प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग ).

प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.

जातिभेदनाशार्थ झालेल्या प्रयत्‍नाची अव्यापकता.- जातिभेदाच्या बलाचें पृथक्करण झालें पाहिजे. तें केल्यानें आपण प्रयत्‍न काय केला पाहिजे याची हि कल्पना येईल. जातींचें बल समुच्चयावर अनेक प्रकारें अवलंबून असतें. एक तर प्रत्येक मनुष्यास लग्न करण्याची अवश्यकता असल्यामुळें आणि जातीच्या बाहेर फारच थोड्या व्यक्ती असल्यामुळें जातींचें व्यक्तींवर वर्चस्व मूळचेंच फार आहे. याशिवाय व्यक्तींची काळजी घ्यावयाची हें कर्तव्य राष्ट्रानें म्हणजे सरकारनें फारच नियमितपणानें अंगिकारलें आहे. समाजांतील व्यंगें किंवा दुःखें यांचें निवारण करण्यासाठीं सरकारी दानसंस्था नाहींत, एवढेंच नव्हे तर देश्य दानसंस्थांची काळजी देखील सरकार नीट घेत नाहीं. समाजांतील पुढारी म्हणविणारा वर्ग फारच थोडा आहे. हिंदुसमाजांतील दानसंस्थांचा हिशोबहि घेतला गेला नाहीं. त्यामुळें त्या बर्‍याचशा बेजबाबदार आणि गैरशिस्त आणि निष्काळजीपणानें काम करणार्‍या झाल्या आहेत. सुशिक्षित वर्ग देवळांपासून आणि त्यामुळें दानसंस्थांपासून अलिप्तच आहे. अडचणीच्या प्रसंगीं प्रत्येकास आपल्या जातीकडेच जावें लागतें आणि अडचणी दूर करण्याचें काम दुसर्‍या कोणींच हातीं घेतलेलें नाहीं. कांहीं विमाकंपन्या आपल्या देशांत आहेत आणि बर्‍याचशा परकीय कंपन्या येथें येऊन धंदा करीत आहेत त्यांच्यामुळें विधवांचें किंवा निराश्रित अर्भकांचें हित पहाण्याचें काम जातींच्या पुढार्‍यांकडून जर बजावलें गेलें नाहीं तर अनन्यगतिक लोकांस थोडीबहुत सोय आहे; परंतु ज्या गोष्टी जात करूं शकेल पण विमाकंपन्या करूं शकणार नाहींत, अशा गोष्टी बर्‍याच आहेत. अंत्यसंस्कार वगैरे बाबतींत जर जातीची मदत झाली नाहीं तर दुसर्‍या कोणत्याच सार्वजनिक संस्थेवर आज तें काम विश्वासतां येत नाहीं. सामाजिक सुधारणेचा प्रसार करण्याचें काम जे लोक अंगावर घेतात त्यांमध्यें सर्व हिंदुस्थानाचा हिशोब घेतांहि निश्चयाचीं व करारी माणसें आज मुळींच नाहींत. ज्यास आपला म्हणविला त्यास शेवटपर्यंत नेट धरून मदत करावयाची हा करारीपणा कोणामध्यें आहे? सुधारणेचीं तत्त्वें आपण बोलावयाचीं, तीं तत्त्वें दुसर्‍या कोणावर तरी लादून त्याला फशीं पाडावयाचें, आणि आपण मोकळेंच रहावयाचें अशा प्रकारच्या मंडळींनींच जातिभेदाविरुद्ध ओरड करणारा वर्ग भरलेला आहे. या परिस्थितीमध्यें जातीचा आश्रय सोडून व्याख्यान देणार्‍या सुधारकाचे अनुवर्त्ती होतील असे लोक फारच थोडे सांपडणार.

व्यक्तींनीं आपल्या जातीचीं बंधनें टाकून दुसर्‍या कोणत्या तरी संस्थेशीं किंवा संस्थांतर्गत आचार्य बनूं पाहणार्‍या व्यक्तीशीं संबंध स्थापित करणें अशक्य होण्यास जीं अनेक व्यावहारिक कारणें आहेत त्यापैकीं कांहींचीं कल्पना वरील विवेचनावरून येईल. शिवाय लोकांच्या मनांतील किंतु नाहींसा करण्यासाठीं आणि सर्वजनसमाजावर परिणाम करण्यासाठीं आपल्या सामजिक संस्थांचा जो सत्यनिर्णायक आणि ऐतिहासिक अभ्यास व्हावा लागतो तोहि झालेला नाहीं. नवीन सुधारणा  प्रवृत्त करूं पाहणार्‍यांमध्यें संस्कृत पांडित्य आणि ऐतिहासिक पद्धति आणि त्यांबरोबर अवश्य होणारें देशी भाषेंत ग्रंथलेखन यांचा तर पूर्ण अभावच दिसून येतो.

शिक्षणसंस्थांकडे पाहिलें तर आज फारच थोड्या वर्गाचें शिक्षण सरकारच्या हातीं आहे. बहुतेक सर्व धंद्यांचें शिक्षण, व्यवहारोपयोगी शेतकीचें शिक्षण, हें सर्व जुन्या परंपरेच्याच हातीं आहे. त्यामुळें जातींचा व्यक्तींवर पगडा सहजच विशेष राहणार आहे. फक्त कारकुनी करणें आणि वरिष्ठ धंदे करणें हें मात्र सरकारच्या अथवा अर्वाचीन सुशिक्षितांनीं चालविलेल्या संस्थांच्या हातीं आहे.

अमेरिकेसारखा समाज आणि हिंदुस्थानासारखा समाज यांची तुलना केली असतां अनेक भेदसुचक गोष्टी नजरेस येतात. जगांतील स्पर्धेंत परकीयांस साहाय्यक आणि हिंदूंस असाहाय्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्यांतील प्रमुख व सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणमूलक फरक ही होय. हिंदुस्थानांतील शेंकडा पंचाण्णव व्यक्ती लिहिण्यावाचण्यास असमर्थ असल्यामुळें समाजांतील सुशिक्षित व विचार करणार्‍या उच्च जनतेचा आणि इतर जनतेचा संबंध हिंदुस्थानांत फारच थोडा आहे. याशिवाय दुसरी गोष्ट म्हटली म्हणजे ज्याप्रमाणें प्राचीन कालीं शास्त्रीपंडितांचा वर्ग व्यवहाराशीं अनभिज्ञ असे, त्याप्रमाणें आजचाहि सुशिक्षितांचा वर्ग आहे. उलटपक्षी अमेरिकेंत सर्व व्यवरहारांत सुशिक्षित वर्ग आहे आणि तेथील एकंदर सुशिक्षित वर्ग त्यामुळें व्यवहारज्ञ आहे.

या दोन भेदांशिवाय आपणांस अहितकारक असे भेद इतके आहेत कीं, त्यांचें वर्णन करावयाचें म्हणजे एक मोठा ग्रंथच होईल. तथापि या दोहोंचें निदर्शन करण्याचें कारण एवढेंच कीं, यांचे परिणाम फार दूरवर पोंचतात; आणि त्यामुळें जगांतील स्पर्धेंत आपला समाज फारच दुर्बल ठरतो. बहुतेक जनसमाजाला जगांतील स्पर्धेची कल्पनाच नाहीं आणि व्यवहारभिज्ञ सुशिक्षित वर्गाला देखील ती फारच थोडी आहे.

या तर्‍हेनें सुशिक्षित वर्गाची चळवळ बांधली गेली असल्यामुळें त्यास सर्व लोकांमध्यें एक कल्पना प्रसृत करण्यास आणि लोकांच्यामध्यें स्वसमाजसंवर्धनाविषयीं भक्ति उत्पन्न करण्यास सामर्थ्य नाही, व त्यामुळें संप्रदायसंस्था आपले विचार बर्‍याच लोकांत प्रसृत करण्यास देखील बरीचशी असमर्थ ठरते. असो. आतां समाजवृद्धिसंकोचविषयक आणखी कांहीं नियम सांपडतात कीं काय तें पाहूं.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .