प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १२ वें.
समाजरूपांतराचे नियम आणि हिंदुसमाजाचें भवितव्य.

जातींची घटना आणि विघटना.- नवीन जातींच्या घटनेसंबंधानें आणि जुन्या जातींच्या विघटनेसंबंधानें सर्वसामान्य तत्त्वें येणेंप्रमाणें सांगतां येतील.

(१) जेव्हां वर्ग, जाती, आणि राष्ट्रें आपली प्रसरणशक्ति घालवितात तेव्हां त्या संकुचित होऊन त्यांच्या निराळ्या जाती बनतात.

(२) आपली जात किंवा वर्ग वाढवावा या तर्‍हेची भावना जातीमध्यें किंवा राष्ट्रामध्यें किंवा वर्गामध्यें कधीं कमी कधीं जास्त अशी असते आणि तद्विषयक त्यांची वृत्ति वारंवार बदलते; आणि परक्यांचा समावेश आपल्या जातींत करावा किंवा करूं नयें हें त्या जातीच्या तात्कालिक वृद्धिपर किंवा संकोचपर भावनांवर अवलंबून असतें.

(३) ज्या अर्थीं अनेक जातींचें अगोदरचें स्वरूप वर्ग किंवा राष्ट्र यांच्या स्वरूपाचें म्हणजे पुष्कळसें बंधनरहित असतें त्या अर्थीं जाती कशा बनतात हें स्पष्ट करण्यासाठीं वर्ग कसे बनतात किंवा राष्ट्रें कशीं बनतात हें स्पष्ट केलें पाहिजे.

(४) जाती आणि इतर राष्ट्रवर्गादि भिन्न समूह यांच्या मधील भेद हा जितका तीव्र आहे असें समजलें जातें तितका नाहीं. समूहाचें संवर्धन किंवा संकोच हा समूहांतील वारंवार बदलणार्‍या लोकवृत्तीवर अवलंबून असतो आणि यासाठीं विशिष्ट समूह जात आहे किंवा वर्ग आहे याविषयींचें विधान विशेष काळजीपूर्वक केलें पाहिजे आणि जें विधान आज बरोबर असेल तें शंभर वर्षांपूर्वीं बरोबर असेलच असें नाहीं हेंहि लक्षांत ठेवलें पाहिजे.

(५) समूहाची वृद्धि जी होते ती सामुच्चयिक प्रयत्‍नानें झाल्याचें दिसत नाहीं. ज्या जातींत पंचायत किंवा कोणतीच शासनसंस्था नाहीं त्या जातींत सामुच्चयिक प्रयत्‍नाचा संभव नाहीं. तथापि ज्या जातीमध्यें पंचायती वगैरे आहेत त्या जातींत देखील वृद्धि होरो ती सामुच्चयिक प्रयत्‍नानें झाल्याचें दिसत नाहीं. नेहमीं असें दिसतें कीं एखाद्या समाजांत कांहीं बलवान व्यक्ती उत्पन्न होऊन त्या आपलें कार्यकर्तृत्व दाखवितात आणि आपल्या चळवळीनें समाजाची वृद्धि करितात आणि या त्यांच्या प्रयत्‍नानें जातीच्या स्वरूपांत फेरफार होतो.

(६) बहुतकरून असा नियम समजावा किं जे बलवान संघ आहेत त्यांची प्रवृत्ति प्रसारशील असते आणि जे दुर्बल समूह आहेत ते संकोचनप्रवृत्तीच असतात.

(७) बर्‍याचशा जातींचा इतिहास लक्षांत आणतां आपणांस असें दिसून येईल कीं, आपल्या जातीमध्यें जातींतच उत्पन्न झालेल्याखेरीज इतर कोणाचा प्रवेश होऊं द्यावयाचा नाहीं किंवा मिश्रविवाहापासून उत्पन्न झालेल्या संततीचा स्वीकार करावयाचा नाहीं हें तत्त्व ज्या जातींचा इतिहास आपणांस ठाऊक आहे त्यांपैकीं कोणीहि पूर्णपणें पाळिलें नाहीं. कोणत्या जातींतील माणसांचा प्रवेश आपल्या जातींत होऊं द्यावयाचा या संबंधाची निवड करून परकीय रक्त बहुतेक सर्व जातींत कमी अधिक प्रमाणानें घेतलें गेलें आहे. हें विधान महाराष्ट्रांतील कोंकणस्थ, देशस्थ व कर्‍हाडे ब्राह्मण, मराठे, माळी, सोनार, महार आणि महाराष्ट्रांतील गौड ब्राह्मण या सर्वांसंबंधानें करितां येईल. मराठे आणि धनगर यांनीं तर मुसुलमान दासीपासून झालेली प्रजा देखील आपणांत समाविष्ट करून घेतली आहे.

(८) जेव्हां एखादी नवीन जात वर्ग या रूपानें किंवा राष्ट्र या रूपानें तयार होऊं लागते त्या वेळेस असें होऊं लागतें कीं, ती जात निरनिराळ्या जातींचीं कुलें, वर्ग किंवा पोटजाती आपणांत समाविष्ट करून घेते. अशा वेळेस सामाजिक घटनेचें एखादें निकाळें तत्त्वहि उदयास येतें. ही गोष्ट मराठ्यांसारख्या जातीवरून सिद्ध होईल.
 
(९) जेव्हा सामाजिक घटनेचीं नवीन तत्त्वें उद्भूत होतात तेव्हां जुनीं तत्त्वें कमी महत्त्वाचीं होतात आणि जुन्या जाती नाहींशा होऊन नव्या जाती निर्माण होतात. ब्राह्मण जातींचें पृथक्त्व महाराष्ट्रांत वेदशाखामूलक आहे, परंतु तैलंग, द्राविड इत्यादि देशांत तें मतमूलक आहे.

(१०) जेव्हां जुने समुच्चय जाऊन नवीन समुच्चय बनतात त्या वेळेस त्या नवीन होणार्‍या समुच्चयांत निरनिराळ्या जातींचे लोक आले असतां ते त्या नवीन समुच्चयाच्या पोटजाती बनतात. त्या जातींमध्यें किंवा समुच्चयांमध्यें जेव्हां एकीकरणाचा प्रयत्‍न होतो तेव्हां आपसांतील पोटभेद काढून टाकण्याकडे प्रवृत्ति होऊन त्या जातींस अधिकाधिक एकरूपात येते. महाराष्ट्रांतील निरनिराळ्या जातींमध्यें ज्या पोटजाती आहेत त्यांपैकीं पुष्कळांची नांवें एकच आहेत. उदाहरणार्थ सोनारांत किंवा साळ्यांमध्यें ज्या पोटजातींचीं नांवें म्हणूंन सांपडतील तींच नांवें दुसर्‍या कांहीं जातींत सांपडतील. या तर्‍हेच्या गोष्टी उपर्युक्त तत्त्वाची सिद्धता करितात.

 वरील विवेचनावरून असें दिसेल कीं, जातिभेद नष्ट न होण्यास कारणें लौकिक आहेत, आणि तो मोडण्यास जे प्रयत्‍न झाले पाहिजेत त्यांचा शतांशहि समाजाकडून झाला नाहीं. समाजाचें एकीकरण करण्यास ज्या गोष्टी उत्पन्न झाल्या पाहिजेत, त्यांपैकीं समाजास हेतु उत्पन्न झाला पाहिजे व समाजास केंद्र उत्पन्न झाला पाहिजे या मुख्य होत. आजपर्यंत सर्व समाजास एकत्र बांधूं इच्छिणार्‍या चळवळी पारमार्थिक स्वरूपाच्या असल्यामुळें त्यांचा केवळ एक विशिष्ट संप्रदायाच्या स्थापनेपुरता परिणाम झाला.

सर्व लोकांत सामान्य तर्‍हेनें उच्च प्रकारची वृत्ति व आचार उत्पन्न करण्यास विशेष व्यक्तिंचा पारमार्थिक उपदेश हें यंत्र अपुरें आहे, सर्व लोकांस साधें शिक्षण देण्याची खटपट ज्या वेळीं होऊन तींत यश येईल तेव्हां जनतेच्या अज्ञानापासून सुशिक्षित वर्गालाहि तापदायक होणारीं बंधनें कमी होऊं लागतील. सर्वसामान्य समाज गतानुगतिक असतां सुशिक्षितांस वेगळें राहून चालत नाहीं. शिक्षण सार्वत्रिक जोपर्यंत नाहीं तोंपर्यंत तीव्र आचारभेद राहील. एक दोन मराठे ब्राह्मणासारखे वागतील पण सर्व मराठे निराळेच वागतील आणि दिसतील. निरनिराळ्या जातींमध्यें वरवर दिसणारेंहि सादृश्य जोंपर्यंत वाढलें नाहीं तोंपर्यंत जातिभेदाविरुद्ध ओरड फोल होते. समाजांत सादृश्य वाढविण्यासाठीं मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची खटपट पाहिजे आणि तें स्त्रियांतहि पाहिजे. शिक्षणानें उत्पन्न होणारें सादृश्य वाढलें आणि सर्व समाजास एकत्र ओढणार्‍या व्यक्ती अगर संस्था निर्माण झाल्या म्हणजे जातिभेदाचें स्वरूप कमी तीव्र होईल. हें सादृश्य उत्पन्न व्हावयाचें तें भारतीय विद्येमार्फत होईल, अगर इंग्रजी विद्येमार्फत होईल, याचा विचार पुढें करूं. तसेंच सर्व समाजामध्यें वजनदार असा एखादा शिष्टवर्ग उत्पन्न झाल्यास तो केंद्र होऊन त्याच्यामार्फत जातिभेद मोडण्यास मदत होत. तो शिष्टवर्ग कसा उत्पन्न होईल त्याचें स्वरूप कसें काय असलें पाहिजे हाहि विचार त्याबरोबरच करूं.

मुसुलमानांचें भवितव्य आणि हिंदूंचें भवितव्य या दोहोंचाहि विचार साकल्यानें केला पाहिजे. या दोघांचें एकत्व होईल किंवा दोन्ही समाज निरनिराळे रहातील यांपैकीं कांहीं तरी एक होणार हें उघड आहे. हे दोन पृथक् राहतील असें भविष्य करणें म्हणजे मनुष्योपायाची व्यर्थता व्यक्त करणें होय; आणि सर्व सामाजशास्त्रीय विद्येचा राजनीतीचा आणि या सर्वांहून मोठें जें ज्ञान त्या ज्ञानाचा उपमर्ध करणें होय. समाजभिन्नता जर विचारमूलक आहे तर विचाराच्या ओघाबरोबर समाजाचें स्वरूप बदललें पाहिजे. संप्रदाय जर विचारमूलक आणि आचारमूलक आहेत, आणि विचार शेवटीं सत्याच्या अनुषंगानेंच प्रवृत्त होणार हें सर्व विचारांचेंच ध्येय आहे; आणि सत्य जर शास्त्रांचा विषय आहे तर शास्त्रांची प्रगति झाल्यानंतर विचारभिन्नता राहील कशी व आचारभिन्नता राहील कशी?

समाजाचें पृथक्त्व आचारमूलकच असेल आणि आचार जर विचारमूलक असतील आणि विचार जर सत्यमूलक असतील तर सत्याच्या अनुषंगानें सर्व लोकांत विचार व आचार यांचें ऐक्य अगर सादृश्य हीं उत्पन्न होणारच. मग जर लोकभेद राहिला तर त्याचें कारण निराळें असलें पाहिजे. सध्यांच्या वृत्तींत फरक होणार नाहीं व दोन्ही समाजांचें पृथक्त्व कायमचें राहणार, हा सिद्धांत केवळ विचार न करणार्‍या आणि भेदाचा डोंगर पाहून घाबरून गेलेल्या मनुष्याचा होईल. प्रज्ञाचा होणार नाहीं.

पुढे वाचा:जातींची घटना आणि विघटना

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .