प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.

संस्कृतिवैशिष्ट्यरक्षण.- जातिरूपी दुर्बल समाजजगांत ज्या अनेक जाती आहेत त्यांपैकीं सर्वच आपली विशिष्ट संस्कृति रक्षिण्यास समर्थ नाहींत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रांत आज अर्धनग्न दिसणार्‍या कातकरी व ठाकूर या जाती घेऊं. यांस जर पुढें शिक्षण मिळून भोंवतालच्या समाजामध्यें त्या मिसळून गेल्या तर त्यांचें विशिष्टत्व फार तर कांहीं गाण्यांच्या रूपानें शिल्लक राहील. त्यांचे बहुतेक रिवाज जंगली असल्यामुळें नाहींसेच होतील. गुजांमय भूषणें, कवड्यांचें किंवा पोतीचे भरगच्च दागिने हे टिकावयाचे नाहींत. त्यांच्या गरजा व सर्व समजाच्या गरजा जवळ जवळ सारख्याच होतील. संस्कृतीचा प्रसार होऊन जेव्हां जगांतील भिन्न भिन्न समाजांचा एकमेकांवर परिणाम होत असतो तेव्हां गळतें काय आणि टिकतें काय हें थोडेंसें पाहिलें पाहिजे. ज्या समाजांस स्वातंत्र्य आहे म्हणजे जे राज्यकर्ते आहेत, त्यांचा विशिष्टपणा अधिक टिकतो आणि त्यांच्याच रिवाजास सार्वत्रिकत्व येतें; आणि  जे समाज स्वायत्त नाहींत म्हणजे राज्यकर्ते नाहींत, त्या समाजांच्या अनेक गोष्टी दिवसानुदिस नाहींशा होत जातात आणि जर त्यांचें वैवाहिक पृथक्त्व टिकलें नाहीं तर दुसर्‍या मोठ्या समाजांचा एकरूप समाज बनविणारें एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे न्यूयॉर्क शहर होय. या शहरास परमेश्वराची मोठी मूस म्हटले आहे. येथें निरनिराळ्या राष्ट्रांतून अनेक लोक येतात आणि त्यांनां अमेरिकन शिक्षण मिळून त्यांच्या पुढील पिढीचे आचार एकसारखे होऊन समाजांत एकरूपता येते. तेथें अनेक जाती एकमेकांमध्यें लग्नें करितात आणि त्यामुळें त्यांचें जातिवैशिष्ट्य वितळून जाऊन त्यांवर एकराष्ट्रीयत्व झळकूं लागतें. आतां आपण कोणतीं राष्ट्रें आपलें विशिष्टत्व रक्षिण्यास समर्थ होतात हें पाहूं. यूरोपामध्यें लोकांस एकराष्ट्रीय करण्यासाठीं जे शिक्षणविषयक प्रयत्‍न झाले त्यांत असें दिसून येईल कीं, एका राष्ट्राच्या प्रदेशावर दुसर्‍याचें राज्य स्थापन झालें असतांहि त्याजवर परसंस्कृतीचा लेप फारसा बसला नाहीं. मूळचा एकरूप समाज परकीय भाषेच्या दडपणाखालीं ठेविल्यास त्याची प्रगति कांहीं दिवस बंद होईल एवढेंच. तथापि कोणत्याहि ठिकाणीं सार्वत्रिक असलेली भाषा नष्ट करणें सुलभ नाहीं. पोलंडची भाषा दाबून टाकण्याचा प्रयत्‍न रशिया, ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांनीं केला, तरीहि ती नष्ट झाली नाहीं. फिनलंडची तीच कथा आहे. युक्रेन भागांतील युक्रेन भाषा ही रशियन भाषेचीच पोटभाषा आहे असें सांगून ती दडपून टाकण्याचा प्रयत्‍न रशियानें केला तथापि त्या प्रयत्‍नांस कितपत यश आलें,  हें रशियाच्या वाईट दिवसांत युक्रेनमधील लोकांनीं आपलें स्वतंत्र राष्ट्र स्थापिलें यावरून लक्षांत येईल. वेल्श भाषेचा देखील नायनाट करण्याच्या प्रयत्‍नास फारसें यश आलेलें नाहीं. जेव्हां स्वतंत्र भाषा असणार्‍यांनां स्वतंत्र प्रांत असतो तेव्हां परसत्तेखालीं जाऊन देखील त्यांचें समाजविशिष्टत्व कायम राहतें आणि त्यांचा समावेश करून घेऊन त्यांस पचनीं पाडण्यास इतर लोकांस जड जातें. त्या माणसांचा जेव्हां इतस्ततः संचार होत असेल तेव्हां मात्र तीं माणसें दुसर्‍या संस्कृतीसं पचनीं पाडतां येतात. तथापि यासहि कांहीं थोडाबहुत अपवाद आहेच. यहुदी लोक आतां सर्वत्र पसरले आहेत. ज्या देशांत ते जातील तें राष्ट्र त्यांचें व तो समाज त्यांचा. तथापि इतकें असूनहि त्यांचें विशिष्टत्व अंशेकरून कायमच राहिलें आहे; आणि याचें कारण यहुदी लोकांचें प्राचीन वाङ्‌मय होय. जेव्हां राष्ट्रस्वरूपी जाति संप्रदाय यांचा संबंध येतो आणि जेव्हा भोंवतालचे संप्रदाय आपल्या समाजाची संख्या वाढविण्यासाठीं परसमाजांतून मनुष्यचौर्य करूं लागतात. तेव्हां स्वसमाजरक्षणार्थ पूर्वींच्या राष्ट्रस्वरूपी जातीसहि आपल्या समाजामध्यें इतरांचा अंतर्भाव करून घेणें प्राप्‍त होतें; आणि ते आपल्या जातीच्या संस्कृतीस आणि जातीस संप्रदायायें स्वरूप देतात. यहुदी लोक आतां गोर्‍या लोकांनां आपल्या समाजांत घेऊं लागले आहेत याचें कारण हेंच आहे. हिंदुसमाजासारखें जें मोठें धूड आहे तें एकीकृत होऊन कांहीं संस्कृतिरक्षणाचें कार्य करूं लागेल असा संभव नाहीं. तथापि जें सर्व समाजास शक्य नाहीं तें समाजांतर्गत संप्रदायांनीं करण्यास प्रारंभ केला आहे. आर्यसमाज व ब्रह्मसमाज हे दोन्ही समाज परजनग्राहक आहेत. हिंदु मिशनरी सोसायटीचा प्रयत्‍नहि या प्रकारचाच आहे. जे समाज स्वतः राष्ट्रस्वरूपी असून आणि ज्यांचें स्वातंत्र्य गेलेलें नाहीं अशा समाजांमध्यें जर परकीय संप्रदाय येऊन मिशनरीपणा करूं लागले तर ते समाज आपली पैतृक संस्कति कायम राखूं शकतात. अशा प्रसंगीं हे समाज आपल्यांतील उपासनांपेक्षां संस्करविधि आणि कायदा यांसारख्या लौकिक गोष्टींसच प्रामुख्य देतात व यामुळें नवीन संप्रदाय आणि परंपरागत संस्कृति यांची तडजोड होते. या प्रकारचा उपक्रम जपाननें केला आहे. ‘शेन ताउ’ उर्फ ‘शिंतो’ यास आतां परमार्थसाधनपर आचारसमूह म्हणून धरीत नसून केवळ लौकिक व्यवहारासाठीं उत्पन्न झालेला नियमसंग्रह असें मानतात; आणि राज्याचे सर्व विधी शिंतोप्रमाणें चालवितात.

आज हिंदुसमाजामध्यें दोन तर्‍हेच्या निरनिराळ्या संघांचा समावेश होतो. ते दोन संघ म्हटले म्हणजे जाती आणि संप्रदाय हे होत. विशिष्ट नियमांनीं, विशिष्ट आचारांनीं व विशिष्ट उपास्यांनीं वेष्टिलेले असे हे दोन्ही संघ आज दृष्टीस पडतात. या दोहोंमध्यें भेद हा आहे कीं एकांत नियम आचार आणि उपास्यें हीं अप्रधान असून दुसर्‍यांत तीं प्रधान आहेत आणि त्यामुळें एकांत इतरांचा प्रवेश नाहीं आणि एकांत इतरांचा प्रवेश आहे. जातींपैकीं अनेक जातींमध्यें शासनसंस्था नसल्यामुळें त्या प्रसारास अक्षम आणि असहाय झाल्या आहेत तथापि जर जातींमध्यें कांहीं फेरफार झाले तर जाती समाजास हानिकारक न होतां पोषकच बनतील आणि ते फेरफार म्हटले म्हणजे प्रत्येक जातींतच लग्न लावलें पाहिजे, या जातीच्या नियमासंबंधाचे होत. जातीबाहेर लग्न लावण्याचा प्रघात जरी पडला तरी जातीचें समुच्चयत्व नाहीसें होईल असें नाहीं. संघांची उपयुक्तता केव्हांहि भासणारच. जेव्हां मोठ्या कार्याकरितां अनेकांचें एकीकरण करावें लागतें तेव्हां तें समाजांत असलेल्या लहान लहान संघामुळें सुलभ होतें. सर्व लोकांस वळविण्यापेक्षां प्रत्येक वर्गांतील निश्चित पुढारी वळविणें हें अधिक सोपें जातें. अमेरिकेमध्यें आपणास फ्रॅटर्निटिज उर्फ बंधुमंडळें दृष्टीस पडतात. या बंधुमंडळांस त्यांच्या विरुद्ध असलेले लोक हिंदुजातींचें सवंग अनुकरण म्हणून त्यांचा उपहासहि करितात. प्रत्येक बंधुमंडळामध्यें कांहीं माणसें असतात. जेव्हां बंधुमंडळांतर्गत संघीभूत लोकांस आपलें वर्चस्व इतरांवर स्थापावयाचें असतें तेव्हां हीं बंधुमंडळें सहज एकत्र होऊं शकतात. उदाहरणार्थ, अमेरिकेंतील कॉलेजामध्यें असलेल्या कोणत्याहि संस्थेमध्यें अधिकारी निवडावयाचे झाले म्हणजे निरनिराळीं बंधुमंडळें एकत्र होऊन प्रत्येकानें आपआपलीं कोणतीं माणसें पुढें आणावीं हें ठरविण्यांत येतें. अमक्या संघांतील मनुष्यास अध्यक्ष नेमावें, अमक्या अमक्यांतील अमुक अमुक माणसास उपाध्यक्ष नेमावें, अमक्या अमक्यांतील लोकांस चिटणीस निवडावें, अमक्या संघांतील अमुक मनुष्य खजिनदार करावा, असें त्यांचें आपआपसांतच ठरतें; आणि तें ठरलें म्हणजे निरनिराळ्या बंधुमंडळांतील सर्वच माणसांचीं मतें त्या योजनेस पडतात. असें झालें म्हणजे एखाद्या समूहांत पांचशें माणसें असलीं आणि त्यांतील दोनशें माणसें कोणत्या तरी बंधुमंडळांत असलीं म्हणजे बंधुमंडळांनीं आपआपसांत ठरविलेल्या अधिकार्‍यास दोनशें मतें पडतील. आणि उरलेल्या तीनशेंचें एकीकरण तर तत्काल होणें शक्यच नाहीं. यामुळें बंधुमंडळांतील माणसें निरनिराळ्या संस्थांवर सत्ता चालवूं शकतात. एवंच निरनिराळ्या ज्ञातींचें पृथक् संघ असणें ही गोष्ट समाजास हितावह नाहीं असें नाहीं. अमेरिकन फ्रॅटर्निटिज आणि हिंदुस्थानांतील जाती यांमध्यें कांहीं भेद आहेत. तेथील बंधुमंडळांनां आपल्या समुदायांत हुशार माणसें घ्यावींत आणि संघसाहाय्यानें आपलें महत्त्व वाढवावें ही इच्छा असते. हिंदुस्थानांतील जाती तसें करीत नाहींत. कां कीं जातींत समावेश करावयचा आणि बंधुमंडळांत समावेश करावयाचा यांत आज पुष्कळच फरक आहे. दोहोंमध्यें सदृश अशी गोष्ट ही कीं, दोन्ही समाज कांहीं विशिष्ट पारमार्थिक मतें पसरविण्याचें अंगिकारीत नाहींत. तसेंच जातीमध्यें ज्याप्रमाणें जातीची देवता असते त्याप्रमाणें या बंधुमंडळामध्यें मौजेकरितां म्हणून तरी निदान कांहीं गुप्त विधी आणि संस्कार हे असतातच.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .