटना म्हणजे समुच्चयांतर्गत व्यक्तींचा अन्यसमाजांनीं केलेला स्वीकार आणि तन्मूलक समाजनाश या सर्व समुच्चयविकाराच्या पायर्‍या लक्षांत घेतल्या पाहिजेत. हिंदुसमाजाचें भवितव्य मनुष्येतिहासांत सुरू झालेल्या अनेक प्रकारच्या गतींनीं निर्णीत व्हावयाचें आहे. केंद्रविहिन हिंदुसमाजास केंद्र उत्पन्न होऊन त्याचे हातपाय पसरतील किंवा हा समाज दुसर्‍या कोणत्या तरी समाजांत विलीन होऊन जाईल, हा प्रश्न आहे. जें काय भवितव्य असेल तें गूढच राहणार, तथापि त्याचीं शक्य स्वरूपें काय हें लक्षांत घेतलें पाहिजे. हीं शक्य स्वरूपें येणेंप्रमाणें दिसतात.
(१) ख्रिस्ती व मुसुलमान हे संप्रदाय वाढून हिंदू संस्कृतीचा अजीबात लोप होणें, आणि हिंदु समाजाचाहि नाश होणें.
(२) हिंदु समाज वृद्धिंगत होणें.
आपणांस एक प्रश्न वारंवार विचारला जातो तो हा कीं “हिंदु धर्माचा” म्हणजे हिंदुत्वाचा विस्तार इतःपर होईल काय ?

या प्रश्नास उत्तर द्यावयाच्या अगोदर आपण कांहीं कल्पनांची फोड करून घेतली पाहिजे. या प्रश्नाचे दोन अर्थ होऊं शकतील. एक हिंदु समाज वाढत जाईल काय ? आणि दुसरा हिंदु विचार आणि कल्पना या पसरत जातील काय ? हिंदुत्व पसरणें आणि ख्रैस्त्य पसरणें या गोष्टींचें स्वरूप भिन्न आहे. संप्रदायाचा प्रसार म्हणजे विशिष्ट मतांचा प्रसार, आणि त्याच्या अनुषंगानें समाजाचा विस्तार. या दोन भिन्न गोष्टी एकत्वानें ख्रिस्ती इत्यादि सर्व संप्रदायांस लागू पडतील. हिंदुत्वाचा प्रसार म्हणजे अशी गोष्ट नाहीं. हिंदुत्व म्हणजे कांहीं मतें नव्हत. हिंदुत्व स्थापन होणें म्हणजें परक्यांचा हिंदुसमाजामध्यें अंतर्भाव होणें होय. अंतर्भाव म्हणजे बाहेरील माणसें समाजांतील विशिष्ट जातींत प्रविष्ट होतील, किंवा त्यांची घटना जशी ची तशीच राहून त्यांचा समाज हिंदु समजला जाईल. हिंदु समाजाची एकंदर घटना लक्षांत घेतली म्हणजे त्या घटनेचा विस्तार कसा काय होणें शक्य आहे हें समजले. हिंदुसमाजाची तुलना आपण तात्पुरती अमेरिकेंतील संयुक्त संस्थानांशीं करूं. संयुक्त संस्थानें म्हणजे मूलतः एक राष्ट्र नव्हे; तर राष्ट्रांचा संघ आहे. अमेरिका म्हणजे संयुक्त संस्थानें हें राष्ट्र (राष्टसंघ) दोन तर्‍हांनीं वाढत आहे. एक, या राष्ट्रसंघामध्यें इतर राष्ट्रांचा समावेश होत आहे आणि दुसरें, नाना ठिकाणचीं माणसें त्या प्रदेशांत येत आहेत. दुसर्‍या तर्‍हेनें जेव्हां वाढ होते तेव्हां असें होतें कीं, नवीन येणारा मनुष्य एका विशिष्ट संस्थानामध्यें नागरिक होतो व अशा रीतीनें त्या संस्थानामार्फत अमेरिकन राष्ट्राचा नागरिक होतो. जो समुच्चयांचा संघ आहे त्यांत व्यक्तींचा स्वतंत्रपणें अंतर्भाव होत नाहीं. राष्ट्रवर्धन व्हावयाचें तें एकतर नवीन संघ येऊन राष्ट्रसंघास मिळाल्यानें होईल किंवा व्यक्ति येऊन संघातर्गत समूहास मिळाल्यानें होईल. या दोन्ही तर्‍हांनीं हिंदुत्वाची वाढ होणें शक्य आहे. कारण, हिंदुसमाज हा व्यक्तींचा संघ नसून संघांचा संघ आहे. एवढेंच कीं, त्या संघामध्यें किंवा संघातर्गत बर्‍याचशा समूहामध्यें शासनसंस्था नाहींत; त्यामुळें अस्तित्वांत असलेल्या बर्‍याच संघांची आंतील सभासद वाढून वाढ होणें फारसें शक्य नाहीं. जे समाज जयिष्णु असतील, ज्यांत गडबड करून संघबल वाढविणारीं माणसें निघतील, तेच समाज अशा रीतीनें वाढतील, इतर वाढावयाचे नाहींत. शिवाय आपल्या संघसमुच्चयास केंद्रवर्ती संस्था नसल्यामुळें जे समाज आपल्याशीं अधिकाधिक सदृश होतील ते आपल्यांतीलच आहेत असें समाजातर्फें मानण्यास आपल्यांत अधिकारी तरी कोण आहे ? असो.